“घना, चहा घेतोस ना?” सखारामने विचारले.
“घेतो.” तो म्हणाला.
मालतीने चहा आणला. सर्वांनी घेतला. नंतर तो वाचीत बसला.
“काय वाचता?” मालतीने विचारले.
“कामगार चळवळीचा इतिहास आहे.”
“तुम्हांला हे काम आवडते?”
“पडलो आहे खरा या कामात. परंतु माझ्या मनात अनेक कल्पना येत असतात. काही तरी विशेष करून दाखवावे, असे मनात येते.”
“विशेष म्हणजे काय?”
“समजा, उद्या संप झाला तर आम्ही काय करणार? एखादे वेळेस माघार घ्यावी लागते. शेकडो कामगार बेकार होतात. अशा वेळेस उपाय काय? कोठे तरी पडिक जमिनी असतात. तेथे शेकडो कामगारांसह जावे; तेथे सामुदायिक जीवनाचा प्रयोग करावा; एक नवीन सहकारी मानवी संस्कृती फुलवावी असे मनात येते. मी सुंदरपुरात काम करतो आहे. परंतु मनात अशी स्वप्ने येत असतात.”
“तेथे का संप होईल?”
“आज ना उद्या वेळ येईलच. फारच कमी मजुरी तेथे आहे. राहायची व्यवस्था नाही. सुंदरपूरच्या त्या संस्कृतिसंवर्धन संस्थेस कामगारांच्या पगारातून आजवर जवळ जवळ लाखो रुपये गेले असतील. हे पैसे कामगारांना परत का मिळू नयेत? त्यांतून त्यांच्यासाठी चाळी बांधता येतील. मी हे सर्व प्रश्न घेऊन मालकांसमोर जाणार आहे. परंतु आधी कामगारांची नीट संघटना व्हायला हवी. संघटनेवर सारी इमारत उभारायची. ती संघटना बांधण्याचे काम मी सध्या करीत असतो.”
“मला येईल का तेथे काम करायला?”
“हो, किती तरी येईल. तुम्ही बायकांत जात जा. त्यांचे वर्ग चालवा. त्यांच्या मुलांची काळजी घ्या. त्यांचे कपडे शिवा. कामाला काय तोटा? परंतु तुम्ही कशा येणार! सखाराम आला असता तर त्याच्याबरोबर तुम्हीही आला असतात.”
“भाऊ, आपण जायचे का सुंदरपूरला?”