आणि ते नाटक? तो नाटक लिहीत होता. ‘खरी संस्कृती’ हे त्या नाटकाचे नाव होते. त्या नाटकात त्याने आपली नवीन दृष्टी मांडली होती. संप वगैरे सुरू होण्यापूर्वी ते नाटक तो पुरे करू इच्छीत होता. एका साहित्याप्रेमी संस्थेने उत्कृष्ट नाटके बक्षिसार्थ मागवली होती. सर्वोत्तम ठरणा-या नाटकाला पाच हजारांचे बक्षीस मिळायचे होते. घना बक्षिसार्थ भुकेला नव्हता, परंतु बक्षीस मिळले तर आपल्या कामाला मदत होईल. असे त्याच्या मनात येई.
बाहेर बरीच रात्र झाली आहे. घना लिहित बसला आहे. त्याला कशाचे भय नाही. त्या नाटकातील उत्कृष्ट भाग तो लिहीत होता. क्षणभर तो डोळे मिटून बसला. जणू ते सारे दृष्य अंतश्चक्षूंसमोर त्याने पाहिले. डोळे उघडून तो पुन्हा लिहू लागणार तो एकदम त्याला काहीतरी दिसले. काय होते ते? केवढा थोरला काळाभोर विंचू! आकडा उभारून तो आला होता. घनाच्या वहीवर होता. घना पटकन् बाजूला झाला. परंतु त्या विंचवाला मारावे असे त्याला वाटले नाही. कोठून आला हा विंचू? त्या नाटकातील प्रसंगात तो प्रेमाचा एक संवाद लिहीत होता. प्रेमाच्या किरणात सारे सुंदर दिसते. काळ्या ढगांवर सूर्याचे किरण पसरले तर ते काळे ढगही किती सुंदर दिसू लागतात. असे तो लिहीत होता. त्याच्या प्रेमाची परीक्षा पहायला का तो विंचू आला होता? त्याने चिमटा आणला आणि त्या विंचवाला पकडले. त्याला बाहेर टाकले.
तो पुन्हा खोलीत आला; लिहिणे थांबले, परंतु त्याला विचार सुचले. या विंचवाची नांगी तोडून टाकली असती तर तो निर्विष विंचू निरुपद्रवी झाला असता. भांडवलदारांच्या हातातील सांपत्तिक सत्ता काढून घेतली तर ते असेच निरुपद्रवी होतील. सापाचे विषारी दात पाडल्यावर साप खुशाल खेळत राहिला म्हणून काय बिघडले? भांडवलदारांना गोळ्याच घातल्या पाहिजेत असे नाही. परंतु त्याच्या हातची सत्ता कोण काढून घेणार? जनतेचे प्रभावी सरकार आले तर तोच हे काम करू शकेल. परंतु अजून स्वराज्यही दूर होते. एकदा परसत्ता गेली म्हणजे पुढे या गोष्टी.