“कामगार बंधुभगिनींनो, मी तुम्हांला थोडेसे निराळे सांगणार आहे. संपाच्या भानगडीत आपण पडू नये. तुम्ही पुष्कळसे आसपासचे आहात. तुमची थोडीफार शेतीवाडी असेल. तुमचे सगेसोयरे असतील. संप पुकारून तुम्ही तेथे जाल. आम्ही कोठे जायचे? सोलापूर जिल्ह्यातील आम्ही. शिवाय संप यशस्वी होणार नाही. मालकाचे हस्तक गावोगाव हिंडत आहेत. बेकारांची भरती केली जात आहे. पाच पाच रुपये देऊन नावे नोंदवून ठेवीत आहेत. तुम्ही शांतीने संप करणार. पण या नवीन कामगारांना कोण अडवणार? तुम्ही फंड जमवाल तो दोन दिवस तरी पुरेल का? हे पुढारी जातील निघून, किंवा बसतील तुरुंगात बी क्लासात. वर्तमानपत्रांत त्यांचे नाव येईल. परंतु आपण मातीला मिळू. हे पुढारी अवसानघातकी असतात. आणि समजा, प्रामाणिक असले तरी त्यांची कितीशी शक्ती! पाचदहा हजार रुपये तरी गोळा करु शकतील का? मी तुमच्यातीलच एक आहे. (पैसे खाऊ! मालकांचा बगलबच्चा! असे आवाज होतात.) तुम्ही काही म्हणा; तुमच्या कल्याणाचे मी सांगत आहे. (ओढा त्याला खाली. निमकहराम!—असे आवाज.) मला सांगायचे होते ते सांगून झाले. तुम्हांला योग्य दिसेल ते करा.”
ते गृहस्थ गेले आणि घना बोलायला उभा राहिला. तो म्हणाला, “आपण संपाचा निर्णय घेण्यासाठी जमलो आहोत. मला माझी इच्छा तुमच्यावर लादायची नाही. मला नको नाव, नको किर्ती. तुमची मान उंच व्हावी, हीच एक मला इच्छा. तुम्ही स्वाभिमानाने जगावे अले मला वाटते. तुमच्यावर अन्याय होत आहे ही गोष्ट खरी. अन्यायाचा प्रतिकार करण्यात पुरुषार्थ असतो. तुम्ही माणसे बना. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असेन. मी पकडला गेलो तर माझा मित्र सखाराम कदाचित येईल. नाही तर ब्रिजलाल आहे, पंढरी आहं, कुतुब आहं, धनाजी आहे, रामदास आहे—त्यांच्या मागे जा. खेड्यापाड्यांतून शेतकरी धान्य देतील. काही दिवस तरी तेजस्वी लढा द्या. तुमच्यात तेज आहे ही गोष्ट दिसू दे. माझ्याजवळ तुम्हांला द्यायला पैसे नाहीत ही गोष्ट खरी. मजजवळ हे प्राण आहेत;-- वेळच आली तर हा प्राण पणाला लावीन. मी तुम्हांला अंतर देणार नाही. माझ्या मनात दुसराही एक विचार आहे. जवाहरलाल नेहमी म्हणतात, साहस करावे, नवीन करून दाखवावे. समजा, संप फसला, काही कामावर जाऊ लागले, तरी ज्यांना स्वाभिमानाने जगायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी एक प्रयोग योजित आहे. तिकडे इंदूरकडे माझे एक मित्र आहेत.
तिकडे पडिक जमिनी पडल्या आहेत. आपण जाऊन तेथे वसाहत करू. सर्व धर्मांचे, सर्व जातीचे लोक एकत्र खपू. एकत्र खाऊ. ओसाड जमिनीत श्रम ओतून तेथे नंदनवन निर्मू. इंदूर-माळवा येथून लांब नाही, तुम्हांला येथील घरेदारे सोडून यावे लागेल, परंतु तुम्हांला नीट घरदार आहे तरी कोठे? त्या तुमच्या अंधा-या खोल्या. आपण नवीन जीवन निर्माण करू. एक नवा प्रयोग दुनियेसमोर ठेवू. सहकारी शेती करू. तेथे छोटे उद्योगधंदे उभारू. हिंमत असल्यावर दुसरे काय हवे? काही तर पराक्रम करू. तीनशे वर्षांपूर्वी इंग्लंडमधील लोक स्वतंत्रपणे जगण्यासाठी अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी जंगले तोडली, वसाहती वसवल्या. साहसाशिवाय वैभव नाही. स्वतंत्र सुखी जीवन जगू. नव-संस्कृती फुलवू. नवा प्रयोग करू. मनात विचार करून ठेवा. येथे यश न मिळाले तर तेथे मिळवू. येथील नागरिकांना दोन शब्द सांगायचे आहेत.