सुंदरदास गेले. व्यवस्थापक नाना कारवाया करायला गेले.
घनाच्या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही असे कामगारांना कळले. सर्वत्र असंतोष होता. संपाशिवाय उपाय नव्हता. एकदा ताकद अजमावून पहायला हवीच होती. परंतु घना सचिंत होता. आपल्याला अटक झाली तर? तो स्वत:ची फिकीर नव्हता करीत. संपाचे काय होईल हा प्रश्न होता. संपाचे नेतृत्व कोण करील? कोण धीर देईल? सखाराम येईल का? त्याची बहीण येईल का? उपयोग होईल. किती छान होईल दोघे आली तर!
त्याला पत्र लिहायचे त्याने ठरवले. त्या दिवशी रात्री कामगार कार्यकर्त्यांजवळ चर्चा आटोपून घरी आल्यावर तो लिहित बसला.
प्रिय सखाराम,
ब-याच दिवसांनी हे पत्र लिहित आहे.
माझ्या चळवळी वळवळी तुला माहीतच आहेत. मध्यंतरी तालुकाभर हिंडलो. परवा सुंदरदासांना भेटलो, परंतु काहीच करायला ते तयार नाहीत. संपाचाच आता उपाय.
परंतु संप पुकारताच मला अटक होईल असे वाटते. तू इकडे येशील का? निदान मला अटक होताच येशील का? आधीपासूनच आलास तर सारे तुला समजावून देईन. सर्वांशी तुझा परिचय करून देईन. मालतीबाईही आल्या तर छान होईल. त्या विचारीत की मला येईल का काम करता? खूप येईल काम करायला. त्यांच्याही जीवनात आनंद येईल. कर्महीन जीवनामुळे त्या उदास असत.
बघा विचार करून. एखादे वेळेस तुम्हालाही तुरुंगात जावे लागेल. परंतु त्यात वाईट काय आहे? थोरामोठ्यांनी केले तेच आपण करीत आहोत. विचार करून पत्र पाठव.
सर्वांस स. प्रणाम.
तुझा
घना
त्या दिवशी सखाराम कोठे तरी बाहेरगावी गेला होता. वडील भावाची पत्नी अजून माहेरीच होती. मालती एकटीच घरात होती. ती शिवणकाम करीत होती. ते पत्र टाकून पोस्टमन गेला.