रात्रीच्या वेळेस स्वच्छ चांदण्यात सारी मंडळी जमली. घना म्हणाला, “बंधुभगिनींनो, सर्वांसाठी आधी झोपड्या बांधणे हे काम. तट्टे येऊन पडले आहेत. थोडाफार पाया करून झोपड्या आधी उभारू. जंगलात बांबू आहेत. आपल्याला आणायची परवानगी आहे. आणि जमीन किती लागवडीस आणायची ती ठरवू. दगडधोंडा सारे दूर करायचे. ट्रॅक्टर मिळणार आहे आणि आपले शे-पाचशे हात आहेत. भूमातेच्या कुशीत जितके घुसू तितके ती देईल. तिकडे चरांचे संडास आहेत. त्यातच सर्वांनी शौचास जायचे. आडोसा आहेच वर माती टाकीत जा. घाणीतून स्वर्ग निर्मिता येतो. पिकेल ते सर्वांचे. कोणाला येथे ददात राहणार नाही. एक नवीन स्वर्गच जणू आपण निर्मू.”

मालतीच्या अंगात ताप होता. घना नि सखाराम तिच्याजवळ बसले होते.

“म्हटले—तुम्हांला वेळ होतो की नाही इथे बसायला!” मालती म्हणाली.

“सर्वांची व्यवस्था लावणे हे पहिले काम. मी एकदा येऊन गेलो. मला वाटले, तुम्हांला झोप लागली आहे. हळूच निघून गेलो. परंतु उद्या ताप उतरेल असे मला वाटते.” घना म्हणाला.

“कशावरून?” तिने विचारले.

“मी आलो, आता ताप जाईल.” तो म्हणाला.

आणि खरोखरच दुस-या दिवशी मालतीचा ताप निघाला. जणू जादू झाली. आलेल्या कामगार मायबहिणींनी तिची चौकशी केली. पार्वतीने तिचे पाय चेपले.

“पार्वती, तू आलीस?” तिने विचारले.

“तुमच्याजवळ रहायला आले. येथे मोकळ्या हवेत राहू. खपू नि खाऊ. देवाचे नाव घेऊ. तुम्ही ब-या व्हा. मुलांना शिकवा.” पार्वती म्हणाली.

“मी तुमच्याबरोबर काम करीन.”

“असे आजारी पडायला का? काम कराच, परंतु शिकवण्याचे करा.”

“मी खणीन, पेरीन, कापणी करीन, जंगलातून लाकडे आणीन.”

“बरे-बरे. आधी बरी हो.”

सारे लोक कामाला लागले होते. कुणी रसोड्यात काम करीत होते. लहान मुलेही कामात गुंतली, रिकामे कुणी नाही. ते सर्वांचे काम होते. मध्येच रानफुलांचा गुच्छ घेऊन घना मालतीकडे आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel