“आई वेळ आली म्हणजे सारे होईल. आणि लग्न न करता अशीच राहिली म्हणून काय बिघडले? कोठे काम करील, सेवा करील. आपल्या देशात काम करणारी माणसे आज हवी आहेत. खेड्यापाड्यांतील स्त्रियांत काम करण्यासाठी माणसे हवी आहेत.” सखाराम सांगत होता.
लग्न करून करू दे काम. तुमच्या महात्मा गांधींनी का लग्न नाही केले? लग्नशिवाय का कोणी राहतो? रीतीने सारे झाले पाहिजे. तू जा पुण्यामुंबईकडे नि आण शोधून एखादा हुशार मुलगा.” आई कळकळीने सांगत होती.
एके दिवशी सखाराम खरेच पुण्यामुंबईकडे गेला. त्याला जुने ओळखीचे मित्र भेटले. कोणाची लग्ने झालेली, कोणाला मूलबाळ. असे ते बहुतेक होते. बहिणीसाठी नवरा कोठे बघायचा? तो निरनिराळ्या वसतीगृहात जाऊन चौकशी करी. त्याला विद्यार्थी हसत. सखाराम साधा-भोळा. शांतपणे सारे सहन करी.
एके दिवशी त्याला एका तरुणाचा पत्ता मिळाला. तो विलायतला जाणार, बॅरिस्टर होणार, असे त्याला कळले. त्याचा पत्ता काढीत तो त्या जागी गेला. तो तरुण तेथे होता. सिगारेट फुंकीत होता.
“नमस्कार.” सखाराम म्हणाला.
“गुड मॉर्निंग!” तो तरुण म्हणाला.
“आपल्याला काही विचारण्यासाठी मी आलो आहे. विचारू का?”
“हो, हो विचारा की.”
“आपणाला लग्न करायचे आहे असे मी ऐकले. माझी बहीण लग्नाची आहे.”
“शिकलेली आहे का?”
“मॅट्रिक झालेली आहे.”
“वा, फार छान! आपल्या जातीत अजून शिकलेल्या मुली फार नाहीत. अहो उद्या मी बॅरिस्टर होणार, किंवा आय्.सी.एस्. ऑफिसर होणार. मोठी माणसे मग माझ्या घरी येणार, मला दुस-यांकडे जावे लागणार; खाने, समारंभ- नाना प्रकार. पत्नीला बरोबर न्यावे लागेल. ती आडाणी, मुखदुर्बळ असेल तर काय उपयोग? खरे की नाही? तुमची बहीण बरेच शिकली एकूण. ठीक, ठीक. परंतु एक अट आहे. मला विलायतेला जायचे आहे. त्याचा खर्च जो देईल त्याच्या मुलीशी मी लग्न करणार. उद्या मुलीचेच कल्याण आहे त्यात. आपल्या मुलीला फॉरिन-रिटर्नड फक्कडसा नवरा मिळाला तर आईबापांना किती आनंद होईल! खरे की नाही?”