तीन टक्के धरले तरी व्याजाचे २२।। हजार रुपये होतील. हे पाव लाख तुम्ही दिले पाहिजेत. संस्थेत संस्थापक म्हणून तुमचे नाव, आणि पैसे गरिबांजवळून घेता? सारीच संपत्ती गरीब तुम्हाला देतात. परंतु तेवढ्यानेही समाधान न होता त्यांच्या तोंडचा घास काढलात! कोठे हे पाप फेडाल? तुम्हांला जर धर्माची चाड असेल, न्यायाची चाड असेल, संस्कृती म्हणजे मानवता, उदारता, सहानुभूती हा अर्थ पटत असेल तर तुम्ही या दोन्ही मागण्या मंजूर करायला हव्यात.”

“एकही मागणी मंजूर होणार नाही. माझ्याच संस्कृतीमंदिरात तुम्हीही होता.”

“परंतु तेथील हकीगती कळल्यावर राजीनामा देऊन बाहेर पडलो.”

“आणि येथे आगलावेपणा करीत बसलात! या शान्त गावात अशान्ती आणणे हा वाटते तुमचा धर्म?”

“लोकमान्य टिळकांना इंग्रज असेच म्हणत. महात्माजी एकदा म्हणाले, ‘इंग्रजी राज्याविरुद्ध अप्रीती उत्पन्न करणे माझा धर्म आहे’. न्यायाचा उपासक अशांतीला भीत नसतो. मेलेल्यांना जिवंत करणे म्हणजे का अशांती? स्वाभिमानी व न्याय्य जिण्याची कल्पना आणून देणे म्हणजे का अशांती? शांती म्हणजे का काहींना संपत्तीत लोळणे नि काहींनी फूटपाथवर उपाशी पडणे?”

“गांधीजी परकी सत्तेविरुद्ध अशांती उत्पन्न करीत होते; स्वजनांविरुद्ध नाही.”

“स्वजनही जुलूम करतील तर? महात्माजी एकदा म्हणाले, ‘या वरिष्ठ वर्गाविषयी मी आता निराश झालो आहे. मी खालची जनता उठवतो म्हणजे हे सारे लब्धप्रतिष्ठित गडगडून पडतील!”

“हे महात्माजींचे शब्द?”

“हो. त्यांचे; त्यांचेच बर का. उद्या स्वतंत्र हिंदुस्थान एक दिवसही आर्थिक विषमता सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. तुम्ही कान असून बहिरे आहात. सोयीची वाक्ये तेवढी तुम्ही घेता!”

“तुम्ही तरी दुसरे काय करता?”

“आम्ही सामग्य्राने बघतो. ते असो; तुम्ही काय करणार ते बोला.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel