👌खूपच छान👌

*दोन घास*

*नुकतेच लग्न झाले होते आणि सासू सासऱ्यांकडे मी राहात होते. सासरे रेल्वेतील निवृत्त अधिकारी पेन्शनर होते. पूर्ण वेळ देवाचे नाम घेणे, जप करणे, घरातील सर्व सामान मंडईतून स्वतः आणणे, ज्योतिषाचा व्यासंग जपणे वगैरे गोष्टीत सासरे मन रमवायचे. सासूबाई घरची सर्व कामे पहाणे, स्वैंपाक करणे, येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणे यातच नेहमी व्यस्त असायच्या. सासू सासरे अत्यंत देवभक्त व धार्मिक वृत्तीचे होते.*
*नवरा डॉक्टर व कमवता असल्याने घरी ठीक चालत होते. मी तेव्हा लग्नानंतरही शिकत होते.*

*त्या वेळी आमच्याकडे सुमन नावाची मोलकरीण धुणी-भांडी, व घरची साफ-सफाईची देखील कामे करायची. पूर्ण चाळीत चार पाच जणांकडे ती कामे करायची. माझ्या सासूबाईंना एक सवय होती. त्या गरम गरम चपात्या करायच्या तेव्हा रोज सुमनला अगत्याने बोलवायच्या आणि "खा गं सुमन" म्हणून सुमनला अगत्याने तव्यावरची गरम चपाती चहाबरोबर द्यायच्या. तोपर्यंत कुणीच सकाळी जेवलेले नसायचे, पण सुमन मात्र सासू बाईंच्या हातच्या गरम चपाती व चहाची हिस्सेदार व्हायची. दारावर पारू आणि तिची मुलगी मीना मासे विकायला यायच्या. एवढी मोठी टोपली दूरवरून ट्रेननी आणायची आणि दारोदार विकायची हे या कोळीणींचे हेच तेव्हढे उदरनिर्वाहाचे साधन होते.*

*मी सासूबाईंना 'अहो आई' म्हणत असे. आई पारू, व मिनालाही जेऊ घालायच्या.. 'अगं थोडी भाजी चपाती खा, दूरून आलीस तू, दोन घास तरी खा" म्हणून अगत्याने बसवून आई त्यांना खायला द्यायच्या...*
*घरी माणसांची आवक मोठी होती, सतत पाहुण्यांचा राबता असायचा..कुणीही जेवल्याशिवाय जायचे नाही, दोन घास खाऊनच जायचे हा जणू आमच्या आईंचा नियमच होता..त्यावेळी माझा नवरा एकटा कमवता आणि असे सर्वाना आई का खायला घालत सुटल्या आहे ह्याबद्दल माझे सरंजामी मन अनेकदा खट्टू व्हायचे..कधी कधी चीडही यायची..जेव्हा बघावे तेव्हा कधी भाजीवाली, कधी मोलकरीण ऐसपैस बसून दोन घास खात आहेत.*

*तेव्हा मी तरुण विशीतील युवती होते, थोडाफार एक शिक्षणाचा आत्मविश्वास आणि अहंकारही होता. त्या अहंकारातून मुसमुसुन राग यायचा..त्या फुकटच्या पत्रावळी आणि दोन घास आदरातिथ्याचा..*

*म्हणता म्हणता दिवस सरले..सासूबाई आणि सासरे हे काळाच्या आड गेले..आणि नकळत काळाने मलाही बदलले.*

*आज लोणावळ्याच्या घरी तिकडची नोकर जयश्री आली..तिला मी नकळत बोलले, जयश्री "दोन घास" खाऊन जा गं..ताकाची कढी केली आहे"..आताशा कुणीही आला आणि आपल्याकडे दोन घास खाऊन गेला नाही हे गणित माझ्या हिशेबात जुळत नाही..परिस्थितीच्या अनेक आवर्तनात माझा तारुण्यातील सरंजामी अहंकार कधी गळला तेच कळले नाही..*
*आपण अंगमेहनत न करता खातो ही कुणकुण सतत राहते..कोळीण, भाजीवाल्या एवढ्या मोठ्या टोपल्या वाहतात, घरी येणारी मोलकरीण सर्व काम मेहनतीने करते आणि मी फक्त टेबलावर बसून कामे करते या भावनेची सतत जाणीव होते..*
*आईंना आणि माझ्या सासऱ्यांना "दोन घासात" माणसं जुळवण्याचे गणित कळले होते...*
*"दोन घास" आपण कमी खावे परंतु अन्न हे दान करण्यातच खरे सुख असते, आनंद असतो ...त्या आनंदाचे संस्कार नकळत आईंनी आणि सासरेबुवांनी माझ्यावर केले...त्यांची उतराई कशी होऊ?*

*कर्णाला तू सर्व दान केलेस पण फक्त अन्न दान केले नाहीस म्हणून पृथ्वीतलावर जा आणि अन्न दान कर अशी स्वर्गात आज्ञा होते..*

*तो पृथ्वीवर येऊन दान करतो तोच "पितृ पक्ष"..आणि मग कर्णाला मोक्ष मिळतो हे सर्वज्ञात आहे...*

*हा मोक्ष दुसरीकडे नाही, तर या जन्मी आणि याची डोळा दुसऱ्याला जेवून "दोन घास" भागीदारी करताना कृतार्थ होतांना बघण्यात आज आणि येथेच आहे....*

*आपण एखाद्याला पैसे देऊ शकतो, कपडे देऊ शकतो, परंतू स्वतःच्या ताटातील अन्न देणे हे वेगळे आहे..*

*अन्न हे अनेक वासनांचे बीज आहे, माणसाचे मन हे अन्नाशी निगडीत आहे. म्हणूनच अन्न आणि वृत्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा अतूट संबंध आहे..*

*जेव्हा आपण दुसऱ्याशी "दोन घासाची" भागीदारी करतो तेव्हा अहंकाराचा, वासनांचा त्याग करत असतो...*

*अश्याच एखाद्या मौळीत मी गेलेली असते..छपरातून पाणी टपटप पडत असतं.. घरात पोरं उघडी बसलेली असतात..वयात आलेली एखादी तरणी थोडीशी चिंधी गुंडाळून बसते..आणि घरची अठराविश्व दारिद्र्याची मालकीण मला म्हणते,"मॅडम दोन घास आमच्याबरोबर खा" तेंव्हा माझे डोळे पाणवतात..माझ्या कधी काळच्या सरंजामी अहंकाराची, माझीच मला घृणा येते..*

*माझ्या वृद्ध, गरीब आईंना कळलेली दोन घासाची माणुसकी मला पुन्हा पुन्हा दाद देऊन जाते.. मला मेसेज आला आहे तो मी तसाच‌ आपल्याला पुढे फाॅरवर्ड करत आहे.*

*आपणास देखील "दोन घास" हा मेसेज आवडला तर पुढे नक्की मेसेज करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*#285327331
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel