"#बरबाट"

दरवर्षी गावाकड असताना 'आखाडात' हा शब्द नक्की कानावर पडायचा....

"बरबाट, खळगूट" !

हा शब्द आठवला ना, तरी कानाच्या पाळ्या गरम झाल्यासारख्या वाटायच्या. मग आपसूक जिभेला पाणी सुटल्या शिवाय राहत नसायच !

'चला बरबाट वडाय......' !
अस गावाकड, जरी कुणी म्हणल ना,
तरी, न जेवता आत्मा थंड व्हायचा !

'ईसूर', चुलीत भाजलेला कांदा, धने, खोबर, हरभ-याची दाळ, अख्ख्या लवंगी लाल मिरच्या इ. पण कमी मसाल्यांचा वापर, त्यात मि-़या पाट्या वरवंट्यावर वाटून घातल्या की मग होत ते तिखाट जाळ केलेल झणझणीत गावठी.....मटाण !
हे वरपून खाताना कानाच्या पाळ्या गरम होवून, डोक्यातून घामाच्या धारा निघाल्या तरच त्याला म्हणायच.....बरबाट !

गावात मित्रापैकी एकाला जरी आखाडात 'देवदेवाच, कंदूरीच' आवातण मिळाल.
तरी दोन चार जण जिवलग मित्र तयारीत असतात.

'चला आपल्याच पावण्याचा देवदेव हाय,
अस म्हणल रे म्हणल !

की,

कान टवकारून,
ऐकमेकांनकड बघून न बघीतल्यासारख करत......
लगेच पटापटा, दोन चार मोटर सायकली निघणार म्हणजे निघणार.
परत एकाच मोटार सायकलवर टिबल, चौबल शिट बसून, हमखास बरबाट वढायला दोस्त कंपनी तयार.

गावाकडची माणस, जास्त डोक्याला ताण देत नाहीत, आणी घेत बी नाहीत.
आणी कितीबी लोक जेवाय आली, तरी त्यांना कमी न पडू देत नाहीत.
आलेली सारी लोक जेवू घालणार म्हणजे घालणार.
तिथ मागाचा पुढचा विचार कधी कुणी करत नाही.

कुणाचा देवदेव ?

कुणाच आवातण, कुणी दिल ?

जेवाय कोण येतय ?

जेवून कोण जातय ?

याचा विचार कधी कोणी करत नाही !

आला माणूस की....वाढा !

आला माणूस की.....वाढा !

ऐवढाच रट्टा चालू असतो.....

आलेल्या माणूस कोण ?
त्याला आवतण दिल हुत का ?
असल काही विचारत नाही.

ऐ..ऐ...आर्रर वाढा पाहूण्यांला...
असा खरड्या आवाजात कुणी बोलल, तर
समजून घ्याच घरातल दरारा असणार, वजणदार

"डंगार".

परत त्याच आवाजात कोप-यात बसून हुकूम सोडणार....ते बी घसा खाकरून ...पाव्हण बसून घ्या बर पाटकून.

"अश्या जेवणात खर तर जावायाची आणी त्याच्या मित्रांची खातीरदारी म्हणजे.....
ऐखाद्या श्रीमंत देशाच्या 'राजाला' एखाद्या सावकारने जेवणाच आमंत्रण देवून. त्याच्याकडून काहीतरी पदरी पाडून घेण्यासाठीची केलेली धडपड".
म्हणजे,
"#जावायाच_बरबाट_भोजन" !

ह्या जेवनात काही विचारायची सोय नाही...
दाजी, दाजी करत चार, पाच पोरांच कोंडाळ
दाजी आन त्याच्या मित्रांना वाढाय पुढ सरसावलेल असत.
आग्रह म्हणजे नाही म्हणा-याचा ऐखाद्या वेळ 'खुन' पडण...
यावरून,
"आग्रह" या वाक्याची व्याप्ती, 'बरवाट' वढताना किती मोठी असल, हे न ईचारलेल बर ?

दाजी, आणी त्याच्या मित्रांची सोय वेगळी, शेपरेट, येगऴ्या खोलीत असती.
दाजी, जरी मोजून मापून सासूरवाडीत नाईलाजास्तव जेवत असल तरी..
हा नियम त्याच्या मित्रांना लागू होत नाही.
दाजीचे मित्र 'जेवढ पायजे तेवढ बरबाट, अन पायजे तेवढ खड, प्याट फुटूस्तोर वढू शकतेत अन पायजे तेवढ वरपू शकतेत.......दाजी समूरच बादलीत खड आन बरबाट ठेवल्याले असत्यात.
जावायासाठी अगोदरच "पिवळ खड" काढून येगळे ठिवल्याले.
परत "सुट्ट रुट्ट" ते बी, खास जावायासाठीच !
पण हे मनसोक्त न लाजता, तोंडाला वगूळ येवूस्तर, वरपून वढण्याच काम जावाय बापूंच्या मित्रांच असत....!

बाकी घरा भाहीर वसरीत, दारात पंगतीवर पंगती चालूच असत्यात.
काहीजण जेवून धोतराणी नाक पूसत असतेत,
तर काहीजण झणझणीत बरबाटाची तिखाट फूरकी मारल्यान,
हूश, हूश....फुस, फुस करत निघालेल असतेत.
तर काही जण ऐखादा कोपरा धरून नाक शिकरीत, शिकरीत चाललेले असतेत.

काही लाईन धरून पंगतीत,
ताटात मस्त दिड, दोन भाकरी कुस्करून बरबाटाची वाट बघत बसलेेले.
वाढपी येवूस्तोर,
काही त्यात कुस्करलेल्या भाकरीला, आजून बारीक कुस्करीत असतेत.
तेवढ्या मीठ,
मंग कांदा..... मंग लिंबू....
मंग लहान भगूण्यात....खड,
त्यात त्योय खड वाढणारा लय बिलंदर,
'ऐखाद्या येळेस सोनाराच माप चुकन',
पण हे बेण मापात तुसभर फरक करीत नाही.
ते बेण मापातच खड वाढत.
मंग नंतर मोठ्या भगूण्यात....
"बरबाट" येत,
त्याला वाढायला पळी, बिळी असल काही नसत.
डायरेक्ट,
ताटातच बरबाट वतायच...
अहा हा, हा......
बरबाटाची चव,
त्याला तोड नाही.
ऐक येळेस मटाण नको,
पण खळगूट वाढ,
म्हणणारे,
फुरक्या मारत बरबाट वरपून खाणारे,
जेवून झाल्यानंतर,
समाधानाचे ढेकर देत....
नाक शिकारणा-याच कसनूस झाल्याल त्यॉयंड......
त्यात काहींच प्यॉट भरलेल असत,
पण मन,
मन भरल्याल नसत ?
बरबाट ईशयी सांगाव तेवढ कमी,
बरबाट पुराण पिवून, खाऊन, मन भरून,
बघायच असल तर मंग तुम्हाला,
शहरात नाही तर गावात जावा लागल.
तरच,
"याची देही याची डोळा",
अस,

"हे बरबाट पुराण अनूभवता येईल".

आखाड येतोय,
यंदा करोनाच थैमान चालू आहे.

"गावाकड जावून खळगूट वरपणार,
असाल, तरी बी काळजी घ्या !#285327369
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel