जय जय शिवशंभो, शंकरा । हर, हर कर्पुंरगौरा ॥धृ०॥

अघटित घटित कृती तुझि सारी । विश्‍वंभर, संसारी

तुंबळजळगंगासहित शिरीं । प्रलयानळ तेजःश्री

केवळ निळकंठ विषधारी । चंद्रामृत रसधारी

लंपट अर्धांगी प्रिय नारी । अससी परी मदनारी

समान अहिमुषकासनमयुरा । गणपति-स्कंदकुमारा ॥१॥

अनंत ब्रम्हांडांच्या माळा । फिरविसि अनंत वेळा

सच्चिदानंद तुझी कळा । न कळे, भ्रम पदे सकळां

किंचित् जाणील तो नर विरळा । ब्रह्मांडामधिं आगळा

ब्रह्मज्ञानाच्या विशाळा । अभ्यासाच्या शाळा

नेणुनि बहु करती पुकारा । मूळाक्षर ॐकारा ॥२॥

आज्ञेविण न हले तृण, पाणी । पवनगजज्जिववाणी

भ्रमतीं नक्षत्रें शशितरणी । पन्नग, शिरिंधरी धरणी

खग-मृग-तरु-कीटक जडप्राणी । वर्तति ज्या अनुसरुनी

स्वतंत्र तो तूंची, तुझी करणी । शिव, शिव, हे शुळपाणी

अनाथ दीनांचा तूं आसरा । लोकत्रयिं नसे दुसरा ॥३॥

शरणागत आलों पायांस । संरक्षण करि यास

अखंड रक्षिसि तूं । विश्‍वास । आहे बहु विश्‍वास

सदैव हृत्कमलीं करि वास । एवढी पुरवी आस

आशा न करावी उदास । बोले विष्णूदास

अनंत भूलिंगा अवतारा । भवनिधिपार उतारा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel