ती माता त्या नाटकाचे समर्थन करू लागली. प्रताप ती चर्चा ऐकत होता. त्या चर्चेत त्या दोघांचा आत्मा नव्हता. ती दोघे उगीच बोलायचे काही तरी, म्हणून बोलत होती. सुसंस्कृतपणा दाखविण्यासाठी बोलत असतील. घशाला व्यायाम म्हणून ती बोलत होती. आता सूर्यास्त होत आला. शेवटचे किरण खिडकीतून आत आले. ते त्या मातेच्या तोंडावर पडत होते. तिने घंटा वाजवली. एक नोकर आत आला.

‘तो खिडकीचा पडदा कर रे नीट.’

सूर्यकिरणांमुळे तिच्या तोंडावरच्या सुरकुत्या दिसू लागल्या. पुन्हा ती बोलू लागली,
‘काव्याशिवाय गूढवाद म्हणजे केवळ भारूड; आणि गूढवादाशिवाय काव्य म्हणजे प्राणाशिवाय कुडी.’ तिने पुन्हा त्या नोकराकडे पाहिले.
‘अरे मूर्खा, तो पडदा नव्हे, हा.’ ती म्हणाली.

नोकराने तो दुसरा पडदा नीट केला.

‘अरे, त्या बाजूला सार, टोणपा आहेस तू.’

‘या म्हातारीला हवे आहे तरी काय?’ असे तो नोकर नक्की मनात म्हणाला असेल. तो नोकर गेला. आणि क्रान्ति-उत्क्रांतीची चर्चा सुरू झाली!

‘डॉक्टर, डार्विनच्या म्हणण्यातही तथ्य आहे, नाही? परंतु जीवनार्थ कलहावर त्याने फारच जोर दिला. प्रताप, वंशपरंपरा गुणधर्म येतात या सिध्दान्तावर तुझा विश्वास आहे?’

‘नाही.’

‘प्रताप, माझी मुलगी तिकडे तुझी वाट पाहात असेल. तुम्हा दोघांना पुष्कळ बोलायचे असेल. जा बोला.’

आपल्याला हाकलण्याची म्हातारीने युक्ती काढली असे त्याला वाटले. तो तेथून बाहेर पडला. त्या मुलीला तो भेटला.

‘प्रताप, आज ज्यूरीतील कामामुळे तुला त्रास झाला. होय ना?’

‘हो. आज माझे मन खिन्न आहे, दु:खी आहे. ते रोजच्याप्रमाणे नाही.’

‘का बरे राजा?’

‘ते सांगता नाही येत.’

‘आपण खरे ते एकमेकांस सांगितले पाहिजे, असे तूच म्हणाला होतास.’

‘परंतु प्रत्यक्षात सारे जमत नाही. आपण का सारी चांगली माणसे असतो? कापराला पाठ-पोट नाही, त्याप्रमाणे सज्जनांना आत-बाहेर नाही. परंतु ज्यांना आपले सारे जीवन उघडे करून दाखवता येईल अशी माणसे या जगात असतील? मी तरी फारसा चांगला नाही. मी सारे कसे कोणाला सांगू? मी सारे खरे सांगू शकत नाही.’

‘प्रताप, आपण सारीच वाईट आहोत. तूच काही एकटा वाईट नाहीस. आपण सारी माणसेच आहोत.’

‘जाऊ दे. मी आज निराश, निरूत्साही आहे. अधिक काय सांगू? मी नेहमी असतो असे नाही. परंतु आज तर नाहीच नाही.’

‘तू पत्ते खेळायला येतोस?’

‘मला जायचे आहे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel