स्वत:च्या खर्चापुरता घेऊन बाकीचा सारा खंड तो गावच्या हितार्थच खर्च करणार होता. परंतु स्वत:च्या खर्चाला किती लागेल याची कल्पना नव्हती. तिकडे काळया पाण्यावरच राहायचे झाले तर किती खर्च येईल? आणि रूपा सुटली तर किती खर्च येईल? काय काय होईल पुढे? त्याला काहीच अंदाज येईना. या दुसर्या ठिकाणच्या जमिनीचा खंडही त्याने निम्म्याने कमी केलाच होता, परंतु अजून सर्वस्वी सोडचिठ्ठी त्याने दिली नव्हती.
आजरूपाचा ‘न्यायमूर्तींच्या मंडळा’ने अर्ज फेटाळला. आता फक्त राजाकडे दयेचा अर्ज करायचा, हे सांगण्यासाठी तो तुरूंगात जायला निघाला. त्याने अर्ज नीट लिहून आणला होता. रूपाची त्याच्यावर सही घ्यायची होती. तो तुरूंगात आला. तेथे दवाखान्याचा द्वाररक्षक होता. त्याने प्रतापला ओळखले.
‘तुम्ही तिला दवाखान्यांत उगीच ठेवायला सांगितलेत. तिला तेथून पुन्हा मूळच्या कोठडीत पाठवण्यात आले. असली माणसे फुकट. तो म्हणाला.’
‘का? काय केले तिने?’ प्रतापने विचारले.
‘तेथे शेण खाल्लेन. तेथील दुय्यम डॉक्टराजवळ लघळपणा करू लागली. मुख्य डॉक्टराने तिला हाकलून दिले.’
ही बातमी ऐकून प्रतापला वाईट वाटले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. ‘मी तुझ्याजवळ लग्न लावीन असे हिला मी सांगत असतो. तरी हिने असे करावे! या माकडचेष्टा कराव्या! ती माझा त्याग स्वीकारायला तयार नाही. काय म्हणून तिने मला क्षमा करावी? माझे सारे करणे मानभावीपणाचे तिला का बरे वाटू नये? परंतु ती जर मला तुच्छच लेखीत असेल, तर मी आता तिच्यासबंधींच्या कर्तव्यापासून मुक्त नाही का झालो? मी काळया पाण्यावर तिच्याबरोबर कशाला जाऊ? आम्ही एकत्र राहण्याची शक्यता नाही. ती पती म्हणून माझा स्वीकार करणार नाही. मग अत:पर माझे काय कर्तव्य?’ असे विचार त्याच्या मनांत येत होते. इतक्यात जेलर तेथे आला. तो नवीन होता.
‘काय आहे काम?’
‘रूपाची भेट. ती कैदी आहे.’
‘ठराविक दिवशी भेट मिळते. आज मिळणार नाही. आधी अर्ज करा.’
‘परंतु मला वाटेल तेव्हा भेटायची परवानगी आहे. गव्हर्नराची परवानगी आहे. परवानगीपत्र माझ्या खिशांत आहे. त्याप्रमाणेच एका राजकीय कैद्याचीही भेट हवी आहे.’
‘राजकीय कैद्यांच्या भेटी बंद करण्यात आल्या आहेत. ही कोण रूपा आहे तिची भेट मिळेल.’ जेलर म्हणाला.
एक शिपाई रूपाला बोलवायला गेला. आणि ती आली. आज तो थोडा कठोर झाला होता. परंतु कर्तव्य पार पाडावे म्हणून तिच्याशी बोलू लागला.
‘तुझ्यासंबंधीचा अर्ज फेटाळला गेला. वाईट झाले.’ तो म्हणाला.
‘मला वाटलेच होते.’ ती म्हणाली. ती दु:खी होती. तिची छाती खालीवर होत होती. ‘तुला असे का वाटत होते,’ म्हणून विचारायचे त्याच्या मनात होते. परंतु त्याने विचारले नाही. तिच्या डोळयांत त्याला अश्रू दिसले, परंतु त्या अश्रूंनी त्याला आज करूणामय बनविले नाही. त्याला तिची अधिकच चीड आली. परंतु त्याने आपली तिरस्कारभावना आवरली.