त्यातून स्वस्त दराने तुम्हांला कर्ज मिळत जाईल अशी व्यवस्था केली तर चालेल?’
‘चालेल. काही तरी न्याय येऊ दे. श्रमणारा उपाशी न मरो. त्याची मुलेबाळे, बायकामाणसे उघडी न पडोत.’
ते सारे चर्चा करीत निघून गेले. रस्त्यात एक बाई त्यांना म्हणाली, ‘त्याच्याविषयी शंका नका घेऊ. तो आत्म्याच्या पाठीमागे लागला आहे. परमार्थाकडे तो वळला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो काल सारे पैसे गरिबांना देत होता.’
आज रात्री तो तेथून जायला निघाला. ते मावश्यांचे घर त्याने विकून टाकायला सांगितले. शेतकर्यांच्या बाबतीत काय काय करायचे त्याने दिवाणजीस सांगितले. तो त्यांनाही रजा-कायमचीच-देणार होता. परंतु काही दिवस त्यांची अजून जरूर होती. त्या घरातील काही महत्वाची पत्रे त्याने बरोबर घेतली. तो रूपाचा फोटो त्याने आधीच घेतला होता. घरातील सारे सामान विकून टाकायला त्याने सांगितले.
तो परत शहरात आला. त्याला आपल्या वडिलोपार्जित भव्य वाडयात जाववेना. त्या ऐषआरामी प्रासादात, सर्व सुखसोयीनी संपन्न अशा राजवाडयात त्याला जायला लाज वाटत होती. त्याने एका निवासालयात भाडयाच्या दोन खोल्या घेतल्या. तेथे तो उतरला. तो आपल्या त्या श्रीमंत घरी गेला. त्या मोलकरणीस म्हणाला,
‘हा वाडा मला नको. मी हा बहिणीला देऊ इच्छितो. ती सध्या येथे नाही. ती आल्यावर तिला विचारीन. तिलाही नको असला तर विकून टाकीन. परंतु मी अशा घरात अत:पर राहणार नाही. हे भव्य घर म्हणजे आमचे पाप आहे. ही श्रीमंती म्हणजे आम्ही केलेले अन्याय. मी जातो. थोडेसे सामान घेऊन जातो.’
जरूरीचे सामान तो घेऊन गेला. त्या दोन खोल्यांत सामान्य माणसाप्रमाणे तो राहू लागला. तो स्वत:चे कपडे धुऊ लागला. स्वत:ची खोली झाडू लागला. स्वत:चे अंथरूण घालू लागला, काढू लागला. प्रतापचा जणू पुनर्जन्म होत होता. त्याला नवजीवन प्राप्त होत होते.
तो तुरूंगातील स्वीकृत कर्तव्ये पार पाडायला बाहेर पडला. वाटेत त्याला एक जुना लष्करी अधिकारी भेटला. प्रतापचा तो लष्करी मित्र होता.
‘काय रे प्रताप, तू असतोस तरी कोठे? किती दिवसांनी लेका भेटलास? चल, एका हॉटेलात जाऊ. आज आपण एकत्र जेवू. नाही म्हणू नकोस.’
‘आणि विश्वास, तू इकडे कोठे?’
‘एका लक्षाधीशाच्या इस्टेटीची व्यवस्था सध्या मी बघत असतो. अरे, शेतकरी पै वसूल देत ना. हजारो एकर जमीन. शेतकरी चैन करताहेत. अरे मी त्यांना सुतासारखे सरळ आणले. त्या जमीनदारांचे सारे कर्ज मी फेडले. मलाही भरपूर फायदा झाला. ते जाऊ दे. कोठे जेवायचे आपण?’
‘मला वेळ नाही रे.’
‘कशात गुंतला आहेस? शर्यतींना येणार का?’
‘नाही.’
‘तू का विरक्त झालास? कोठे चाललास? कोणत्या कामात एवढा गर्क आहेस?’
‘मी एका वकिलाकडे जात आहे.’