‘तिला मूल झाले होते. ते कसे होते?’
‘मूल आजारी, तीही आजारी. आम्ही मुलाला अनाथालयात पाठवले. दुसर्यांनी मुलास मरू दिले असते. परंतु मी जवळचे पैसे अनाथालयास दिले. परंतु शेवटी मूल मेले.’
‘कसे होते ते बाळ.?’
‘त्याच्याहून अधिक चांगले बाळ मी कधी पाहिले नाही. जगांत असे सुंदर मूल मिळाले नसते. तुझीच प्रतिमा जणू, तुझी छोटी मूर्ती!’
शेवटी तो बाहेर आला. तेथे ती मुले उभी होती. कडेवर मूल घेऊन एक अशक्त बाई तेथे उभी होती.
‘ही ती गरीब बाई.’ मुले म्हणाली.
त्याने तिला दहाच्या दोन नोटा दिल्या. आता रस्त्यात त्याच्याभोवती गर्दी जमू लागली. जो तो आपली करूण कहाणी सांगून पैसे मागू लागला. तो कोणाला पाच, कोणाला दहा रूपये देत होता. त्याच्या खिशांतील सारे पैसे संपले. एक बाई येऊन म्हणाली,
‘माझी जरा गाय गेली तर कोंडवाडयात घालून ठेवली तुमच्या दिवाणजीने. मुलांना काय देऊ? ती गाय सोडायला सांगा. कुठून आणू कोंडवाडयाची फी? म्हणतो, फी भर नाही तर कामाला ये चार दिवस. मी का गाय मुद्दाम दवडली? मूल रडत होते म्हणून जरा गेले तर इकडे गाय गेली. मला तो दिवाणजी म्हणाला, ‘का गेलीस गायीला सोडून?’ पोराला कोण तो पाजणार होता? आणि गाईने काही नुकसान केले असते तर गोष्ट निराळी. म्हणे मी गुरे कोंडवाडयात न घातली तर गवत तरी राहील का?’ ती असे बोलत होती तो दिवाणजीच तेथे आले.
‘माझी गाय आजपर्यंत कधी गेली होती तुमच्या गवतात? सांगा. हे धनी आहेत येथे.’
‘अग, पण चार दिवस कामाला ये. मी गाय आता सोडतो.’
‘येईन कामाला. गाय आधी सोड. तिला गवताची काडीसुध्दा खायला तुम्ही घातली नाही. पाणी तरी पाजले आहे का? मुके जनावर, कोठे फेडाल पापे? सार्यांचे तळतळाट घेऊन कोठल्या नरकाची धन करणार आहात?’
‘तुमची गाय देतील हे.’
‘द्या. मी करू तरी काय काय? नवरा दारू पितो, सासू पडून असते. इकडची काडी तिकडे करील तर शपथ! मी थकून जाते दादा.’
त्याने तिला पाच रूपये दिले. तो घरी आला. गावातील ती गरिबी, ती हलाखी, ती दुर्दशा व ते अन्याय पाहून तो बेचैन झाला होता. हे लोक अन्याय सहन करतात तरी कसे? आणि आम्ही एवढा अन्याय करू कसे शकतो? तो विचार करीत बसला. रात्री तो जेवला नाही. तो अंगणात फेर्या घालीत होता. हे खोत, हे जमीनदार एवढाल्या जमीनदार्या, खोत्या ठेवू कसे शकतात? सर्वत्र या चोरांचे हक्क आणि श्रमणार्यांचा हक्क कोठेच नाही! त्याला फक्त उपाशी मरणाचा हक्क! आम्ही जमीनदार का सारे दगड बनलो आहोत? येथे माणसे उपाशी मरत आहेत. त्यांना खायला नाही. आणि आम्ही चैन करीत आहोत. माझ्यासाठी येथे श्रीखंडपुरीचे जेवण आणि त्या लक्ष्मीच्या पोरांना दुधाचा टाक नाही. शेतकर्यांच्या घरी दुध-दुभते नाही. कारण कुरण नसल्यामुळे, सर्वत्र मोफत गायराने नसल्यामुळे, त्यांना गाईगुरे ठेवता येत नाहीत. आणि पुरेशी शेती जवळ नसल्यामुळे घरात दाणा नाही. यांना अन्न नाही, वस्त्र नाही, काही नाही. आणि या जमीनदारांनी सूटबूटांत फिरावे, बंगले बांधावे, रेडिओ ऐकावे, मोटारी उडवाव्या, रिस्टवॉचे लावावी. शेतकरी गरीब का म्हणून? शेकडो वेळा चौकशी झाली. परंतु मूळ प्रश्नाला कोणीच हात घालीत नाही. वर वर मलमपट्टी, थातुरमातुर प्रयोग! जमीन एकाच्या ताब्यात असताच कामा नये. हवा, पाणी, प्रकाश याच्यावर सर्वांची सत्ता; त्याचप्रमाणे जमीनही सर्वांच्या मालकीची हवी. मी परवा आईची जमीन खंडाने दिली ती चूकच. मी माझ्याकडे मालकी काय म्हणून ठेवावी?