आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य. पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नाहीए. आजकाल जाहिराती अगदी कुठेही दिसतात. चित्रपटात, त्यातल्या गाण्यांत, वर्तमानपत्रात, बातम्यांच्या ब्रेक मध्ये, सिरियल्सच्या ब्रेकमध्ये, होर्डींग्ज वर, पुलांवर, भिंतींवर, रिक्षेवर, घरांवर, भींतींवरल्या घड्याळांमध्ये, टी शर्टांवर, लहान मुलांच्या चॅनेल्सवर, वाहनांवर, कॅलेंडरवर, मुलांच्या वह्या-पुस्तकांवर, कॅरी बॅग्जवर, बस स्टंण्ड्वर, एस. टी. बसेस च्या स्थळदर्शक पाट्यांवर, रेल्वेवर, लोकलमध्ये....!!!

कुठे जाहिरात होत नाही हे आठवायला आपल्याला बराच वेळ लागेल आणि कशावर, कुठे, केव्हा आणि कशाची जाहिरात आपण करतो याचाही ताळतंत्र कंपन्यांना आणि ती जाहिरात स्विकारणार्‍यांना उरलेला नाही.सगळ्यांना फक्त जाहिरातीतून येणारा पैसा दिसतो आहे आणि हवा आहे....बाकी इतर कशाशी काही घेणे देणे नाही.
.....तर ही गोष्ट आहे जाहिरातने व्यापून व्यापून थोड्याश्याच उरलेल्या उर्वरीत जगाची. अशा या जगात गोलू गंमतबाज हा मध्यमवर्गीय साधा "सुधा" सज्जन माणुस. या वाक्याचे प्रायोजक: सुधा सरबत. तुमची क्षुधा शांती करा...!!


एकदा गोलू सजनी चित्रपट बघायला गेला. त्यात एक सिक्स पॅक असलेला तगडा हीरो सजनी नावाच्या खलनायकाला शोधत असतो.

त्याच्या प्रत्येक पॅक वर लिहिलेले असते,

"या हिरोने आमच्या दणकट जीम मधून एवढे पॅक कमावले आहेत. तुम्हीही जॉईन करा. दणकट जीम. आमची थीम. दणकट जीम."

हिरोच्या छातीवर भलामोठा मोबाईल नंबर होता. (पडद्यावर खाली जाहिरात आली: शक्यतो मीनीटॅक्स मोबाईल हॅण्डसेट वापरा आणि कायडीया चे सीम घ्या) प्रथम गोलूला वाटले की हा नंबर सजनी चा असेल. पण तो नंबर होता जीम चा. दर पाच मिनिटांनी हीरोच्या मोबाईलवर रिमाईडर येते -

"टीक टीक. टुक टूक. फॅनन कॅमेरा. मजबूत कॅमेरा. वापरा. वापरा ना."

शेवटची धूमधाड मारामारी पाहून गोलू रिक्षेत बसला.

रिक्षावाल्याचे केस मागच्या बाजूने अशा पद्धतीने कापले होते की त्या केसातून खालील संदेश रिक्षेत बसणार्‍यांच्या माथी मारला जात होता -

"काळे कुट्ट केस होण्यासाठी. झंणझणादी केश तेल. वापरा. वापरा ना. . "

रिक्षावाल्याने टेप लावला. गोलूला वाटले आता गाणे ऐकायला मिळतील. पण कसले काय?

टेप मधून आवाज आला-

"रोजचा प्रवास करून थकता? डोके दुखते? रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे हाडे दणादण खिळखिळी होतात? वापरा ग्रूव्ह मलम. तुम्ही ज्या रिक्षात बसले त्या रिक्शा वाल्याकडे उपलब्ध. "

रस्त्यावर विविध वाहनांचे कर्कश भोंगे वाजत होते. भोंग्यातून सुद्धा जाहिराती भगभगत बाहेत येत होत्या.

"पी पी.. पीपीप .. माणसा तू पी .. तू पी फक्त भोका भोला पेय पी .. पी तू पी"

"पी पी पी पीप .. टर्बो चहा पी....मर्त्य माणसा. टर्बो चहा पी रे आपली तब्येत सुधरव रे.. मुर्ख माणसा एक रे!"

असे भोंगे होते ते.

पुढे ट्रॅफिक जाम होते.

अचानक रिक्शेत दोन हात घुसले.

एका हातात होते झनक झनक जाम.

"ट्राफिक जाम. डोण्ट वरी."

"आमचा जाम पावाला लावा. ट्रॅफिक जाम मध्ये जाम एन्जॉय करा. "

दुसर्‍या हातात रिस्की कंपनीची व्हिस्की होती.

"आजचा ट्रॅफिक जाम सेलिब्रेट करा, रिस्की व्हिस्की सोबत."

त्याने दोही हातांना स्वतःच्या हातांनी पुढे जाण्याचा रस्ता दाखवला.

त्याचे डोके या प्रकाराने भलतेच जाम झाले होते. गोलू गलबलला.

जाम सुटल्यावर रिक्शावाला पेट्रोल भरायला रांगेत उभा राहिला. पुढे विचित्र घटना घडत होती.

पेट्रोल पंपावरचा पोर्‍या माजपाल मार्दव हा रांगेतल्या प्रत्येकाला शर्ट काढायला लावून बनियनची कंपनी तपासत होता.

"थापा ट्रंकलाईन बनियन घातलंय का तुम्ही? तर चला पुढे."

असे म्हणून थापा बनियन वाल्यांचा नंबर आधी लावत होता.

कारण पेट्रोल पंप थापा कंपनीचा प्रायोजक होता.

शेवटी एकदा नंबर लागला. पेट्रोल भरले.

रस्त्याने ज्या मोठमोठ्या बिल्डींग्ज होत्या त्यावर खालील प्रकारे पाट्या होत्या:

"येथे प्रवेश करण्यापूर्वी सावधान! ही के.के. सिमेंट सोसायटी आहे. मजबूत बांधकाम. मजबूत्त रहिवासी. "

"केशियन पेण्ट को ऑपरेटिव्ह सोसायटी. या इमारतीच्या पेण्ट सारखीच येथे रहाणार माणसेही रंगीबेरंगी आणि रंगिली आहेत. हुकूमावरून. आणि पुढे जॅकी श्रॉफ चे हसरे चित्र होते."

गोलूला जाहिरातंचा मारा पाहून गालातल्या गालात गलबलून आले.

सिग्नल आला. रिक्शा थांबली. सिग्नलजवळच्या होर्डींग जवळ शैश्वर्या मोठ्या ऐटीत चेप्सी पीत होती असे चित्र होते.
तीने ते पेय तोंडाला लावले होते.

अचानक तीने ती बाटली तोंडातून काढली आणि काय आश्चर्य! त्या बाटलीचे बूच बंद होते.

ती गोलू शी बोलू लागली.,

"मित्रा गोल्या. मी ही असली पेयं कधीच पीत नाही।

जाहिरातीत समजूतदार माणसाने नीट पाहीले तर असे दिसून येईल की मी आणि तो खेळाडू आम्ही पिण्याची नुसती अ‍ॅक्शन करतो. पीत नाही।
बाटलीला लावलेले बूच याची साक्ष आहे."

असे म्हणून तीने पुन्हा बंद बातली तोंडाला लावली. गोलू च्या गालावर आश्चर्य अश्रू येवून तो गलबलला...

सिग्नल मोकळा झाला.

घरी पोहोचल्यावर लिफ्टमध्ये तीन नंबर दाबतांना वरच्या स्पिकरमधून आवाज आला,

"सर्दी, वेदना आणि डोकेदुखी पासून आराम. एक बाम. तीन काम. भोंदू बाम. आला तिसरा फ्लोअर. उतरा."

घरी पोहोचल्यावर त्याने टी.व्ही लावला. वर्तमानपत्र हातात घेतले.

वर्तमानपत्रातून शंभर जाहिरातीचे कागद भिरभिरत खाली कोसळले.

आख्खे वर्तमानपत्र चाळून झाले पण बातमी सापडली नाही. सगळीकडे जाहिरातीच होत्या. गोलू ला गलबलून आले.

टी.व्ही वर बातम्या सुरु झाल्या.

"नमस्कार. मी शशांक शोर. मला आलाय खुप जोर.

मी आता जोराजोरात बातम्या ओरडणार आहे. त्यापूर्वी आपणासाठी एक संदेश.

मी आज घरून निघतांना कोणते बूट घातले माहीती आहे का तुम्हाला?

नाही ना.?

कॅमेरा त्याच्या पायाजवळ गेला.

दिसले का? बाबटा बूट. करारे बूट.

आणि माझा शर्ट. चीटर पींग्लंड चा आहे.

म्हणून तर मी बातमीदार म्हणून उठून दिसतोय नाही का.?

चला तर पुढे! मी बातम्या वाचतो. तुम्ही ऐका हं."

थोड्या वेळाने तोडके कपडे घालून हातात माईक घालून एक स्त्री आली. बहुदा ती बातमी वाचणारी असावी.

"थांबा. काय घाई आहे एवढी बातम्या ऐकण्याची?

काही असतं का आजकालच्या आमच्या बातम्यांमध्ये?

मी बातमी वाचण्यापूर्वी लक्षपूर्वक पहा.

कुठे काय विचारता?

माझ्या ओठांवर लावलेल्या लिप्स्टीक कडे बघा. ला लैला या कंपनीची आहे ती लिप्स्टिक.
वापरा. तुम्हीपण.
छान आहे.

चला आता बातम्यांकडे वळू. "

गोलूने चॅनेल बदलले तेव्हा एक लहान मुलांचे कार्टुन चॅनेल होते आणि त्यावर ब्रेक होता.

"चपात्या वगैरे खात जावू नका.
चॉकलेट, बिस्कीट, टोस्ट, बर्गर, पिज्जा, नूडल्स हे अतिशय पौष्टीक अन्न आहे. ते खात जा.
तसेच आपल्या दातांचे रक्षण कोण करतो माहितेय? डेंटिस्ट.
त्यांनी नी सूचवलेला ब्रांड वापरा, मुलांनो."

नंतर अजून एक जाहिरत लागली.

अल्टीमेट "विरोध" (अंडोम) ची जाहिरात लागली होती.

नंतर डिओडरंट स्प्रे आणि विविधरंगी अंतरवस्त्रे घालून ते दाखवणार्‍या मॉडेल चकाकत होत्या.

पुन्हा जापानी कार्टून सुरू झाले.

...एवढ्यात गोलू ला मोबाईलवर कॉल आला,

"कर्ज हवे का कर्ज"

"नको"

"ते काही नाही. मी येतोय. तुमच्या घरी. थेट भेट घ्यायला।

कर्जाची रक्कम द्यायला."

गोलू रडू लागला, "मला कर्ज नको आहे. मला तुम्ही त्रास देवू नका."

"ते काही नाही. मी येतोय. एका तासात तुमच्या घरी पोहोचतोय"

"माझा नंबर, पत्ता तुम्हाला कोणी दिला?"

"तुमचे ज्या बँकेत खाते आहे ना, त्यांनी विकला तुमचा पत्ता आणि नंबर आम्हाला. हा मी निघालो आणि हा पोहोचतोच..."

त्या माणसाला टाळण्यासाठी गोलू टि.व्ही. बंद करून घराला कुलूप लावून बागेत जावून बसला.

बाकड्यावर. एकटाच.

बगीच्यात खेळणे विकणार्‍या कंपन्यांचा सळसळ सुळसुळाट होता.

बाजूच्या बाकड्यावर बंडु आणि बंडी घातलेली बंदिनी असे लग्न बहुदा न झालेले जोडपे बसले होते.

एक विक्रेता हळूच त्यांचेजवळ आला. म्हणाला.

विक्रेता: "साब. कॉण्डोम
पायजेल का?"

बंडू: "नको रे."

विक्रेता: "साब. ऐकून तर घ्या. आमची ऑफर आहे."

बंदिनी: "अय्या ऑफर. कसली?"

विक्रेता: "आमच्या कंपनीच्या या कॉण्डोम
सोबत "झटपट प्रेग्नन्सी टेस्ट किट" बिल्कुल फ्री!!"

गोलू जाहिरातिरेकाला कंटाळून अवकाशाकडे बघू लागला. त्याला खूप गलबलून आले.

आकाश नीट दिसतच नव्हते. ते विविधरंगी फुग्यांनी आणि पतंगानी भरलेले होते. प्रत्येक फुगा आणि पतंग यावर विविध कंपन्यांच्या जाहिराती होत्या.

येथे लेखाचा द एण्ड आहे, पण जाहिराती टू बी कंटिन्युड....


******कृपया आपल्या प्रतिक्रिया कथेच्या खाली आपल्या  gmail ने login करून जरूर द्या किंवा मला इमेल ने प्रतिक्रिया पाठवा. कथा आवडल्यास माझा ब्लॉग सर्वाना वाचायला सांगा तसेच फेसबुक, ट्विटर वर जरूर शेअर करा. धन्यवाद!! sonar.nimish@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel