महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com)

#महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) 

सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते. आपल्याच नातवांमध्ये सत्याने वागणारे पांडव दिसत असूनही धृतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या दबावाखाली आणि त्यांनी घेतलेल्या काही शपथेपायी त्यांनी चुकीच्या व्यक्तींचा म्हणजे कौरवांचा पक्ष घेतला आणि पांडवांना त्याचे नुकसान सोसावे लागले. म्हणजे मनात वेगळे करायचे पण करावे लागते वेगळेच असे मानसिक द्वंद्व भीष्म सोसत राहिले. पण शेवटी देव (कृष्ण) सत्याचा वाली असतो.
मग देवाने पांडवांची बाजू घेतली आणि विजय सत्याचा झाला आणि होतोच. कुणाच्या बाजू घेण्याने अथवा न घेण्याने सत्य बदलत नाही. आजच्या जीवनात सुद्धा आपल्याला तेच दिसते. नि:पक्षपातीपणा आजकाल क्वचितच आढळतो. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात कुणीतरी प्रभावशाली माणूस नियम लावताना "बाजू" कुणाची आहे हे पाहून निर्णय देत असतो. म्हणजे बाजू पाहून नियम वाकवले जातात. नियमांचा उपयोग स्वत:च्या फायद्यानुसार वाकवून केला जातो. नावडतीचे मीठ अळणी असा काहीसा हा प्रकार आहे. राजकारणात याहून वेगळे चित्र नाही. सत्ताधारी कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, पण सत्ताधारी चांगले निर्णय घेत असले तरी फक्त विरोधाला म्हणून विरोधी पक्षाकडून नावाला शब्दशः: जागून विरोध केलाच जातो आणि चांगल्या गोष्टी अमलात आणल्या जात नाहीत आणि सत्याचा विजय व्हावा अशी वाट बघणारा सामान्य माणूस त्याची आशा गमावून बसतो. "विरोधी पक्ष" असे नाव बदलले आणि "देखरेख पक्ष" असे नाव ठेवले तर? मानसिकतेत बदल होईल का?


महाभारताचे जीवन सार: (भाग २)

अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:

आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.
खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.
हे झाले अर्धसत्य!
तर यावरून मला असे लक्षात येते की आपल्याला हवे तसे आभासी चित्र इतरांसमोर निर्माण करण्यासाठी आणि स्वार्थासाठी बोललेले अर्धसत्य हे असत्यापेक्षाही निर्दयी आणि भयंकर नुकसानकारक असते...
पण सर्वांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि सैतानी शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सांगितलेले अर्धसत्य हे प्रत्यक्ष सत्यापेक्षाही श्रेष्ठ असते.
तसेच कधीही काही कारणास्तव तुम्ही सत्य सांगू शकत नसाल तर संपूर्णपणे असत्य बोलण्यापेक्षा केव्हाही अर्धसत्य बोलणे श्रेयस्कर असते!!
वेळ आली की सत्य समोर येतेच येते. पण ती वेळ साधणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वेळेला प्रकट झालेल्या सत्याचा त्या त्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळा परिणाम होत असतो.
(सुचना: महाभारत हे आजपर्यंत अनेक पुस्तके आणि सिरियल्स मधून माझ्यासमोर आले आहे. त्या आधारे मी हे लिहितो आहे. एकाच प्रसंगाबाबतचा दृष्टीकोन अनेक पुस्तकात आणि लोककथेत आणि सिरियल्स मध्ये वेगवेगळा आढळला आहे. तेव्हा मला जे प्रसंग वाचून, ऐकून किंवा मालिकेतून पाहून माहित झाले आहेत त्याच्या आधारे मी काही प्रसंग मांडत आहे. त्याबद्दल मतभेद असू शकतात.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel