पूर्वीपासूनच अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना केली जाते.
कोण श्रेष्ठ यावर वाद होतात. प्रत्येकाचे समर्थक आपापल्या भूमिकेवर ठाम असतात.
पण, एक मूळ मुद्दा कुणी लक्षात घेत नाही की मुळातच ही तुलना करणेच चुक आहे.
कसे?
कारण तुलना करण्यासाठी आधी त्या दोन गोष्टींत एक मूळ साम्य सावे लागते.
तुम्ही म्हणाल हे कसे?

एक उदाहरण देवून सांगतो : तुम्ही सचिन तेंडुलकर आणि सुनिता विलियम्स यांची कारकिर्दीची तुलना कराल का? नाही. कारण दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी. पण सचिन आणि सुनील गावस्कर यांची तुलना करू शकता. कारण दोघांत एक मूळ साम्य आहे. त्यांची कार्यक्षेत्रे एकच आहेत. म्हणजे हेच ते तुलना करण्यासाठी लागणारे मूळ साम्य.

तसेच अध्यात्म आणि विज्ञान या मुळातच दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यात आपण तुलना करूच शकत नाही. दोघांत कोण श्रेष्ठ हेही ठरवणे योग्य नाही. एकाचा निकष दुसऱ्याला लावून उपयोग नाही. विज्ञानाच्या नियमांचा निकष लावून अध्यात्म कसे तपासता येईल? आणि अध्यात्माच्या पातळीवर विज्ञान कसे खरे उतरेल? दोन्ही शक्य नाही. असे करूही नये.

पण असेच होते आहे. माणूस आयुष्यभर या दोघांत गल्लत करतो. एकाच्या मार्गावर गेले म्हणजे दुसरे सोडले पाहिजे असे त्याला वाटते. येथेच चुकते.

दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात सारख्याच महत्त्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी माणसाच्याच विचारशक्तीतून निर्माण झाल्या आहेत. आज काँप्युटर युग असले म्हणून काय झाले? काँप्युटर शेवटी माणसानेच बनवले आहे. विचारशक्तीच्या आधारे.

हा विचार नेमका मनात कोठून येतो. हे कुणीच सांगू शकत नाही. वैद्यक शास्त्र सुद्धा नाही. विचार मेंदूतून येतो हे खरे असले तरी विशिष्ट वेळेसच विशिष्ट विचार का येतो? एखादी अशी शक्ती ( विज्ञानाच्या आकलनापलिकडे, विज्ञानाच्या कोणत्याच नियमात न बसणारी ) आहे जी आपल्या मनात विचार 'टाकते'... अशी शक्यता नाकारता येत नाही. मानव चंद्रावर जावून जरी पोहोचल असला तरी, ज्या उपकरणां आधारे तो चंद्रावर पोहोचला ती उपकरणे मानवानेच बनवली आहेत आणि ती ही विचारशक्तीच्या आधारे!

काँप्युटर बनते सिलिकॉन धातूंच्या चिप्स पासून. तो धातू पृथ्वीच्यापोटात आधीपासूनच होता. आपण फक्त विचार करून तो वापरला. हा वापरण्यासाठीचा विचार विशीष्ट व्यक्तीच्या मनात विशीष्ट वेळेस का येतो? या सगळ्या गोष्टींच्या उत्तरासाठी अध्यात्म आहे. अश्या काही शक्ती जरुर आहेत ज्या आपल्या विचारांना कंट्रोल करतात? मग ती शक्ती आपण ग्रहाची म्हणू शकतो किंवा देवाची की अजून दुसरीच कुठलीतरी ! आपण त्या शक्तीचा शोध पुर्णपणे लावू नये अशी त्या शक्तीची इच्छा तर नसेल?

आपण म्हणतो माणूस आपल्या जीवनाचा शिल्पकार! बरोबर आहे. म्हणजे आपण जी कृती करतो, त्यानुसार आपले जीवन घडत जाते. पण मग एक प्रश्न शिल्लक राहतो. कृती आधी मनुष्य विचार करतो, आणि या विचाराचा उगम कोठून?

एक उदाहरण : एखादा माणुस एक नेहेमीचा रस्ता न पकडता अचानक आतला आवाज ऐकून दुसऱ्या रस्त्याने जातो आणि त्या रस्त्यावरच त्याचा अपघाती मृत्यू झाला, तर एका प्रश्नाचे उत्तर विज्ञान देवू शकत नाही की, त्याच्या मनात अचानक रस्ता बदलायचा विचार का आला?

त्याचवेळेस का आला?
हे विधीलिखित होते का?

त्यासाठी अध्यात्म आहे.

फक्त विज्ञान सगळ्याच गोष्टींचे आपल्या नियमात बसवून स्पष्टीकरण देवू शकत नाही.

सांगायचा उद्देश असा की विज्ञान आणि अध्यात्म यात तुलना न करता, त्या दोन्ही गोष्टींची आपल्याला गरज आहे. दोन्ही आपापल्या परिने श्रेष्ठ आहेत. विज्ञानयुग आहे म्हणून ज्योतिष, देव, अध्यात्म, भूत, अतिंद्रीय शक्ती नाहीतच असे म्हणता येणार नाही. विज्ञानाच्या नियमात बसवता आल्या नाहीत म्हणून त्या गोष्टी लगेच खोट्या ठरत नाहीत.

कारण विज्ञान व त्याचे नियम हे सुद्धा मानवानेच 'विचारशक्ती' च्या आधारे बनवले आहे.

मग तेच तेवढे खरे आणि मानवानेच 'विचारशक्तीच्या' आधारे बनवलेले ज्योतिष, देव, अध्यात्म, भूत, अतिंद्रीय शक्ती नाहीतच (खोटे आहेत) असे म्हणता येणार नाही. की अजून तिसरेच काही आहे ज्याचे गुढ आपल्याला उकलले नाही ...

आपल्याला काय वाटते?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel