तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील. क्वचित असा एखादा असतो जो त्या कागदाला हातात घेऊन त्याला उलगडून पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कागदात काय लिहिले आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला पुन्हा त्याच्या हरवलेल्या पुस्तकात ठेवतो. रस्त्यात एखादा स्प्रिंग आणि स्पंज सापडला तर जरूर कुणीतरी त्याला दाबून बघतो. रस्त्यात दगड असला तरी कुणी सहसा त्याच्या वाटेला जात नाही!
समजा तुम्ही एकदा जगाला दाखवले की तुम्ही कुणालाही नेहमी खूश ठेवण्याचा प्रयत्न करता, मऊ आहात, स्पंज आणि स्प्रिंग आहात तर तुम्हाला सतत दाबून ठेवणारे लोक या जगात पुष्कळ मिळतील. पण जर जगाच्या दृष्टीने तुमची प्रतिमा स्प्रिंग अथवा स्पंज ऐवजी दगड अशी असली तर कुणी तुमच्या वाटेला जाईल का? नाही. कारण दगडाला स्प्रिंग सारखे दाबण्याचा प्रयत्न केला तर दाबणाऱ्याचा हात रक्तबंबाळ होईल तसेच दगडात इतरांचे रंग स्पंजासारखे शोषले जाण्याची शक्यता नसतेच!
नेहमी दगड बनावे असे नाही पण तुम्ही जर स्प्रिंग आणि स्पंज असाल तरी तुमची दुसरी बाजू मात्र विसरू नका.
म्हणजे कसे ते सांगतो. तुम्हाला माहीत आहेच की निसर्गनियमा नुसार म्हणजेच भौतिकशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया असतेच! त्यानुसार स्पंज आणि स्प्रिंग याना "प्रतिक्रियेची" दुसरी बाजू असतेच.
म्हणजे कसे ते सांगतो. तुम्हाला माहीत आहेच की निसर्गनियमा नुसार म्हणजेच भौतिकशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया असतेच! त्यानुसार स्पंज आणि स्प्रिंग याना "प्रतिक्रियेची" दुसरी बाजू असतेच.
त्यानुसार, दाबले जाण्याची दुसरी बाजू (गुणधर्म) त्याच तीव्रतेने उसळणे हीच असते. तुम्ही स्प्रिंग असाल म्हणजे सतत दाबले जात असाल (म्हणजे भावनांचे दमन, सतत फक्त इतरांच्या स्वार्थाचा विचार करणे, स्वत:चा विचार सोडून!) तर स्प्रिंग हा जास्त दाबल्यास उसळतो आणि दगडापेक्षाही जास्त इजा करतो हे मात्र लोकांना दाखवायला विसरू नका. एवढेही अपेक्षांचे ओझे आणि वजन मनाच्या स्प्रिंगवर ठेवू नका की तुम्ही तुमचा उसळणे हा गुणधर्म विसरून जाल किंवा तुमच्यात उसळण्याची ताकदच उरणार नाही.
तुम्ही स्पंज असाल तर लक्षात ठेवा की एवढेही स्पंज बनू नका की तुमच्यात शंभर टक्के फक्त इतरांचा रंग शोषला जाईल आणि तुमच्या स्वत:च्या रंगाला जागाच राहणार नाही. स्पंजाची दुसरी बाजू (गुणधर्म) सुद्धा लोकांना दाखवायला विसरू नका. म्हणजे वेळ पडल्यास पिळल्यानंतर एका क्षणात स्पंज हा स्वत:तले शोषलेले सगळे काही बाहेर टाकून रिकामा होवू शकतो हेही जगाला दाखवून द्या. स्पंजाला अशा प्रकारे रिकामा होण्यास मदत करणारा सव्वाशेर, म्हणजेच त्याला पिळून (चांगल्या अर्थाने!) रिकामा करणारा आणि त्यात स्वसामर्थ्याचे रंग भरणारा कुणीतरी असतोच आणि तो कधीतरी भेटतोच.
तुम्ही कोण आहात? दगड, स्पंज की स्प्रिंग? पण लक्षात घ्या की तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.