- हा चित्रपट म्हणजे एक अविस्मरणीय असा अनुभव आहे. याची देही याची डोळा आपण जगाचा अंत यात बघतो. चुकवू नये असाच हा चित्रपट आहे. मी पाच पैकी पाच मार्क या चित्रपटाला देतो. खरे तर मला चार मार्कच द्यायचे होते पण एक जास्त मार्क कशासाठी ते या परीक्षणाच्या शेवटी सांगतो...
या चित्रपटाच्या कथेविषयी प्रथम थोडक्यात सांगतो- (खरे सांगायचे झाले तर, अशा प्रकारच्या "आपत्तीपटांमध्ये" कथा तेवढी महत्त्वाची नसतेच.)
" सन २००९ मध्ये सतनाम नावाचा एक भारतीय अंड्रियन नावाच्या आपल्या एका अमेरिकन मित्रास एक गोष्ट लक्षात आणून देतो ती अशी की खाणीत खोलवर त्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे व आतले तापमान दिवसेंदिवस असाधारणपणे आणि वेगाने वाढत असल्याचे दिसते. २०१० मध्ये अमेरीकेत यावर महत्त्वाच्या राष्टाध्यक्षांची एक गुप्त बैठक होते व सर्वांना समजते की जगाचा अंत माया सभ्यता च्या कॅलेंडर नुसार खरोखरच जवळ आला आहे. पैसे आणि सत्ता असलेल्या काही लोकांना वाचवण्याचा ठराव होतो आणि चीन मध्ये एक "मोठे जहाज" बनवायला सुरुवात होते. २०१२ मध्ये अमेरिकेत जॅकसन नावाच्या एका लेखकाला हे "अंतिम सत्य" योगायोगाने समजतं आणि तो त्याच्या पूर्वीच्या पत्नी मुलांना आणि त्या पत्नीच्या सध्याच्या मित्राला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न करत चीनपर्यंत कसातरी पोहोचतो.. त्यानंतर काय होतं? कोण कोण वाचतं? हा सगळा प्रकार पडद्यावरच अनुभवण्यासाठी आहे."
चित्रपटाची बलस्थाने:
हा चित्रपट आपण फक्त "पाहात" नाही तर "अनुभवतो"
अशाच प्रकारच्या काही पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा (उदा. इंडीपेंडंस डे) यातले वेगळेपण म्हणजे- यात अमेरिकेने एकाधिकारशाही दाखवलेली नाही. आपणच सर्वज्ञानी आहेत असा आविर्भाव आणलेला नाही.
यातील तांत्रीक करामती अतिशय अप्रतीम असून त्याला तोड नाही. जे घडतं ते अगदी खरंखुरं वाटतं.
चित्रपटगृहात एकट्याने (म्हणजे, मित्रपरिवार्/कुटूंब ओळखीचे कुणी नसतांना) हा चित्रपट बघणे म्हणजे एक धाडस आणि धैर्य लागतं कारण एकामागून एक आपत्ती बघतांना सुन्न व्हायला होते.
चित्रपट्गृहात सिनेमाभर चार ते पाच वेळा शिट्ट्या आणि टाळ्या वाजतात. हॉलिवूडच्या चित्रपटाबाबत असे प्रथमच मी पाहिले. अर्थात त्या कशासाठी वाजतात हे प्रत्यक्ष जाउन अनुभवा.
सगळ्यांनी यात छान काम केले आहे.
अशा चित्रपटांत अर्थातच पार्श्वसंगीत महत्त्वाचे असते आणि ते यात उत्तम आहे. त्यामुळे सगळं अतिशय खरं वाटतं. - उठावदार व लक्षात राहाण्याजोगे प्रसंगः
खालील प्रसंगातील स्पेशल इफेक्ट मुळे ते लाजवाब वाटतात-
अभूतपूर्व भूकंपामध्ये कॅलीफोर्निया आणि सॅन फ्रान्सिस्को ची वाताहत
लॉस एंजिल्स समुद्रात गडप होते.
वॅटिकन सिटी, चर्च, भारत, तिबेट व एक मोठे क्रुझ यांची वाताह्त
रिओ दि जानिरो चा येशू चा पुतळा पडतो.
हिमालाय वितळतो.
पर्वताच्या वरून दिसणारे ज्वालामुखी च्या उद्रेकाचे भयानक चित्रण
लिंकन मेमोरियल टॉवर कोसळते.
सगळात वरचे दृश्य म्हणजे - शेवटचे " मोठे जहाज" आणि त्यावरचे प्रसंग. - काही मोजक्या त्रुटी-
भारत आणि काही इतर देशातल्या इमारती व ठिकाणे यांचे काय व कसे होते हे यात दाखवले नाही. त्याचे कारण मला असे वाटते की- मंदिर, मस्जीद, कुतुबमिनार, ताज महल वगैरे नष्ट होतात असे बघणे कदाचित आपल्याला आवडले नसते. आंदोलनं झाली असती.
हा अडीच तासांचा चित्रपट आहे. अर्थात भारतात आपल्याला त्याची सवय आहे. पण जगभरच्या टीकाकारांकडून मात्र यावर टिका होत आहे. कथेवरही टिका होते आहे. पण, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कथेला जास्त महत्त्व दिले नाही तरी काही हरकत नाही.
काही प्रसंगात जास्तच "चित्रपट- स्वातंत्र्य" घेतलेले दिसते. (सिनेमॅटीक लिबर्टी)
सतनामच्या भूमीकेत भारतीय कलाकारच घेतला असता तर छान झाले असते. पण जिमी खरोखर सतनाम च्या भूमिकेत शोभून दिसतो.
पाच मार्कांचे गुपीत-
चार ऐवजी पाच मार्क मी दिले ते यासाठी-
चित्रपटच मुळात सुरु होतो तो भारतापासून.
केवळ एका भारतीयामुळे सगळे वाचतात असे यात दाखवले आहे.
भारतीय लोक हे शांतता प्रेमी, सहिष्णु, त्यागी, कुटुंबव्यवस्था टिकवणारे असतात हे यात जाणवत राहाते. हा एकप्रकारे आपला गौरवच आहे असे मला वाटते.
तेव्हा, कृपया फक्त चित्रपटगृहातच जा आणि हा चित्रपट बघा, अनुभवा आणि जगा.....
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.