पुण्यालाहि असेंच असेल का ? सारे थंड असतील का ? आपापल्या चैनींतच दंग असतील का ? सारें पुणें नसेल का पेटलें ? सदाशिव, नारायण, शनिवार या पेठाहि नसतील का भडकल्या ? तेथेंहि घरोघर रसपानेंच चाललीं असतील का ? हळदीकुंकवाचे पट्टेच घरासमोर घातलेले असतील का ? वसंतव्याख्यानमालेंत हंसत खेळत ज्ञानचर्चा चालली असेल का ? शंकराचार्य नसतील का गेले हजारों लोक घेऊन तुरुंगांत ? सारे अग्निहोत्री भराभर उठून नसतील का गेले कारागृहांत ? घरेंदारें सोडून नसतील का सारे गेले ? हिंदु संस्कृतीचे लाखों अभिमानी का घरांत असतील ? देवाधर्मासाठी उठले नसतील ? दगडी देवासाठीं पेटले नसतील ? पति तुरुंगांत जातांच पाठोपाठ पत्नी, आईबापांपाठोपाठ मुलें-अशी रांग नसेल का लागली ? हरिश्चंद्राच्याबरोबर तारामती जाते, रोहिदास जातो. श्रियाळ, चांगुणा, चिलया एका ध्येयाची पूजा करितात! पुण्यांतील घरेंच्या घरें येरवड्यांत गेलीं असतील! वर्तमानपत्रांत सरकार बातम्या येऊ देत नसेल! महाराष्ट्र भडकेल, हिंदुस्थान पेटेल, म्हणून पुण्यांतील हजारों, लाखों सनातनींचा महान् सत्याग्रह छापला जात नसेल! परंतु परकी सरकारनें सत्याला प्रसिध्दि दिली नाहीं, एवढयानें सत्य थोडेंच दबणार आहे ? सत्याची थोरवी बिनपंख उडत जात असते.

थोरामोठयांचे पुणें-तें का बोलघेवडें असेल ? तें का पोषाखी असेल ? धर्म त्यांच्या ओठावरच असेल, पोटांत नसेल का ? शक्यच नाही. सर्व मंदिरसंस्कृतीच्या उपासकांनी मारुतीसारखा प्रचंड बुभु:कार केला असेल. पुण्याच्या अठरा पेठा हादरल्या असतील! 'केसरी' नें सिंहगर्जना करुन ''उठा, मरा; दगडी धर्माची प्राणांनीं पूजा करा'' --असें पुण्याला ठणठणून बजावलें असेल.

हें धुळे ऊष्ण हवेंत असूनहि थंड आहे. येथील लोक केव्हां पेटतील ते पेटोत! परंतु पुणें पेटलें असेल. आधीं पुणें पेटावें लागतें म्हणजे मग महाराष्ट्र आज ना उद्यां पेटतो. आधीं पुणें भडकलें पाहिजे. उसाच्या रसांतून, बोलपटांतील गाण्यांतून, पुलावरील मिसळींतून, काबलींतून, चिवड्यांतून तें बाहेर आलें पाहिजे. आलें असेल बाहेर. पुण्यांतील हिंदुमहासभेचे हजारों लाठीवाले स्वयंसेवक अजून का घरांत असतील ? सोन्यामारुती समोर भेरी न वाजवतां पर्वतीच्या पायथ्याशीं का ते शिंगें फुंकीत असतील ? छे, कर्म वेळ आली असतां कोण ती लाथाडील ? वीराला त्यागाची वेळ म्हणजे मोक्षाची वेळ !

वसंता एकटाच पुढें जात होता. अंधार पसरला होता. विजेचे दिवे केव्हांच मागें राहिलें. शहर मागें राहिलें. उजव्या हाताला नदीचें पाणी काळोखांत चमकत होतें. ते निर्मळ पाणी थोडें होतें तरीहि काळोखांत चमकत होतें. वसंता त्या पाण्याकडे पाहत होता. तो पाण्याजवळ गेला.  त्यानें डोळ्यांना पाणी लावलें. तेथें तो वाळवंटांत बसला. वरती अनंत तारका चमचम करीत होत्या. वसंता विचारांत विलीन झाला होता.

तें कोण येत आहे समोरुन ? कोण तें ? भीषण अंधारांतून कोणाची ती मूर्ति येत आहे ?

वसंताला दरदरून घाम सुटला. त्यानें डोळे मिटले. पुन्हा त्यानें डोळ उघडले. ती मूर्ति त्याच्याकडे येत होती. धीरगंभीर मूर्ति! त्या तोंडावर हास्य नव्हतें, क्तौर्य नव्हते. त्या तोंडावर करुणा होती. एक प्रकारची गंभीर खिन्नता होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel