वेदपुरुष : कैद्यांजवळ बोलणें हीच त्यांचीहि करमणूक !

वसंता : किती म्हातारा आहे हा कैदी !

सुभेदार : राजा! कधीं सुटायचें !

राजा : मरेन तेव्हां सुटेन. तुरुंगांतच माझें मडकें फुटेल.

सुभेदार : अरे राज्यारोहणाला सुटणार होतास ना ?

राजा : मला आशा नव्हती. मला ते जिवंत असेतों सोडणार नाहींत. माझी माफी नेहमीं हे बुडवतात! कांहीं तरी गुन्हा लादून माझ्यावर खटले भरतात! मी मागेंच सुटलों असतों. परंतु मी सुटल्यावर गालिचे कोण शिकवील ? ताजमहाल कोण गुंफील ? शहामृगें सुतांत कोण विणील ? ते मला सोडणार नाहींत. आणि आतां सुटून काय करूं ? बायको मेली, मुलगा मेला. मला बाहेर कोण आहे ? हा तुरुंग हेंच माझें जग. बाहेरचीं झाडे, बाहेरचीं फुलें, बाहेरची पांखरे, मला आतां ओळखतां येणार नाहींत.

सुभेदार : या राज्यारोहणाला वाटलें सुटशील. तुझें नांव गेलें होतें.

राजा : मी बाहेर जाऊन वेडा होईन. सर्व सृष्टीकडे पहात राहीन, पहात राहीन !

वसंता : हयाचे शब्द हृदयाला पीळ पाडीत आहेत.

वेदपुरुष
: सर्वत्र हेंच आहे. पिळवणूक आहे. मरेपावेतों पिळवणूक! या राजाबुढ्यापासून पृथ्वीमोलाचीं कलेंची कामें येथें करुन घेतात, आणि त्याला दोन भाकरीच देतात! त्याची माफी वाढविण्याऐवजीं त्याची माफी काटतात! अरेरे, राज्यारोहणाचे दिवशीं हा अभागी राजा सुटला नाहीं.

वसंता : या तुरुंगांत मुलें नाहींत का ?

वेदपुरुष : छोकराफाईल निराळी असते.

वसंता : चला त्यांच्याकडे जाऊं.

शिपाई : गप्प बसा. दोर्‍याला पीळ द्या.

एक मुलगा : आम्हांला रात्रीं बाहेर झोंपूं देतील का ? किती उकडतें आंत.

दुसरा मुलगा : आम्ही पळून थोडेच जाणार आहोंत ?

शिपाई : ही का धर्मशाळा आहे, का घर आहे ? हा तुरुंग आहे. म्हणे बाहेर नाहीं कां झोपूं देणार ? आणखी गाद्या-उश्या नकोत ना ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel