वेदपुरुष : संस्थेच्या चालकांबद्दल कांहीतरी चर्चा आहे. आपण ऐकूं ये.
एक : परंतु संमेलनाला जवाहीरलालांना कां बोलावलें जाऊं नये! आमच्या राष्ट्राच्या महान् पुरुषाला आमच्या संस्थेंत येण्याची कां बंदी व्हावी ?
दुसरा : जवाहीरलाल खुद्द इंग्लंडमधील विद्यार्थ्यांसमोर जाऊं शकतील. महात्माजी इटन येथील विद्यार्थ्यांसमोर संस्थेंत जाऊन बोलले. परंतु आमच्या देशांतल्या देशांत किती ही गळचेपी ?
तिसरा : हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, विद्यार्थी ठरवतील त्याला चालकांनी बोलावणें योग्य आहे.
चौथा : परंतु चालक तयार नाहींत. संमेलन नाहीं झालें तरी चालेल असें ते म्हणाले! विद्यार्थ्यांचा हा सर्व बाजूंनी कोंडमारा आहे. चालकांजवळ स्फूर्ति नाहीं. स्फूर्तिदाते संस्थेंत कधीं येऊं देणार नाहींत.
वसंता : वेदपुरूषा, किती लाजिरवाणी स्थिति आहे ही !
वेदपुरुष : हें कांहींच नाहीं. खोल दृष्टि देऊन पाहाशील तर सारा गुलामांचा व मिंध्या लाळघोट्यांचा सांवळागोंधळ या संस्थांतून दिसेल!
वसंता : चल, दुसरीकडे चल. तो मुलगा रडत कां घरीं चालला आहे ? आपण त्याला विचारूं.
वेदपुरुष : चल.
वसंता : बाळ, कां रे रडतोस !
मुलगा : मास्तरांनीं मारलें व हांकून दिलें.
वसंता : तूं काय केलेंस ?
मुलगा : माझ्याजवळ पुस्तक नाहीं. बाबा रोज म्हणतात ''उद्यां घेऊं.'' परंतु ते देत नाहींत व मास्तर वर्गांत बसूं देत नाहींत. ते म्हणाले ''चालता हो.''
वसंता : तुझा बाप काय करतो ?
मुलगा : खानावळींत वाढतो.
वसंता : त्याला किती पगार आहे ?
मुलगा : दहा रुपये. ते तेथेंच जेवतात.
वसंता : तुला किती भावंडें आहेत ?
मुलगा : तीन आहेत.
वसंता : आई काय करते ?
मुलगा : अधून मधून स्वयंपाक करावयाला जाते. दुसरें काम करते.