दुसरा : आडवें आलें कीं कापून काढावे. बाकी तू ध्येयनिष्ठ खरा. भाऊ मरणारच होता आज ना उद्यां. परंतु बोर्ड म्हणजे सार्वजनिक संस्था. तेथें वाटेल ते लोक म्हणजे लाखों लोकांचें मरण! सार्वजनिक हित आधीं. समाज आधीं. मग कुटुंब. म्हटलेंच आहे आपल्या पूर्वजांनी कीं कुटुंबासाठीं स्वत:चा त्याग करावा; गांवासाठीं कुटुंबाचा त्याग करावा; देशासाठीं, देवासाठीं सर्वस्वाचा त्याग करावा.
तिसरा : मला वाटतें कीं आणखी अर्धापाऊण तास थांबावें. मुंबईची गाडी येऊन जाऊं दे.
पहिला : खरेंच शेवटचें दर्शन घेईल.
दुसरा : कांहीं नको थांबायला. मेल्याचें दर्शन घेण्यांत काय अर्थ ? अग्नि द्यायला कोणी हवें म्हणून याच्यासाठीं थांबलो. तिच्यासाठीं कशाला थांबायचें ?
पहिला : अहो, कोणी थोर मनुष्य मेला तर त्याचें दर्शन सर्वांना घडावें म्हणून प्रेत मुद्दाम ठेवतात !
दुसरा : हा काय कोणी महात्मा आहे कीं काय ?
तिसरा : पत्नीला तो महात्माच आहे. पत्नीचें सारें कांहीं तो आहे.
भाऊ : मला वाटतें उरकून टाकावें. प्रेताला ठेवण्यांत अर्थ नाहीं.
एकजण : उचला तर मग. लांकडे केव्हांचीं पुढें गेलीं आहेत वाट पहात आहेत.
वसंता : आणि आतां पत्नी आली तर ?
वेदपुरुष : ह्यांना काय त्याचें ? स्त्रियांच्या भावना कोण ओळखतो ? तुला एक मारवाडी लोकांतील चाल आहे का माहीत ?
वसंता : पडद्याची ना ? तोंडावरुन त्या लांब पदर घेतात.
वेदपुरुष : तें जाऊं दे. परंतु घरांत पतीजवळ वडील मंडळी आजूबाजूला असतां बोलायचें नसतें.
वसंता : ती पध्दत सर्वांतच पूर्वी रूढ होती.