वकील : पुरे कर बाबा तुझी टकळी.
वसंता : कां, पुरें कां ? उत्तर द्या ना. गांधींना शिक्षण नको, कला नको, कुणीं तुम्हांला सांगितलें ? गुजराथ विद्यापीठ, खामगांव, अकोलें, नगर, येवलें, क-हाड इत्यादि ठिकाणच्या शेंकडों राष्ट्रीय शाळा, तुमच्या कानांवर नाहीं वाटतें आल्या ? कॉग्रेसच्या अधिवेशनाचे वेळेस जगत्प्रसिध्द कलावान नंदलाल यांना बोलावून खरी अभिजात भारतीय कला कोण उचलू धरतो ? गांधींना सारें पाहिजे आहे ? परंतु तुमच्यासारखे माणूसघाणे लोक मात्र नको आहेत.
व्यापारी : तुमच्या गांधीमुळें शेतकरी बुडाला.
वसंता : बाप्पा! तुझया व्याजाच्या दरानें बुडाला. गांधीच्या चळवळीचा काय संबंध आहे ? सरकारी आर्थिक धोरणें, हुंडणावळीचे दर, कारभार, आणि तुमचीं व्याजें यानें शेतकरी डबघाईस आला आहे.
वकील : त्याच्या तोंडाला लागूं नका. गांधी टोपी टकल्याला चढविली कीं सारीं शास्त्रे त्यांच्या डोक्यांत जशीं अवतरतात !
वसंता : पगडी चढवून तरी अवतरतात का ?
वेदपुरुष : वसंता, जाऊं दे. आपण या आयाबहिणींजवळ बोलूं. त्या सुसंस्कृतांना सोड. या रानवटांत आपण मिळूं.
वसंता : खरेंच.
एक बाई : तुम्ही भाकर खातां ? तुम्ही भुकेलेले दिसतां.
वसंता : नको.
बाई : घ्या, चांगली आहे.
वसंता : द्या.
वसंताने भाकरी खाल्ली. भिल्लाच्या लोटींतील पाणी प्यायला.
वकील : याला म्हणतों आम्ही भ्रष्टाकार !
वसंता : तुम्ही वाढाल का मला जेवायला ? मी स्वसंसेवक आहें.
वकील : नको रे बाबा. जेवा महारामांगाकडे. तुरुंगांत जा. आमच्या पाठीमागें पोलिसांचें शुक्लकाष्ट नको.
बाई : का रे भाऊ! गांधीबाप्पाची चळवळ का फिरून सुरू होणार ? झेंडे दिसतात. पोरें गाणीं म्हणतात.
वसंता : हो. कदाचित् सुरू होईल.