विठी : दादांनो! किती दिवस राहणार आम्ही ? डोळ्यात प्राण आले आहेत बघा. या चिमण्यासाठी जगायचें. परंतु त्यालाहि दूध देतां येंत नाहीं. माझ्या अंगावर कोठून दूध येणार ? पोरगें मरतें आहे हो उपासानें. मी एकटी असत्ये तर तुमच्या दारांत आल्यें नसत्यें. या पोरासाठीं आल्यें.

धोंडभट : त्या पोराला मडमांच्या स्वाधीन कर. नाशिकजवळ शरणपूर आहे ना ? तेथें आहेत ते पाद्री. तुझ्या पोराचा सांभाळ करितील. आकाशांतील बापाला कसला विटाळ नाहीं.

जमीनदार : अग, तुलाहि ते सांभाळतील. ते टपलेलेच असतात. धर्महीन लोकांना ते धर्म देत असतात. तुला चौळीबांगडी देतील. तुला लिहावयाला शिकवतील. मग तूं मास्तरीण होशील. जा, पाद्री चांगले असतात.

हरिपंत : मास्तरीण होऊन मग नाशिकला आमच्या पोरांना शिकव.

विठी : काय हें तुम्ही बोलतां ? कां आपला धर्म सोडायचा ?

केशव पाटील : आपला धर्म तुम्हीं कधींच सोडला आहे. देवळांत दंडेलीनें घुसूं पाहणें हा का तुमचा धर्म ? रामाच्या पवित्र रथाला हात लावणें ह का तुमचा धर्म ? आमच्या विहिरींवर पाणी भरूं पाहणें हा का तुमचा धर्म ? धर्माला केव्हांच मूठमाती तुम्हीं दिली आहे.

विठी : देवाला पहायची इच्छा होते, यांत का अधर्म आहे ? देव सर्वांचा आहे.

धोंडोपंत : येथून चालती हो. आमच्या गांवांत धर्म भ्रष्टावणारे नकोत. गांवावर अवकळा यायची, गंगेचें पाणी कमी व्हायचें.

विठी : मी कोठें जाऊ ? मी मरूं ?

जमीनदार : मरणें का कोणाला टळलें आहे ? आणि पापी माणसें जगून तरी काय उपयोग ?

विठी : कायरे बाबा पाप केलें ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel