मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त व आवश्यक म्हणून जी कला समजण्यांत येते, ती कला आहे तरी काय ? जिच्यासाठी श्रम, मानवीजीवनें एवढेंच नव्हे तर बंधुभाव, माणुसकी यांचा होम होतो, अशी ही कला म्हणजे काय ?

कला म्हणजे काय ? कोणी म्हणेल काय मूर्खपणाचा प्रश्न. अहो कला म्हणजे काये हें का तुम्हांला अजून माहीत नाहीं ? कला म्हणजे खोदकाम, कला म्हणजे नक्षीकाम; कला म्हणजे काव्य, कला म्हणजे संगीत; कला म्हणजे चित्र, कला म्हणजे नृत्य. अशा प्रकारचें उत्तर सामान्य मनुष्य नेहेमीं देत असतों. कलाप्रांतांत ज्यानें नुकताच प्रवेश केलेला आहे असा नवशिक्या किंवा कलाप्रांतांत ज्यानें सारें जीवन दिलेलें आहे असा एखादा प्रगल्भ कलावान-दोघेहि कधी कधी हेंच उत्तर देतात. ज्या गोष्टीबद्दल आपण बोलत आहोंत, ती गोष्ट अगदीं स्वच्छ व स्पष्ट आहे, तिच्याबद्दल कधीं कोणालाचं संशय पडणार नाहीं, अशा समजुतीनें जणुं ते बोलतात व उत्तर देतात. परंतु बांधकामच घ्या, काहीं साध्या इमारतींतहि असें कांहीतरी असतें कीं ज्यामुळें त्यांना कलांचे नमुने असें म्हणतां येईल; याच्या उलट कलेचें सोंग आणणा-या मोठया दिमाखदार व ऐटबाज अशा इमारती असतील-परंतु त्या कुरुप व ओंगळ वाटून त्यांना आपण कला म्हणून संबोधणार नाहीं. असे अनुभव येतात की नाहीं ? जर येत असतील तर अमुक एक खरोखर कला वस्तु आहे असे समजण्यास प्रमाण काय ? कलेचें प्रधान स्वरुप काय, प्राणमय स्वरुप काय ?

जें शिल्पकलेंत, तेंच संगीतांत, तेंच काव्यांत. कलेचें कोणतेंहि क्षेत्र घ्या. सर्वत्र एकच गोष्ट दिसेल की कलेच्या एका बाजूला प्रत्यक्ष उपयुक्तताहि असते व दुस-या बाजूला अनुपयुक्तताहि असते. या दोहोंतून कलेला वेगळें कसें करावयाचें ? दोन बाजूकडच्या या दोन सीमा आहेत. एका बाजूस कला संसाराला चिकटली आहे, दुस-या बाजूस संसारापासून दूर गेली आहे. साधारण सुशिक्षित मनुष्य, ज्यानें सौंदर्यशास्त्राचा फारसा विचार केलेला नाहीं असा कलावानहि-या गोष्टीनें घाबरणार नाहीं. तो म्हणेल या प्रश्नांची उत्तरें कधींच दिलेली आहेत. हया गोष्टींचा उलगडा झालेला आहे व ती उत्तरें सर्वांना माहीत आहेत. हा मनुष्य म्हणतो “अहो, सौंदर्यसर्जन करणारी ती कला. कला सौंदर्य निर्माण करते. ”

सौंदर्य-सर्जन म्हणजे जर कला, तर मग एखादा जलसा, किंवा एखादें तमाशेवजा नाटक-हयांना का कला म्हणावयाचें ? असें जर आपण त्याला आणखी विचारिलें तर तो म्हणेल “अलबत ती सारी कलाच, कलेचींच तीं रुपें.” परंतु हें उत्तर देतांना तो थोडा कचरतो व आणखी पुस्ती जोडतो कीं “ज्या प्रमाणांत त्या जलशांत, त्या नाटकांत, त्या तमाशांत सौदर्यसर्जन असेल, त्या प्रमाणांत तेथें कलेचें अस्तित्व मानावें.”

परंतु हा जलसा चांगला आहे व हा वाईट आहे हें ओळखावयाचें कसें, असे त्या माणसाला आणखी विचारण्याऐवजीं, त्याला असें विचारा कीं नटांचे पोषाख शिवणारे, त्यांची केशभूषा करणारे, स्त्रियांचीं तोंडें रंगवून त्यांना नाचासाठीं तयार करणारे-हया सर्वांचे उद्योग म्हणजे कलानिर्मितीच का ? शिंपी, अत्तरें तयार करणारा, स्वयंपाक करणारा आचारी, हयांची कर्मे कलेत येतात कीं नाही ? तो वरचा मनुष्य या गोष्टींना कलाक्षेत्रांत येऊं देणार नाहीं. परंतु असें नकारात्मक उत्तर देतांना तो सामान्य सुशिक्षित चूक करतो. विशेष अधीत नसल्यामुळेंच ही चूक तो करीत असतो. सौंदर्यशास्त्रांतील अनेंक प्रश्नांबद्दल त्यानें पूर्वी विचार केलेला नसतो व म्हणून त्याच्याकडून अशी ही चूक होते. या सौंदर्यशास्त्रांत जर जरा खोल जाऊन त्यानें पाहिलें असतें, तर त्याला रेननच्या मार्क ऑरेले हया ग्रंथांत शिंप्याचें काम म्हणजे कलाच आहे असे म्हटलेलें व प्रतिपादिलेलें दिसून आलें असतें. तसेंच स्त्रियांच्या केशरचनेंत किंवा इतर शृंगारसाजांत जो परमोच्च कला पाहात नाही तो अरसिक व मतिमंद आहे इत्यादि कलेवरचीं मतें त्याला त्या ग्रंथांत वाचावयास मिळालीं असतीं. सौंदर्यशास्त्रविषयक अनेक ग्रंथांत-क्रॅलिक किंवा गायू यांच्यासारख्या पंडितांच्या ग्रंथांतहि-नेपथ्यकला, स्वादकला, स्पर्शकला-इत्यादि कलांचे नाना प्रकार त्याला दिसून आले असते.

क्रॅलिकनें कलेचें पंचीकरण केलें आहे. त्यानें पांच भेद पाडले आहेत; किंवा पांच प्रकार मानले आहेत असें म्हणा. (पंचइंद्रियांना सौंदर्यसंवेदना देणा-या पंचघा कला) १. स्वादकला, २. गंधकला, ३. स्पर्शकला, ४. श्रवणकला, ५. दर्शनकला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel