प्रकरण पंधरावे

(स्पष्टता, कळकळ व विशिष्टता या गुणांवरून कलाकृती ह्या खरोखर कलाकृती असतात हे आपण पाहिले. आता या कलाकृती ज्या उत्कट व स्पष्ट भावना देतील. त्या भावनांचे गुणावगुण पाहूया; भावनांच्या सदसत्त्वाबद्दल विचार करूया; दिलेली उत्कट भावना जितकी शिवमय व मंगलमय तितकी कला अधिक चांगली; सुसंस्कृत व सभ्य असा जनसंमर्द; आपापल्या काळांतील धार्मिक दृष्टी; नवीन मध्ये कलेवर नवीन नवीन मागण्या लादतात; कला ही जोडणारी आहे; धार्मिक कला, विश्वव्यापक कला; दोघींचे एका मध्येयासाठी एकत्र येणे; दोन्हींचा सहकार; कलेचे नूतन मूल्यमापन; असत्कलेची उदाहरणे. सौंदर्य जरी कलेचे प्रमाण नसले तरी सौंदर्याला कलेत स्थान आहे. बीथोव्हेनची ९ वी रागिणी.)

कलेचा जो विषय त्यात सदसत् कसे निवडावयाचे?

कला ही वाणीप्रमाणे विनिमयाचे, व्यवहाराचे एक साधन आहे व म्हणूनच प्रगतीचेही ते साधन आहे. मानवजातीचा प्रवाह पूर्णतेकडे जात आहे व या प्रगतीच्या मार्गांत कलेचा फार उपयोग आहे. ज्याप्रमाणे पूर्वजांचे विचार व आजच्या लोकांचेही विचार आपणांस वाणीमुळे मिळणे शक्य झाले आहे, त्याप्रमाणेच पूर्वीच्या लोकांनी अनुभवलेल्या भावना व आजचे लोकही ज्या भावना अनुभवीत असतात, त्या सर्वांचा अनुभव कलेच्या द्वारा आपणांस प्राप्त होणे शक्य असते. कलेच्या योगाने प्राचीनांच्या व समकालीनांच्या हृदयांशी आपण एकरूप होतो. ज्ञानाची सदैव उत्क्रांती व विकास होत आहे. दिवसेंदिवस अनावश्यक व चुकीचे ज्ञान दूर करून आवश्यक व अधिक सत्यज्ञान त्याची जागा घेत आहे. ज्ञानाप्रमाणे, विचारांप्रमाणे, भावनांचाही विकास व उत्क्रांती होत आहे. ज्या भावना, अनुदार, संकुचित, मानवजातीच्या हितास अहितकार अशा असतात, त्या दिवसेंदिवस  अस्तास जाऊन, उदार, थोर, संग्राहक, मंगलमय व शिवतर अशा भावना त्यांची जागा घेत असतात. कलेचे हेच काम आहे. कला ज्या भावना देते त्या जितक्या अधिक दयामय, मंगलमय व व्यापक तितकी ती कला अधिक चांगली; या ज्या मानाने कमी दयामय व कमी मंगलमय त्या मानाने ती कला अधिक हीन.

भावनांची योग्यायोग्यता, भावनांचे सदसत्त्व त्या त्या काळांत जी मुख्य धार्मिक दृष्टी असते; तिच्यावरून ठरत असते.

इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात जीवनाच्या गंतव्याबद्दल, जीवनाच्या अर्थाबद्दल त्या त्या मानवीसमाजात एक सर्वसामान्य अशी विशिष्ट दृष्टी असते. त्या त्या काळांतील धार्मिक दृष्टीवरून त्या त्या काळात तो तो समाज किती उन्नत झाला आहे हे समजून येते. उन्नती मोजण्याचे हे प्रमाणच होय. त्या त्या काळांतील श्रेष्ठ अशी धर्मभावना त्या काळांतील काही व्यक्तीच आपल्या जीवनात स्वच्छपणे प्रकट करीत असतात. बहुजनसमाजाला त्या दृष्टीची कमीअधिक स्पष्ट कल्पना असते. आपल्या समाजात धर्मदृष्टी कोणतीच नाही असे जे आपणास कधी कधी वाटते, त्याचे कारण खरोखरच धर्मदृष्टी नसते हे नसून, ती पाहण्याची आपणास इच्छा नसते हे होय. कारण पुष्कळ वेळा त्या धार्मिकदृष्टीशी आपले जीवन विसंगत असते, आणि विसंगतता उघडकीस येऊ नये म्हणून धर्मदृष्टीच समाजात नाही असे आपण म्हणत असतो. आपल्याच डोळयावर कातडे ओढून स्वत:ची प्रतारणा आपण करीत असतो.

समाजातील धार्मिक विचार समाजाच्या गतीची दिशा दाखवीत असतो. ज्याप्रमाणे वाहणा-या नदीला दिशा असतेच, कोणत्यातरी रोखाने तिची गति असते, त्याप्रमाणेच धार्मिक विचारांच्या प्रवाहाचे असते. समाज जर जिवंत असेल, तर त्या समाजातील जनतेच्या जीवनाचा प्रवाह कोणत्या विशिष्ट दिशेने जात आहे, हे दर्शविणारा धर्मविचारही तेथे असलाच पाहिजे. ही विशिष्ट धर्मदृष्टी त्या समाजात असलीच पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel