एका विशिष्ट भावनेशी दुस-याला तद्रूप करण्यासाठी जेव्हा एखादा मनुष्य काही बाह्य लक्षणांनी; बाह्य चिन्हांनी ती भावना व्यक्त करितो, तेव्हा कलेला आरंभ झाला असे समजावे. अत्यंत साधे असे उदाहरण घेऊ. एखाद्या मुलाला लांडगा दिसतो व त्याला भीतीचा अनुभव येतो. दुस-याला तो आपला अनुभव सांगतांना तो मुलगा स्वतःचे, त्या लांडग्याचे, परस्परांच्या भेटीचे, आजुबाजूच्या परिस्थितीचे असे काही वर्णन करितो, लांडगा दृष्टीस पडण्यापूर्वी आपली कशी मोकळी व आनंदी वृत्ति होती, मनात भीतीचा लवलेशहि कसा नव्ता, लांडगा कसा दिसला, लांडग्याच्या हालचाली, त्याचे लकलकणारे डोळे, लांडग्यातील व स्वतःतील अंतर हे सर्व काही अशा उत्कटतेने वर्णन करून सांगतो की ज्या भावना त्याने स्वतः अनुभविल्या होत्या, त्या दुस-याच्याहि हृदयात जागृत व्हाव्यात. ती हकीगत सांगताना तो पूर्वीचा अनुभव जर त्या मुलालाहि पुन्हा अनुभवितां आला व त्या अनुभवाशी श्रोत्यांनाहि जर तो एकरूप करू शकला तर तेथे कला आहे असे समजावे. त्याचे ते कथन कलात्मक होते असे म्हणावे. आणि समजा जरी त्या मुलाने खरोखर लांडगा पाहिलेला नसला, केवळ काल्पनिक असे कथानक त्याने रचिलें असले, स्वतःला नेहमी मनात वाटणारी लांडग्याची भीति दुस-यांच्याहि अनुभवास आणून द्यावी म्हणून त्याने ती हकीगत सांगितली असली तरीही दुस-याच्या मनात स्वतःच्या मनातील भावना उत्पन्न होतील अशा रीतीने ते सारे सांगितले गेल्यामुळे तेथे कलात्मक व्यापार झाला असे समजावे. संकटाची भीती किंवा सुखोपभोगाचा आनंद यांच्याही भावना आधी स्वतः प्रत्यक्षतः वा कल्पनेनें अनुभवून, एखाद्या फलकावर किंवा सगमरवरी पाषाणावर त्या भावना प्रगट करून तद्द्वारा दुस-यांच्या हृदयांत जर समान भावना जागृत करतां येतील तर तेथे कला आहे असे समजावे. त्याचप्रमाणे हर्षः शोक, सुख दुःख, अशा निराशा, धैर्य भीति इत्यादी विकारांच्या भावना कल्पनेत किंवा प्रत्यक्ष अनुभवून सुराच्या द्वारा किंवा शब्दद्वारा त्याच भावना दुस-यांच्या ठायी जर उत्पन्न करतां आल्या स्वतःला जसा अनुभव आला तसाच जर इतरांना आणून देतां आला - तर तेथे कला आहे असे समजावे.

कलावान  दुस-याला ज्या भावनांनी वेडा करून टाकितो, त्या भावना बहुविध प्रकारांच्या असू शकतील. त्या भावना दुबळेपणाच्या असतील किंवा बलशालित्वाच्या असतील; त्या आशेच्या असतील वा निराशेच्या असतील; त्या भावना भल्या असतील वा बु-या असतील; अति क्षुद्र असतील वा अति महत्त्वाच्या असतील. सौंदर्याच्या असतील वा कुरूपतेच्या असतील; कोठे देशाबद्दलची भावना असेल, तर कोठे देवाबद्दलची असेल; प्रेमी जोडप्यांची हृदयंगम व वेडावून टाकणारी वर्णने करून प्रेमाच्या भावना जागृत कधी होतील; कधी एखाद्या चित्रानें विलासी भावना, तर एखाद्या पोवाढयाने विजयी वीराचे धैर्य, कधी नृत्याने जागृत झालेली रंगेल वृत्ति, तर कधी गमतीची गोष्ट सांगून उत्पन्न केलेला विनोद; कधी अंगाई गीताने किंवा सायंकालचा देखावा दाखवून प्रकट केलेली शांत व गंभीर भावना तर कधी उत्पन्न होणारी कुतूहलवृत्ति भावना कोणत्याही असोत कलावानाला ज्या भावनांचा अनुभव आला,  त्याच भावनांनी श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना जर तो भरून टाकू शकला, तर तेथे कलानिर्मिती झाली असे समजावे.

स्वतःला जो पूर्वी अनुभव आला, तोच अनुभव स्वतःममध्ये पुन्हा जागृत करून मग रेखा, रंग, गति, सूर, शब्द, हावभाव इत्यादी साधनांच्या द्वारा तोच अनुभव दुस-यांनाही अनुभवावयास लावावयाचें, दुस-यांनाही तोच तितकाच उत्कट असा अनुभव आणून द्यावयाचा हे कलेचे काम आहे.

कला ही एक मानवी व्यापार आहे. स्वतःला ज्या भावनांचा अनुभव आला, त्याच भावना काही विशिष्ट चिन्हांनी दुस-याला अशा रीतीने द्यावयाच्या की ते दुसरेही त्याच भावनेनें भारले जावे, त्यांनाही संपूर्णपणे तसाच त्या भावनांचा अनुभव यावा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel