सौंदर्यासंबंधीच्या विचारांचा विकास पाहिला म्हणजे असे दिसून येईल की आरंभी आरंभी गूढ व आध्यात्मिक अशी सौंदर्याची व्याख्या अधिक लोकप्रिय होती. परंतु अर्वाचीन काळांत प्रायोगिक व्याख्या जास्त प्रामुख्याने पुढे येत आहे व अलीकडे तर या व्याख्येने शारीरिक रूप धारण केले आहे; आणि व्हेरान व सलीसारखे सौंदर्यसमीक्षक तर सौंदर्याला अजिबातच फांटा देऊन केवळ शारीरिक भावनांवरच भर देऊ लागले आहेत. परंतु शारीरिक भावना म्हणजेच सौंदर्य मानणा-या या अगदी नवीन लोकांचे मत अद्याप फारसे यशस्वी व प्रिय झालें नाही. वरती ज्या दोन व्याख्या दिल्या आहेत, त्यांतीलच कोणती तरी एक विद्वान लोक, कलावान् लोक, बहुजनसमान पसंत करीत असतात. कोणी गूढ व आत्र्चयात्मिक व्याख्या पसंत करीतील, तर कोणी विशेष प्रकारची सुखानुभूति म्हणजे सौंदर्य असें मानितील. या दोन व्याख्यांशिवाय तिसरी व्याख्या लोकांना, कलावानांना या विद्वानांना पसंत नाही, मान्य नाही.

आपल्याभोवती असलेले सर्व लोक ''सौंदर्याच्या पायावरच कलेची व्याख्या केली पाहिजे, सौंदर्याच्या कल्पनेवरचा कलेचा व्याख्या करीतां येईल'' असा आग्रह धरितील; परंतु हे सौंदर्य म्हणजे काय? ह्या सौंदर्याच्या कल्पनेपासून कोणता अर्थबोध होतो ?

व्यक्तीच्या दृष्टीने पाहू जाता ते आपणास एक प्रकारचे विशेष असे सुख देतें ते सुंदर असे आपण म्हणतो. जे स्वतंत्र व स्वयंपूर्ण आहे ते सौंदर्य होय अशी वस्तूच्या दृष्टीने आपण भाषा बोलू. कारण जे अंतिम निरूपाधिक पूर्णत्व त्याच्या प्रगटीकरणाने आपणास एक प्रकारचे विशेष समाधान होतें. ही वस्तुविषयक व्याख्या म्हणजे थोडया निराळया त-हेने मांडिलेली व्यक्तिनिष्ठ व्याख्याच आहे. खरे पाहू जातां या दोन्ही व्याख्यानतून तोच अर्थबोध होतो. या दोन्ही व्याख्या विरोधी नसून एकच भाव व्यक्त करणा-या आहेत. काहीएक विवक्षित प्रकारची सुखानुभूति म्हणजे सौंदर्य हाच तो भाव, हाच तो अर्थ, आपणास विकार या वासना उत्पन्न न करिता केवळ निरुपाधिक आनंद जे देतें तें सौंदर्य होय !

अशाप्रकारची एकंदरित स्थिती असल्यामुळे कलाशास्त्राने कलेची व्याख्या सौंदर्यावर अवलंबून ठेवतां कामा नये. सौंदर्यावर विसंबून भागणार नाही, तेवढयां समाधान मानून घेऊ नये. कलाव्याख्याने नवीन व्यापक व्याख्या शोधून काढिली पाहिजे. जी व्याख्या सर्वप्रकारच्या कलाकृतीस कवटाळु अशी व्याख्या बनविली पाहिजे. ज्या व्याख्यचें प्रमाण हातांत घेऊन अमुक एक कृति कलाक्षेत्रांत येते की नाही हे पडताळून पाहतां येईल, आपणांस निश्चित करितां येईल, अशी स्पष्ट व निर्णायक, त्याचबरोबर सर्वसंग्राहक अशी नवीन व्याख्या कलाशास्त्राने तयार केली पाहिजे. परंतु सौंदर्यशास्त्राचे जे सारांश मागे दिले आहेत, त्यावरून वाचकांच्या हे लक्षात येऊन चुकलेच असेल की अशी व्याख्या कोणीही केलेकी नाही, कोणीही दिली नाही. अधिक श्रम घेऊन वाचक जर ते मूळ ग्रंथ वाचून काढितील तर ही गोष्ट अधिकच स्पष्टपणे त्यांच्या निदर्शलास येईल. निरुपाधिक सौंदर्याच्या व्याख्याचे प्रयत्न पाहिले म्हणजे असे दिसते की एक तर या व्याख्या काहीच सांगत नाहीत, किंवा त्यांनी काही सांगितलेच तर एखाद्या कलाकृतीचे काही विशेष गुणधर्म सांगणे एवढेच करतात. मग ते निरुपाधिक सौंदर्य निसर्गाचे अनुकरण असो किंवा वस्तूचा अनुरूप असा आकार असो; अवयवांचा परस्परांशी व अवयवीशी मेळ असो, किंवा रेखीवपणा, प्रमाणबध्दता असो; विविधतेंतील एकता असो वा विरोधांतील मेळ असो. त्या सौंदर्याची व्याख्या नीट केलेली नाही. मग ज्याला ज्याला आपण कला म्हणून मानतो, त्या सर्वांचा अंतर्भाव होईल अशी व्याख्या करणे तर दूरच राहिले.

तसेच सौंदर्याची वस्तुविषयक व्याख्यादि नाही. आज असित्त्वांत असणा-या सर्व व्याख्या (मग त्या गूढ आध्यात्मिक असोत वा प्रायोगिक असोत) शेवटी एकाच व्यक्तिविषयक व्याख्येत परिणमत होतात. आणि ही व्याख्या अशी की सौंदर्य प्रकट करणारी ती कला व जें सुखवितें ते सौंदर्य. परंतु ही व्याख्या अपुरी आहे. ही व्याख्या पुरी पडणार नाही, सर्वत्र लागू पडणार नाही. अनेक सौंदर्यमीमांसकांच्या प्रत्ययाला ही गोष्ट आली आहे. या व्याख्येचा पाया आणखी पक्का करण्याची ते आणखी पुढे असे विचारतात की एखादी वस्तू का सुखविते ? असे करितांना सौंदर्याच्या प्रश्नाचे त्यांनी रुचीच्या प्रश्नात रूपांतर केले आहे. हट्चिसच, व्हाल्टेअर, डिडरो यांनी असेच केले आहे. परंतु रुचि म्हणजे तरी काय ? रुचीचे स्वरूप काय ? रुचीच व्याख्याच करितां येत नाही ! प्रत्यक्ष व्यवहारावरून व सौंदर्याशास्त्राच्या इतिहासावरून वाचकांस हे दिसून येईल की रुचीची व्याख्या करणे म्हणजे आंधळयाची मोट बांधण्यासारखे अशक्य आहे. एकाच वस्तुमुळे एकाला आनंद होतो तर दुस-याला दुःख होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel