कृत्रिम कलेबद्दलची चौथी गोष्ट म्हणजे जिज्ञासा वाढविणे. उत्सुकता कायम राखण्याची खटपट करणे, मन सारखे कलाकृतींत दंग राहील, गुंतून राहील असे करणे. इंग्रजी कादंब-या व फ्रेंच नाटके यांत संविधानक मोठया गुंतागुंतीचे असे केलेले असते. परंतु संविधानकाच्या गुंतागुंतीने उत्सुकता कायम राखणे ही गोष्ट आता मागे पडत चालली आहे. अलीकडे एखाद्या ऐतिहासिक कालाचे किंवा समकालीन जीवनांतील एखाद्या विवक्षित अंगांचे साद्यंत वर्णन देणे ही गोष्ट रूढ होत आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कादंबरीत प्राचीन इजिप्तमधील वर्णन आणणे किंवा रोमन लोकांच्या जीवनाचे वर्णन करणे किंवा खाणीतील लोकांचा जीवनक्रम देणे, एखाद्या मोठया दुकानांतील किंवा कारखान्यांतील अथपासून इतिपर्यंत हकीगत देणे, कधी कारकुनांचे वर्णन करणे, कधी भटजीचे-इत्यादी प्रकार अधिकाधिक येत आहेत. ही वर्णने वाचून वाचकाला मौज वाटते, त्याची करमणूक होते. वाचकाला ही कलाच आहे असे वाटू लागते. काय गमतीचे वर्णन, किती हुबेहूब असे म्हणून तो डोलतो. वर्णन करण्याच्या पध्दतीत मौज उत्पन्न करणे म्हणजे कला, असे होत चालले आहे. कधीकधी दुर्बोधता आणणे हाही उत्सुकता टिकविण्याचा एक मार्ग आहे. गद्य, पद्य, चित्रे, नाटके, संगीत यांची रचना अशी करावयाची की ती सारी कलात्मक कोडी व्हावी! कला म्हणजे कोडे! वाचकाला, प्रेक्षकाला, श्रोत्याला हे काय आहे याबद्दल तर्क करावयास लावावयाचे; त्याच्या जिज्ञासेला ताण द्यावयाचा. वाचकाचीही असे दंग होण्यांत, ते कोडे सोडवीत बसण्यात करमणूक होते, त्याचा वेळ निघून जातो.

अमुक एक कलाकृती चांगली, का तर ती काव्यमय आहे, यथार्थ वर्णन करणारी आहे, परिणामकारक आहे. (म्हणजे भावना देणारी नव्हे) उठावदार आहे, मजेदार आहे, दुर्बोध आहे म्हणून असे सांगण्यात येत असते. परंतु यांतील एकाही गोष्टीला कलेचे श्रेष्ठत्व दाखविणारे गमक असे मानता येणार नाही. या आगंतुक विशेषांचा कलेशी ख-या जिवंत कलेशी-थोडासुध्दा जवळचा किंवा दूरचा संबंध नाही.

काव्यमय याचा अर्थ उसने. पूर्वीच्या कलाकृतींनी झालेले जे कलात्मक परिणाम, त्यांचे अंधुक ठसे या उसनवारी कलेने पुन्हा जागृत केले जातात. यामध्ये कलावानाने स्वत: अनुभविलेल्या भावनांचा स्पर्श नसतो. गटेचे फौस्ट हे महाकाव्य असेच आहे. काहीतरी उसने घेऊन त्यावर उभारलेले काव्य कितीही उत्कृष्ट असले, त्यांतील वर्णने व भाषा कितीही मोहक असली, त्यांतील विचार कितीही भव्य व उदात्त असले, त्याममध्ये इतर अनेक गोष्टींचे कितीही सौंदर्य असले, तरी त्या कलाकृतीला संपूर्णत्व यावयाचे नाही. अशा कृतींत कला व विषय यांचा एकजीव झालेला कधीही दिसणार नाही. कलावानाने स्वत: अनुभवलेल्या भावनांत जी सजीवता, जी सुसंबध्दता, जी एकात्मता असते, ती अशा परप्राप्त अनुभवांत  नसते. ख-या कलेचा हृदयावर जसा परिणाम होईल, तसा उसनवारी कलेने होणार नाही. दुस-या ग्रंथांपासून मिळालेल्या भावनांवर रचलेल्या कलाकृती कलावानाची औरसंतती न होता दत्तकसंतती होत असते. त्याच्या अनुभवांतून प्रकट झालेले ते स्वरूप नसते. जेथे उसनवारी आहे तेथे खरी कला नसून कलेचा आभास मात्र आहे. मग ती थोडी असो वा समग्र असो; काही भागांची असो, वा काही प्रसंगांची असो-तेथे कला नाही. तेथे नक्कल आहे, प्रतिबिंब आहे. अमुक एक कृती मोठी काव्यमय आहे म्हणून चांगली आहे असे म्हणणे म्हणजे एखादे नकली गाणे ख-या नाण्यासारखे दिसते म्हणून ते खरेच माना असे म्हणण्याप्रमाणे आहे.

तद्वतच जीवनाची नक्कल करण्याने, हुबेहूब सारे वर्णिल्याने कला निर्माण होते हे म्हणणेही खोटे आहे. अनुकरण हे कलानिर्मितीचे साधन नाही; कारण कलेचा मुख्य उद्देश म्हणजे भावनास्पर्श; ज्या भावना कलावानाने स्वत: अनुभवल्याशिवाय असतील त्या इतरांच्या हृदयांत उचंबळविणे ही गोष्ट आनुषंगिक व दुय्यम गोष्टींच्या खटाळभर पाल्हाळिक वर्णनाने साध्य होत नसते. बारीकसारीक गोष्टींच्या या वर्णनाने भावनास्पर्शाला उलट विरोधच होतो. भावनेची भेट व्हावयास ही अडगळ मध्ये आडवी येते. आसमंताच्या संसाराचे वर्णन करणे म्हणजे, मुख्य भावना देणे नव्हे. या बारीकसारीक वस्तूंच्या वर्णनाने वाचकांचे लक्ष मुख्य वस्तूपासून अन्यत्र खेचले जाते; मुख्य भावनेकडे वाचक न जाता, कलाग्राहक न जातां, या आनुषंगिक गोष्टींत तो रमून जातो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel