आजच्या कलेतील मुख्य विषय म्हणजे खोटे स्वाभिमान, त्या स्वाभिमानार्थ होणारी द्वंद्वयुध्दे (रशियांत व युरोपांतील सर्व देशांत वरच्या वर्गातून ही द्वंद्वयुध्दे हे पुस्तक लिहिले गेले त्यावेळेपर्यंत तरी होत असत.) आपल्याच देशाची थोरवी व दुस-याची निंदा, (यालाच देशभक्ती हे नाव आहे.) आणि सुखविलास, हे असतात. या असल्या भावनांनी मजुरांच्या मनांत गोंधळ, तिरस्कार व संताप मात्र उत्पन्न होतात, म्हणून जरी मुजरांना ही कला पहावयास व उपभोगावयास संधी व फुरसत दिली, जरी त्यांना लिहावाचावयास शिकविले, तरीही त्यांना यत्किंचितही ती समजणार नाही. जोपर्यंत मजूर खरा मजूर आहे, आळसाने ज्यांचे मेंदू सडले आहेत, रूची बिघडल्या आहेत व पोटे वाढली आहेत अशांपैकी एक तो जोपर्यंत झालेला नाही तोपर्यंत शहरांतील चित्रसंग्रह, प्रदर्शने, संग्रहालये, ग्रंथालये, सार्वजनिक गायनवादन यांतून सर्वोत्कृट म्हणून ठेवण्यात येणारी जी वरच्या वर्गाची कला ती त्याला समजणार नाही. आणि जर त्याला समजलीच तर जे काही त्याला समजले असेल त्याने त्याचे हृदय व वृध्दी उन्नत व उदात्त न होता उलट त्यांचा बिघाडच होईल, ती दूषित व कलुषितच होतील. वरच्या वर्गातील लोकांची कला ही सर्वसामान्य जनतेची कला होणे शक्य नाही. विचारी, प्रामाणिक व कळकळीच्या मनुष्यास याबद्दल मुळीच शंका नाही. परंतु जर कला ही अत्यंत महत्त्वाची वस्तू असेल, सर्व भावनांना आवश्यक असा जर हा ईश्वरी आशीर्वाद असेल (धर्माइतकीच कला ही मानवी जीवनास आवश्यक आहे असे म्हणण्याची कलोपासकांना मोठी आवड असते.) कला हे जर निर्दोष, अव्यंग व कृतकृत्य करणारे परमसुख असेल तर ती सर्वांना मिळेल, सर्वांना समजेल, सर्वांना तिचा रसास्वाद घेता येईल अशीच असली पाहिजे. कला ही जर सर्व मानवांच्या जीवनाला आवश्यक वस्तू असेल तर आजची कला ही कलाच नाही कारण ती सर्वांना मिळत नाही व मिळाली तरी समजत नाही. आणि आजची कला ही कलाच आहे असे म्हणणे असेल तर सर्व मानवी जीवनास कला आवश्यक आहे असे जे आपण बोलून दाखवीत असतो ते तरी खोटे असले पाहिजे. आजची वरच्या मूठभर लोकांची कला तरी खोटी किंवा कला ही सर्वांच्या जीवनाला उपयुक्त व अत्यंत आवश्यक अशी वस्तू आहे हे म्हणणे तरी खोटे काहीतरी एक खोटे असलेच पाहिजे.

आता मात्र कठिण प्रश्न आला; आता गत्यंतरच नाही म्हणून काही हुशार व अनैतिक लोक अशी पळवाट शोधून काढतात की ''बहुजनसमाजाला कलेचा हक्कच नाही ! मनाला कोणत्याही प्रकारची शरम न वाटता, दिक्कत किंवा विपाद न वाटतां, हे घमेंडखोर लोक असे छातीठोकपणे व बेधडकप विधान करतात. (त्यांच्या ह्या सांगण्याने त्यांच्या हृदयाचे खरे स्वरूप तरी कळले म्हणा.) जास्तीत जास्त सुख देणारी अशी जी वरच्या वर्गातील लोकांची अतिसुंदर व अति उत्कृष्ट कला, तिचा उपयोग करून घेणारे व तिचा उपभोग घेणारे काही निवडकच हरीचे लाल असणार; काही थोडे नरोत्तमच, काही थोडे महाभागच या कलेची पूजा करतील; तिचा रसास्वाद, तिची माधुरी व लज्जत चाखण्याचे भाग्य येरागबाळांचे, गांवढळांचे नाही! त्या बाकीच्या बावळटांनी, त्या असंस्कृत हीन मूढ अशा मेंढरांच्या कळयांनी-ज्या हतभाग्यांना या श्रेष्ठ कलेने दिलेली परमसुखे अनुभवता येत नाहीत, त्यांना मानवजातींतील उत्कृष्ट अवलाद म्हणजे जे वरचे लोक, त्यांची कलात्मक सुखे निर्माण करण्यासाठी अहोरात्र मरमर मेलेच पाहिजे, काबाडकष्ट केलेच पाहिजेत. हे विचार मांडणारे लोक, असे बेमुर्वतखोरपणे सांगणारे लोक, निदान दंभ तरी करीत नाहीत. पोटांतील जहर ओठांवरच्या गुळगुळीत गोडगोड शब्दांनी झाकून तरी ठेवीत नाहीत. मनातील मळमळ यांनी ओकून दाखविली हे एकपरी बरे. जे अशक्य आहे ते कसे तरी करून शक्य आहे असे दाखवीत हे बसले नाहीत. ''आमची कला ही वरच्या वर्गापुरतीच आहे.''-हे सत्य प्रांजलपणे यांनी कबूल केले. सारांश, आज आपल्या समाजांत कलात्मक व्यापारांत गुंतलेले लोक खरे पाहिले तर याच दृष्टीने कलेकडे पाहातात, याच रीतीने कला ओळखतात. याच दृष्टीने व रीतीने ते बघत आले आहेत, विचार करीत आले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel