अ‍ॅमिल मरण पावल्यानंतर दोन सुप्रसिध्द फ्रेंच ग्रंथकारांनी त्याच्यावर व त्याच्या रोजनिशीवर लिहिले आहे. तत्त्वज्ञानी कॅरो व ई. शेरर या दोघांनी लिहिले आहे. ई. शेरर हा अ‍ॅमिलचा मित्रच होता. अ‍ॅमिलमध्ये ख-या जातिवंत प्रंथांना निर्माण करण्यासाठी जे गुण लागतात, त्यांचा अभाव होता, म्हणून या दोघा लेखकांस चुकचुक वाटते. ते अ‍ॅमिलीची कीव करतात. अ‍ॅमिलची थोडीशी ते पाठ थोपटतात. ही पाठ थोपटतांना आपण अ‍ॅमिलवर केवढी दया करीत आहोत असे जणू त्यांना वाटते. परंतु शेररची सारी टिकात्मक पुस्तके व कॅरोची सारी तत्त्वज्ञानावरची पुस्तके यांच्यापेक्षा अ‍ॅमिलचा ग्रंथ पुष्कळच वर्षे जगेल. या दोन ग्रंथकारांचे सद्ग्रंथ त्यांच्या मरणानंतर थोडे दिवस तरी टिकतील की नाही याची जबरदस्त शंका वाटते. परंतु ज्या अ‍ॅमिलजवळ सद्ग्रंथ निर्माण करण्यास लागणारी प्रतिभा व शक्ति नव्हती असे त्यांना वाटते, त्या अ‍ॅमिलचे पुस्तक ते कधी जुने होणार नाही. अ‍ॅमिलचे पुस्तक सदैव जिवंत राहील, सदा नवीनच वाटेल. ते कधीच नौरस व बेचव होणार नाही. अवीट असे ते पुस्तक आहे. त्याच्या पुस्तकाची नेहमी जरूर भासेल व ते वाचणा-यांच्या मनावर व जीवनावर परिणाम करील, तस्परिणाम करील.

ग्रंथकाराच्या हृदयांतील धडपडी, वेदना, त्याच्या आशानिराशा, त्याच्या जीवनांतील रात्रंदिन चालणारे युध्दाचे प्रसंग... ह्यांचे प्रतिबिंब त्याच्या ग्रंथांत जितके स्वच्छ व स्पष्ट पडेल, तितका तो ग्रंथ अधिक महत्त्वाचा व जरूरीचा ठरेल. आपण सारे धडपडणारे जीव आहोत. दुस-याची धडपड आपणास धीर देते. दुस-याची धडपड आपणास शहाणपण शिकविते. काव्य असो, नाटक असो, कथा असो, कादंबरी असो, भावगीत असो वा गंभीर ग्रंथ असो, कशाचे विडंबन असो वा मंडन असो, विनोद असो वा उपहास असो. या सर्व साहित्यराशीत महत्त्व जर कशाला असेल, तर ते त्यातून दिसून येणा-या अंतरात्म्याच्या धडपडीला. ज्या भव्य विचारसृष्टीत, ज्या दिव्य शब्दरचनेत धडपड नाही, धडधडणा-या ज्वाळांप्रमाणे आत्म्याची तगमग दिसत नाही, ते सारे निष्प्राण मडयाप्रमाणे होय.

अ‍ॅमिलची प्रत्येक शब्दांत धडपड आहे. त्याची व्याख्याने, त्याच्या कविता, त्याचे निबंध... ती सारी मेली, मातीत गेली. परंतु ज्या रोजनिशीमध्ये तो स्वत:जवळच बोलत आहे, अशी ही रोजनिशी, हे त्याचे आत्मगत भाषण, हे अमर आहे. येथे प्राण आहे. कृत्रिमतेला येथे अवसर नाही. येथे जिव्हाळा आहे, जिवंतपणा आहे, येथे ज्ञान आहे, परिणतप्रयत्न आहे, येथे मोद आहे, येथे बोध आहे, येथे सुख आहे, शांति, समाधान आहे. मार्कस ऑरेलस, पास्कल, एपिक्टेटस ह्यांची पुस्तके जशी दैवाने आपणास लाभली अशाच फार थोडया अत्युत्तम पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे व ते चिरंजीव आहे.

पास्कल एके ठिकाणी म्हणतो, लोकांचे एकंदरीने तीन प्रकार दिसून येतात. १) ज्यांना देव मिळाला आहे व ते त्याची सेवा करीत आहेत. २) देव अद्याप न मिळाल्यामुळे जे त्याला धुंडीत आहेत. ३) ज्यांना देव मिळालेलाही नसतो व जे त्याला धुंडण्याच्या भानगडीतही पडत नाहीत.

पहिल्या प्रकारचे लोक सुखी व विचारवंत असतात. शेवटच्या प्रकारांतील दु:खी व मूर्ख असतात. मधल्या वर्गातील लोक दु:खी असतात. परंतु विवेकी व विचारीही असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel