वनस्पतिप्रांत व प्राणिप्रांत यांच्यात याधीच एक अन्नाची प्रयोगशाळा देवाने उघडलेली आहे. मोठमोठया शास्त्रज्ञांनी कितीही आकांडतांडव केले तरी या प्रयोग-शाळेहून सुंदर, यशस्वी व विशाल प्रयोगशाळा त्यांना निर्माण करता येणार नाही. या प्रयोगशाळेतील रम्य, रुचकर व मधुर फळे चाखण्यासाठी प्रत्येकाने श्रम मात्र करावयास हवा. मनुष्यामध्ये हातपाय हलविण्याची नैसर्गिक वृत्ती आहे. मनुष्याला काम करण्यात आनंद व सुख असते. केवळ निरुद्योगी बसण्यात माणसाच्या देहाला आनंद नसतो व मनालाही नसतो. या श्रमाच्या नैसर्गिक वृत्तीचा खून करून जगणे म्हणजे विचित्रच प्रकार आहे. ते जीवन नीरस वाटेल, कृत्रिम व कंटाळवाणे वाटेल. ते हातपाय न हलविता जगणे म्हणजे महान संकटच वाटेल, आपत्तीच वाटेल. सृष्टिमातेच्या सान्निध्यात श्रम करणे वाहून थोर काय आहे? तो श्रम शक्तीबाहेर नसला म्हणजे झाले. सारे जर श्रम करतील तर काहींनाच मरेमरेतो श्रमावे लागणार नाही. वरती आकाश, खाली धरित्री, शेजारी झाडेमाडे, पाखरे किलबिल करीत आहेत. गाईगुरे हंबरत आहेत. वारा अंगाला कुरवाळीत आहे. सुर्याचे आरोग्यदायी किरण अंगाला लागत आहेत-असा तो शेताभातातील आरोग्यप्रद, आनंदप्रद श्रम-तो गमावणे व त्या प्रयोगलयात अन्नाच्या गोळया करीत बसणे यात काय काव्य, काय आनंद आहे ते ते शास्त्रज्ञच जाणत! ही नैसर्गिक श्रमप्रवृत्ती न मारता ज्यांची मेली आहे त्यांचीही जागृत करावी व सर्वांनी या भव्य प्रयोगालयातील मधुर फळे भरपूर खावीत! परंतु त्याऐवजी हे शास्त्रज्ञ काय करून राहिले आहेत पहा. ईश्वराने तयार ठेवलेल्या या वस्तूंचा उपयोग व उपभोग घेण्याच्या जे जे विरुध्द येत असेल, ते ते नष्ट करून टाकण्याऐवजी, त्या कामी सारी शक्ती वेचावयाऐवजी, हे शास्त्रज्ञ ज्या परिस्थितीमुळे हे ईश्वरी प्रसाद माणसाला घेता येत नाहीत, ती विषम अशी सामाजिक रचनापध्दती अभेद्य व अच्छेद्दयच आहे, तिच्यात बदल करता येणार नाही, बदल करता कामा नये असे सांगत आहेत! मनुष्य आनंदाने काम करील व स्वत:च्या श्रमाचे ते गोड फळ मिळवील. तो भूमी नाकारील, ती माउली त्याला मनगटासारखी भरदार कणसे देईल. सर्वांना जमीन आहे, सर्व श्रमाने खात आहेत-अशी व्यवस्था निर्माण करण्याऐवजी, अशा व्यवस्थेची खटपट करण्याऐवजी हे शास्त्रज्ञ अशा पध्दती व साधने शोधून काढू पहात आहे की ज्यामुळे मनुष्य हा एक कृत्रिम, मुद्दाम होऊन केलेला दुबळा गर्भगोळ अणू होईल. चिनी बायका ज्याप्रमाणे पाय लहानपणीच करकच बांधून ते लहान करून मग मोठेपणी चालता येत नाही म्हणून फेंगाडत चालतात; काठीचा आधार घेतात, तसेच हे मुद्दाम दुबळे होणे होय, स्वत:च्या नैसर्गिक शक्ती मारणे होय. बंद व दूषित खोलीतील माणसाला बाहेर उधळया हवेत काढणे-हे त्याला साहाय्य देण्याऐवजी त्या खोलीतच पंपाने शुध्द हवा त्याच्या फुप्फुसात भरू पहाण्यासारखे आहे. त्या खोलीतच तो कसा जगेल याची व्यवस्था शास्त्र करू पहात आहे.

शास्त्र जर असत्पथप्रवृत्त नसते, योग्य मार्गावर असते तर असली भलभलती ध्येये, खोटी व कृत्रिम ध्येये अस्तित्वात येती ना. आणि असल्या शास्त्राने दिलेल्या पायावर कलेने दिलेल्या भावनांची उभारणी व्हावयाची!

परंतु असले चुकीचे व दूषित शास्त्र भावना तरी कोणत्या देऊ शकणार? या शास्त्रातील एक भाग जुनाट, अर्थहीन रूढींचेच समर्थन करीत आहे, अयोग्य  सामाजिक रचनेचेच समर्थन करीत आहे; दुसरा भाग ज्या गोष्टीचा जीवनाच्या विकासाशी संबंध नाही, असल्या पोरकट वस्तूंच्या संशोधनात व अभ्यासात दंग आहे. अशी ही शास्त्रे कलेला सद्विषय कशी देऊ शकतील? अशा शास्त्रातील विचार कला हृदयगम्य कशी करू शकेल? सत्कलेच्याने हे करवणार नाही.

म्हणून शास्त्रावर न विसंबता नवकलेने स्वत:चा मार्ग स्वत:च चोखाळला पाहिजे, नाहीतर आंधळया शास्त्राच्या पाठोपाठ जाऊन तीही खड्डयात पडावयाची. उद्याच्या सत्कलेने स्वत:चा दिवा स्वत:च लावावा. शास्त्र सध्या तरी तिला मार्ग दाखवील अशी आशा नाही. उद्याच्या कलेला खरोखरची यथार्थ कला जर व्हावयाचे असेल तर असे केल्याशिवाय तिला गत्यंतर नाही. तिने हा धैर्याचा मार्ग तरी अवलंबला पाहिजे, नाहीतर आजच्या संकुचित असत् शास्त्राच्या पाठोपाठ तिने गेले पाहिजे. आजची कला हेच करीत आहे. उद्याची कला हेच करणार का ती नवपथगामिनी होणार!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel