हा जो महान फरक, जमीनअस्मानाचा फरक-तो लोकांच्या पचनी पडेना. ख्रिस्ती लोकांना प्राचीन लोकांच्या कलेतील तमोगुणत्व टाकवेना. आहे तेच पुढे चालवावे असे त्यांना वाटू लागले. इराणची कला ग्रीकांनी उचलली, ग्रीकांपासून रोमन लोकांनी घेतली. परंतु, त्यांत ना फारक, ना प्रगती. प्राचीन कलेत हे जे प्रगतिहीनत्व होते, तेच आलस्यांत पडून व विलासांत रमून आपण पुढे चालवावे असे ख्रिस्ती जनतेला मोहाने वाटे. हा मोह टाळणे त्यांना जड जाई. प्राचीन प्रगतिहीन व संकुचित कलेची त्यांना सवय झालेली. ख्रिस्ताने सांगितलेला मार्ग त्यांच्याने घेववेना, तो महान फरक करवेना. ख्रिस्ताच्या धार्मिक कलेतील विषय त्यांना इतका नवीन वाटला, पूर्वीच्या कलेतील विषयापेक्षा इतका भिन्न वाटला की, ख्रिस्ताची धार्मिक कला म्हणजे कलाच नव्हे असे ते म्हणू लागले. परंतु प्राचीन कला प्राचीनांना धर्ममयच होती. आज ती तशीच आपणांस वाटत नाही. प्राचीन
-------------------------
१. १८१२ मध्ये रशियांनी जो फ्रेंचांचा पराजय केला त्याचे स्मारक म्हणून मास्को शहरांत प्रचंड चर्च उभारला गेला. कला ही आज आपणांस अर्थहीन झालेली आहे. आपली इच्छा असो वा नसो, तिचा त्याग करणे प्राप्त आहे.

ख्रिस्ताच्या शिकवणीचे सार असे की आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत. ईश्वराशी आपला सर्वांचा एकच संबंध असल्यामुळे आपणही सारे एकच आहोत. आपला एक पिता म्हणून आपणही सारे भाऊभाऊ. ख्रिस्ताची मुख्य शिकवण अशी असल्यामुळे जी खरी ख्रिस्तानुगामी कला असेल तिचा मानवांचे परस्परांशी ऐक्य व मानवांचे देवाशी ऐक्य हाच विषय असला पाहिजे.

मनुष्यांचे परस्परांशी व पुन्हा परमेश्वराशी असे दुहेरी ऐक्य जोडणे-यांतील अर्थ पुष्कळांना दुर्बोध वाटतो. या शब्दांचा व्यवहारांत फार उपयोग करीत असल्यामुळे हे शब्द जणू दुर्बोध व अर्थहीन वाटतात. जे गंभीर शब्द वाटेल तेथे वापरले जातात, त्यांच्यांतील गांभीर्य गळून जाते. परंतु तसे असले तरी ह्या शब्दांतील अर्थ स्वच्छ व असंदेह असा आहे. जे कोणालाही न वगळता सर्वांना एकत्र घेते-असे जे मानवी ऐक्य ते खरे ख्रिस्तधर्मीय ऐक्य होय. ख्रिस्ताने जे ऐक्य सांगितले ते हे होय. (इतरांना वगळून काही लोकांचेच केलेले ऐक्य, काही लोकांचेच संघटन हे ख्रिस्ताला अभिप्रेत नसल्यामुळे-ईश्वराशी ऐक्य व सर्वांशी ऐक्य असे दोन शब्द वापरावे लागले. ईश्वराच्या कल्पनेने सर्वांचा समावेश ध्वनित होतो. ईश्वर कोणाला दूर लोटणार?

मानवांना जोडणे, एकत्र आणणे, हृदये हृदयाला मिळविणे हे कलेचे-सर्व प्रकारच्या कलेचे, सर्व देशांतील कलेचे-ध्येय आहे. हा कलेचा हेतू आहे. कला तोडीत नाही तर जोडते, हा कलेचा विशेष होय. ज्यांना ज्यांना कलावानाच्या भावना प्राप्त होतात, ते त्या कलावानाशी व ते सारे समरस होतात. जी कला ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे नाही ती काही विवक्षित मानवसंघांनाच जोडील. हे काही लोकांचे विशेष ऐक्यच, भेदभावांना जन्म देत असते, स्पर्धा व कलह यांना निर्मित असते. असे ऐक्य पुष्कळ वेळा वैराचे कारण होते. देशाभिमानाला कला सारी अशीच आहे. राष्ट्रीय गीते, राष्ट्रीय काव्ये, राष्ट्रीय स्मारके, भेद व वैर यांचेच पोषण करीत असतात. आपले राष्ट्र श्रेष्ठ, आपल्या राष्ट्राची फक्त उन्नती व्हावी-हेच ह्या कलेचे सूत्र असते. दुस-या राष्ट्रांना तुच्छ मानावयास, त्यांना पायाखाली तुडवा असे सांगावयासही ही कला कमी करीत नाही. जशी ही राष्ट्रीय कला तशीच  ती विशिष्ट पंथांची मंदिरी कला. आपला पंथ काय तो श्रेष्ठ असे दाखविणारीच ही धार्मिक-पंथीयांची कला असते. त्यांच्या त्या विशिष्ट मूर्ती, त्यांच्या मिरवणुकी, त्यांच्या मंदिरांतील पुतळे, त्यांच्या पंथांचेच वैशिष्टय दाखवीत असतात. एका पंथाला दुस-या पंथाबद्दल आदर नसतो. हे सारेपंथ परस्परद्वेषी व अनुदार असतात. परंतु ही कला आता जुनाट झाली. तिचे आज प्रयोजन नाही. काही लोकांसच जोडणारी, काही लोकांसच इतरांपासून अलग करणारी ही कला ख्रिस्ताच्या तत्त्वाला अनुसरून नाही. आपलेच राष्ट्र किंवा आपलाच पंथ एवढेच ज्या कलेला दिसते ती आजची कला नाही. आजच्या थोर धार्मिक दृष्टीला अनुरूप ती नाही. ख्रिस्ताच्या शिकवणीविरूध्द ती आहे. खरी ख्रिस्तधर्मीय कला कोणालाही वगळणार नाही. सर्व मानवांचे निरपवाद ऐक्य ती करू पहाते. तिच्याजवळ आपपर नाही. ईश्वराशी आपणा सर्वांचे नाते एकच आहे व प्रत्येकाचे शेजारधर्म एकच आहे, ही भावना देऊन सर्वांचे ऐक्य साधणे हे या कलेचे ध्येय आहे. तसेच अत्यंत साध्या व सरळ अशा समान सुखदु:खाच्या भावना त्या ख्रिस्ताच्या शिकवणीला विरोधी नाहीत. धार्मिक भावना, त्याचप्रमाणे निष्पाप, सरळ, सुंदर अशा इतर सांसारिक भावनाही देऊन सर्वांचे हृदयैक्य ही थोर कला करू पाहाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel