नवीन कला मला समजत नाही एवढयामुळे तिचा तिरस्कार किंवा धिक्कार करण्याचा अधिकार मला प्राप्त होतो असे मला वाटत नाही; (कारण मी १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात शिकलेला, जुना माणूस आहे). माझे म्हणणे एवढेच की मी ज्या कलेला कला म्हणून ओळखतो, ज्या कलेला कला म्हणून मानतो त्या कलेचा या सम्याच्या दुर्बोध कलेहून जर कोणता विशेष असेल, तर तो हा की, मी जी कला मानतो ती, आजची कला जितक्या लोकांना समजेल, त्यापेक्षा पुष्कळच अधिक लोकांना समजेल. आजच्या कलेपेक्षा मी ज्या कलेला कला मानतो ती कला अधिक संग्राहक व मानवी जीवनाच्या क्षेत्राला अधिक व्यापणारी, बहुजनसमाजाला आपली वाटणारी अशी असेल.

मला पूर्वीच्या एका विवक्षित असंग्राहक कलेची, गटे, वीयोव्हेन यांच्या कलेची सवय झालेली आहे व ती मी समजतो. आता दुस-या एका अशाच असंग्राहक कलेतील मला काही समजत नाही, एवढयाने मला असा निर्णय देता कामा नये की माझी पूर्वीची असंग्राहक कला ती मात्र खरी (कारण ती मला समजते) व दुसरी जी मला समजत नाही, ती खोटी किंवा वाईट. मला सांगता येईल ते एवढेच की जसजशी कला असंग्राहक विशिष्ट वर्गांची अशी होत जाते, तसतशी ती अधिक दुर्बोध होत जाते; अधिक अधिक लोकांना समजतनाशी होते. आणि शेवटी बहुजनसमाजापासून दूर जातजात अशा ठिकाणी कला जाते की, फारच थोडे लोक तिच्याभोवती त्या वेळेस असतात. काही निवडक लोकच तिचा रस घेऊ शकतात,  आणि पुढे या निवडक लोकांचीही संख्या घटत जाते.

लोककलेपासून वरच्या वर्गाची कला अलग होताच, असा एक विचार रूढ झाला की, बहुजनसमाजाला दुर्बोध असली तरी आमची कला ही कलाच आहे. हा मुद्दा एकदा मान्य केला जाताच दुसरी गोष्ट आपोआप सिध्द झाली की, कला ही कधीकधी फार थोडयांनाच समजेल. कदाचित् दोघां चौघांस, कदाचित एखाद्यालाच; काही माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांना, किंवा फक्त मलाच ती समजेल; आणि असे असूनही ती कला  असू शकेल. आजचे कलावान हेच सांगतात की ''मी स्वत: निर्माण करतो व माझे मला समजते. इतरांना मी दुर्बोध असेन तर दुर्दैव त्यांचे!''

कला पुष्कळांना समजत नसली तरीही ती सत्कला आहे असे म्हणणे अन्यायाचे आहे. अशा म्हणण्याचे फार अनिष्ट परिणाम होत असतात. परंतु दुर्बोध कलाही सत्कला असू शकते हा विचार आता जणू इतका सर्वमान्य झाला आहे, सुशिक्षितांच्या विचारसरणीत ही गोष्ट इतकी बिंबली आहे की या गोष्टींतील मूर्खपणा, फोलपणा व अन्याय्यपणा दाखविणेही आता अशक्य झाले आहे.

पुष्कळ नामांकित कलाकृतींबद्दल असे नेहमी म्हटलेले ऐकू येते की ''ह्या कलाकृती सुंदर आहेत, उत्कृष्ट आहेत; परंतु त्या समजून घेण्यास मात्र जरा कठीण आहेत'' या असल्या वाक्यांची आता आपणांस सवयच झाली आहे, असे म्हटलेले ऐकण्यात किंवा असे म्हणण्यात काही चुकते आहे असे आपणांस कधीही वाटत नाही, अशी शंका कधी येत नाही. परंतु ही कलाकृती दुर्बोध असली तरी चांगली आहे असे म्हणणे म्हणजे हे अन्न पुष्कळजण खाऊ शकणार नाहीत, तरी ते चांगले आहे, असे म्हणण्यासारखेच आहे. सडलेले उमळणारे मांस, वाईट वास येणारा जुनाट खवा-हे पदार्थ पुष्कळांना आवडणार नाहीत; परंतु ज्यांची रूचीच विकृत झालेली आहे, त्यांना हे पदार्थ म्हणजे पक्वान्ने वाटतात. जे अन्न, जे पाणी, जे फळ बहुजनसमाजाला रुचेल व आवडेल, ते ज्याप्रमाणे चांगले त्याप्रमाणे कलेचेही आहे. विपरीत कला बहुजनसमाजाला आनंद देणार नाही, परंतु सत्कला प्रत्येकाला रिझवील व आनंदवील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel