बॉडलिअर व व्हर्लेन यांच्याच यशाचे व कीर्तीचे कारण हे आहे असे नाही, तर सर्वच दुर्बोध कवींच्या यशाचे रहस्य यांत आहे. कंटाळवाण्या कलेला नवीन पोषाख त्यांनी दिला.

मॅलर्मी, मॅटलिक यांच्याही कविता अशाच आहेत. त्यांच्यातून काही अर्थ काढता येत नाही. परंतु अर्थ नाही म्हणूनच जणू त्यांची फार स्तुती होते. ज्यांतील अर्थ समजतो अशा कविता पूर्वीच्या कवींनी लिहिल्या. आता ज्यांतील अर्थ सापडत नाही, ज्यांत अर्थच नाही, गोडगोड शब्द व असंगत अशी वर्णने व संदर्भ ज्यांत आहे असेच काव्य लिहिणे प्राप्त होते. असे काव्य लिहिणा-याचे काव्य लाखांनी खपते. त्यांच्या त्या दुर्बोध कविता उदयोन्मुख कवींच्या उत्कृष्ट संग्रहांत मुद्दाम दिलेल्या असतात.

आणि मॅटर्लिक हा तर आजचा फारच नावाजलेला लेखक. हे पहा त्याचे एक भावगीत :

''तो जेव्हा गेला (तेव्हा मला दार ऐकू आले) तो जेव्हा गेला तेव्हा तिच्या ओठावर एक स्मित होते...

तो पुन्हा तिच्याकडे माघारा आला. (मला दिवा ऐकू आला.) तो तिच्याकडे पुन्हा माघारा आला तेव्हा तेथे दुसरे कोणी तरी होते.

मला भेटला तो मृत्यु होता. (तिचे हृदय मला ऐकू आले.) मला भेटला होता तो मृत्यू होता. तिच्यासाठी तो अजून वाट पहात आहे...

कोणीतरी आले, काहीतरी सांगण्यासाठी आले. (बाळ! मला भय वाटते.)

कोणीतरी सांगायला आले की तो जाऊ इच्छितो.

माझा दिवा लावून (बाळ! मला भय वाटतं रे!) माझा दिवा लावून मी भीतभीत जवळ गेले.
एका दाराजवळ मी आले. (बाळ! भय वाटतं रे मला) एका दाराजवळ मी आले. दिव्याची ज्योत थरथरली, भीतीने हलली, कापली.

दुस-या दाराजवळ (बाळ! भय वाटतं हो मला) दुस-या दरवाज्याजवळ शब्दांनी ज्योतीला गुदमरविले.

तिस-या दरवाज्याजवळ (बाळ! भिते हो मी) तिस-या दरवाज्याजवळ ती लहान ज्योत विझली.

तो जर एक दिवस परत आला तर? तू मेलेली-तुला त्याने पाहिले तर? त्याला म्हण की, मरणशय्येवर मी त्याची किती वाट पहात होते, किती उत्कंठेने त्याची इच्छा करीत होते.

मला न ओळखून त्याने जर अधिक काही विचारले तर? तर बहिणीप्रमाणे बोल-कारण त्याला वेदना होत असतील...

जर तुझ्याबद्दल त्याने विचारले तर कोणते उत्तर देऊ. सांग. माझी सोन्याची आंगठी त्याला दे व काहीही उत्तर देऊ नकोस.

हा दिवाणखाना रिकामा का, असे त्याने विचारले तर? तो उघडा दरवाजा त्याला दाखव-दिवा मालवलेला असेल.
शेवटच्या घटकेबद्दल विचारले तर? कदाचित् त्याच्या डोळयांत पाणी येईल या भीतीने मी मंद स्मित केले असे सांग.''

कळतो का काही अर्थ? बाहेर कोण गेले, आत कोण आले, कोण कुणाशी बोलत आहे, मेले कोण? सारा गोंधळ. ही तर खरी कला. अर्थ न समजण्यात जी गोड हुरहूर आहे ती अर्थ समजून आला तर थोडीच वाटणार?

रेग्निअर, ग्रिफिन, व्हरहेरन, मोरिआस, माँटेरको इत्यादी विख्यात असे जे तरुण कवी, त्यांची काव्येही अशीच दुर्बोध आहेत. ही दुर्बोधता क्षणिक होती, सहज साहित्याकाशांत जाणा-या अन्नाप्रमाणे आली व ती निघून जाईल असे जे काही म्हणतात ते खरे नाही. अजूनही दुर्बोधता हेच ध्येय आहे व दुर्बोधता म्हणजे उत्कृष्टता असे अद्यापीही मानले जात आहे. नवलेखक याच वृत्तीचे अनुकरण करीत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel