कलात्मक भावना कृत्रिम रीतीने निर्माण करण्यासाठी संगीतात खूप खटाटोप करण्यात येत असतो. कारण संगीताचा मज्जातंतूंवर व इंद्रियांवर तात्काल परिणाम होतो. संगीतरचयिता स्वत: अनुभविलेल्या भावना देऊ पहात नसतो. तो रागांची व सुरांची नाना मिश्रणे करतो. कधी तीव्र कधी कोमल असे भेद, असे विरोध तो निर्माण करतो व श्रोत्यांच्या मज्जातंतूंना खालींवर नाचवितो. श्रोत्यांच्या मज्जातंतूंना हे आरोहावरोह, हे तीव्र कोमल विरोध ऐकून किती ताण बसला ते मोजण्याची यंत्रेही निघाली आहेत! हा जो बाह्य शरीरावर होणारा परिणाम-हा जो ताण-त्यालाच चुकीचे कलात्मक परिणाम असे म्हणण्यात येते.
चौथा मार्ग मागे जो सांगितला तो म्हणजे जिज्ञासेला खाद्य द्यावयाचे. कला म्हणजे कोडे करावयाचे. काव्य, चित्र, कादंबरीच नव्हे. तर संगीतही मोठे गंमतीचे आहे बुवा असे लोक म्हणतात. याचा अर्थ काय? गंमतीचे आहे म्हणजे त्यांत लक्ष लागते, मन रंगते, बुध्दी रमते, असे म्हणतात. परंतु याचा तरी अर्थ काय? अमुक कलाकृती मनाला रमविते, गमतीची वाटते, याचा अर्थ ती कलाकृती नवीन नवीन माहिती देते किंवा ती दुर्बोध कोडे असते, यामुळे तिच्यांत डोके खुपसून अर्थ काढावा लागतो. अर्थ शोधून काढल्यावर आनंद होतो व स्वत:चा अहंकारही तृप्त होतो. एक प्रकारची बौध्दिक कृतकृत्यता वाटते. अशा या तर्कपध्दतीत, या अंदाजाने अर्थ बसविण्याच्या प्रक्रियेत एक प्रकारचा आनंद असतो. परंतु हा कलादत्त आनंद नव्हे. कलावानाचे मुख्य काम स्वत: अनुभविलेल्या भावना जगाला देणे हे आहे. या भावनाग्रहणास, या भावना-स्पर्शास, कलेतील अर्थ शोधून काढण्यासाठी जी बौध्दिक कसरत करावी लागते, जे बौध्दिक श्रम करून घामाघूम व्हावे लागते, त्यामुळे अडथळाच होतो. मेंदूचा दरवाजा उघडा राहतो व हृदयाचा बंद होतो! अमुक कलाकृती उत्कृष्ट आहे की नाही, हे तिच्यांतील अर्थ शोधून काढण्यासाठी बुध्दि किती धडपडली, किंवा तिच्यातून नवीन माहिती काय मिळाली, बहुश्रृतत्त्वांत काय भर पडली, यावरून ठरवता येणार नाही. असल्या गोष्टींनी कलेच्या परिणामाला साहाय्य व मदत न होता, उलट प्रत्यवायच होत असतो.
कलाकृती कितीही काव्यमय, हुबेहूब वर्णन करणारी, परिणामकारक, इंद्रियांना गुंगवणारी, बुध्दीला दंग करणारी अशी असली तरी कलेचे जे मुख्य भावनासंस्पर्शाचे काम, त्याची जागा भरून येणार नाही. अलीकडे वरच्या वर्गात ज्या कलाकृती म्हणून मानल्या जातात, त्या कलाकृती नसून काहीतरी अनुकरणात्मक सोंगे असतात. त्या कलाकृतींतून कलावानाने स्वत: अनुभवलेल्या भावनेचा मागमूसही नसतो. कारण कलावानाने भाडोत्री बनूनच ती कला तयार केलेली असते. श्रीमंतांच्या मनोरंजनार्थ, त्यांच्या चित्तविनोदार्थ भराभरा कलाकृती पैदा होत आहेत. या कलाकृती कलाकृती नव्हेत व त्यांचे निर्माते ते कलावानही नाहीत. नकली कलाकृती निर्माण करणारे हे धंदेवाईक कारागीर होत.
खरी कलाकृती निर्माण करता यावी म्हणून पुष्कळ गोष्टींची जरूरी असते. कलावान अनेक गुणांनी संपन्न असला पाहिजे. त्याच्या काळातील धर्माची परमोच्च भावना त्याच्याजवळ असली पाहिजे. तो मनाने तितक्या उंचीवर गेलेला असला पाहिजे. त्याने भावनांचा स्वत: अनुभव घेतलेला असला पाहिजे. या माझ्या भावना मी दुस-याच्या हृदयांत कधी पेटवीन, माझ्या दिव्याने दुस-यांच्या हृन्मंदिरात कधी दिवे लावीन, असे वेड त्याला लागले पाहिजे. अशी प्रेरणा त्याला आतून असावयास हवी. कलेच्या कोणत्या तरी विवक्षित क्षेत्रांतील शक्ती त्याच्याजवळ असायला पाहिजे. ख-या सत्कलेच्या संभवार्थ ह्या इतक्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. हा गुणसमुच्चय एकाच व्यक्तीचे ठायी भाग्येच दिसून येत असतो. भराभरा कलाकृती प्रसवणा-यांना इतक्या गोष्टींची जरूर भासत नाही. कोणत्यातरी कलांगाची शक्ती असली म्हणजे त्यांना पुरे होते. मग अनुकरण, उसने घेणे, विरोधादि परिणामसाधने, काहीतरी नाविन्य आणणे, दुर्बोधत्व इत्यादींच्या साहाय्याने ते आपला बाजार थाटतात, दुकान सजवितात व त्यांना भरपूर प्राप्तीही होते. कारण श्रीमंत वर्ग त्यांचे बांधलेले गि-हाईक आहेच. साहित्यविषयक कलेत स्वत:चे विचार व स्वत:ची मते नीट मांडता येणे व बारीकसारीक वस्तूंचे स्मरण राहून त्या नीट वठवून देता येणे. या दोन गोष्टी असल्या म्हणजे पुरे. चित्रकलेत निरनिराळया रेखा, आकार, रंग यांचे स्मरण ठेवणे व निरनिराळया आकारांतील, रंगांतील भेद नीट ओळखणे-एवढे असले म्हणजे बस. संगीतांत मधला काळ ओळखता येणे, मुरांचे पौर्वापर्य नीट लक्षात राहणे, आरोह व अवरोह माहीत असले म्हणजे पुरे. आजच्या काळांत एखाद्याजवळ जर ह्यांतील एखादी शक्ती असेल व कलेच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रांत जर तो शिरेल व तरबेज होण्याचे ठरवील तर ते त्याला सोपे आहे. अशक्य असे आज काही उरलेच नाही. वर सांगितलेल्या नकली कलेच्या उसनवारी इत्यादी साधन-चतुष्टयाच्या साहाय्याने पसंत केलेल्या विशिष्ट शाखेत भराभरा कलाकृती निर्माण करता येतील; ते निर्मितीतंत्र मात्र लाभले पाहिजे. साधन-चतुष्टयाचा कौशल्याने कसा उपयोग करावयाचा ते माहीत हवे. ते तंत्र एकदा हस्तगत झाले की मग काय विचारता! मनुष्याजवळ जर भरपूर धिमेपणा असेल, त्याची खरी कलात्मक भावना जर जिवंत नसेल. (कारण जिवंत असेल तर तो अशा कृतींकडे ढुंकूनही पहाणार नाही.) तर मरेपर्यंत खंड न पडता कलाकृती तो प्रसवत राहील व त्या कलाकृती सत्कला म्हणून हा वरचा समाज प्रेमाने कवटाळील.