आज जी दळणवळणाची साधने वाढत आहेत त्यांच्यामुळे हेच सत्य नकळत स्पष्ट केले जात आहे, हेच दूरचे ध्येय दाखविले जात आहे. या सत्याचाच विजय ही साधने पुकारीत आहेत. तारायंत्रे, ध्वनिवाहके, छापखाने प्रत्येकाला ऐहिक सुख मिळवून घेण्याबद्दलची शक्यता-या सर्व गोष्टी ऐक्याचाच सेतू बांधीत आहेत. दिवसेंदिवस मनुष्यामध्ये खोटया भेदभावना निर्माण करणा-या दुष्ट व खोटया रूढींचा नाश करण्यात येऊन, मानाचा प्रसार करण्यात येऊन उत्कृष्ठ अशा कलाकृतींतून बंधुभावावर जोर देण्यात येऊन हेच ध्येय निश्चितपणे दर्शविले जात आहे.

मानवीजीवनाचा नाश करता येणार नाही, करणे शक्य नाही. कला हे मानवजातीचे दिव्य साधन आहे. ज्या धार्मिक ध्येयाने मानवजात जगते ते ध्येय मारून टाकण्याचे, ते ध्येय डोळयाआड करण्याचे, ते नेस्तनाबूत करण्याचे कितीही प्रयत्न वरच्या वर्गातील लोकांनी जरी केले, तरीही दिवसेंदिवस त्या ध्येयाची अधिकच प्रचिती, कल्पना लोकांना येत आहे, त्याची आवश्यकता लोकांना भासत आहे. आपल्या विकृत समाजातही याच ध्येयाचा उच्चार व अविष्कार शास्त्र व कला यांच्याकडून उत्तरोत्तर अधिकाधिक केला जात आहे. या सध्याच्या शतकात ज्या कृतींतून ख्रिश्चन धर्मातील खरीखुरी भावना ओतप्रोत भरलेली आहे, अशा कृति साहित्य व चित्रकला यातून अधिकाधिक प्रमाणात प्रकट होऊ लागल्या आहेत; त्याचप्रमाणे सर्वसामान्य असे जे जीवन, जे जीवन सर्वांनाच प्राप्त होत असते. त्याचेही सहृदय व सुंदर वर्णन करणा-या कलाकृती विश्वजनांच्या कलेत उत्पन्न होत आहेत. सारांश, आज कलेनेही युगधर्म ओळखला आहे. आपल्या सद्य:कालातील उत्कृष्ट कलाकृती मानवाचे ऐक्य व बंधुभाव यांचे विचार व यासंबंधीच्या भावना देत आहेत (डिकन्स, व्हिक्टर व्ह्यूगो, डोस्टोव्हस्की इत्यादि कादंबरीकार; मिलेट, बॅस्टियन, लेपेझ, ल्हर्मिट्, जूल्समेटन वगैरे चित्रकार-यांच्या कृती). त्याचप्रमाणे या कलाकृतींतून केवळ वरच्या वर्गातील लोकांचीच अपवादात्मक जीवने रंगविण्यात येत नसून, ज्या भावना सर्वांच्या हृदयांना जोडतील व हलवतील अशा भावना दिल्या जात आहेत. अशा कलाकृतींची संख्या अजून फारशी नाही हे खरे. परंतु आरंभ झाला आहे. सुचिन्हे दिसू लागली आहेत. अशा कृतींची आवश्यकता जाणवू लागली आहे. अशा कलाकृती पाहिजेत असे सर्वजण कबूल करीत आहेत, मान्य करीत आहेत. अलीकडे दिवसेंदिवस पुस्तके, चित्रे, संगीत, नाटके सामान्य लोकांच्या उपयोगासाठी पुढे येत आहेत. सामान्य लोकांना यांचा उपयोग व्हावा म्हणून अधिकाधिक प्रयत्न होत आहेत. जेवढे व्हावयास पाहिजे, त्याच्या मानाने हे काहीच नाही. परंतु सुरूवात झाली हेच सुचिन्ह. सत्कला स्वभावत:च ज्या मार्गाने जाऊ पहात असते, सत्कलेचा जो सहजसुंदर पंथ, त्या पंथावर ती पुन्हा आली, त्या पंतावर पावले टाकू लागली हे यावरून दिसून येत आहे.

मानवामधील बंधुभाव, मानवाचे सर्वांगिण हार्दिक ऐक्य हे जीवनाचे साध्य आहे; सामुदायिक जीवनात या व्यक्तीच्या जीवनात हीच दृष्टि अंगिकारली पाहिजे; हीच धर्मदृष्टि, हाच आजचा धर्म. ही धर्ममय प्रवृत्ति आज इतकी स्पष्ट झालेली आहे की लोकांनी सौंदर्याची वा सामर्थ्याची खोटी कल्पना टाकून देरेच फक्त शिल्लकराहिले आहे. ज्या सौंदर्याच्या विचारसरणींप्रमाणे सुखोपभोग हा कलेचा हेतू मानला जाई, ती टाकणे एवढेच बाकी राहिले आहे. थोर धर्मदृष्टि हीच आपल्या काळातील केलेला पुन्हा उघडपणे मार्ग दाखवील यात आता संशय नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel