पास्कलने ज्यांना देव मिळाला आहे व जे देव मिळवू पहात आहेत यांच्यात फरक केला आहे. परंतु हा फरक वाटतो तेवढा मोठा नाही. माझ्या मते तर पहिल्या दोन प्रकारच्या लोकांत फरकच नाही. जे सर्वभावेकरून कष्ट करीत, धडपडत देवाला शोधीत असतात, ते मला वाटते की देवाचीच सेवा करीत असतात. त्यांची ती धडपड म्हणजे सेवाच आहे व ती देवाघरी रुजू आहे. कारण देवाचा शोध करीत असताना ज्या दिव्य धडपडीतून, ज्या हालअपेष्टांतून, ज्या आशानिराशांतून ते जातात, त्या धडपडीने ते लोकांना एक रस्ताच बांधून देतात. देवाकडे जाण्याचा रस्ता स्वत: घामाघूम होऊन ते तयार करीत असतात. जाण्याचा हा पंथ ''एष पंथा निघते अयनाथ'' अशी जणू ते लाल पाटी लावून देतात. पास्कलने आपल्या चिंतनांत हेच केले आहे व अ‍ॅमिलनेही आपल्या रोजनिशीत तेच केले आहे.

अ‍ॅमिलचे सारे जीवन ह्या चिंतेने भरले आहेत. देवाचा शोध तो आमरण करीत आहे. त्याच्या वेदना, त्याची दु:खे, त्याचे अश्रू... सारे आपणास दिसून येते. या देवाच्या शोधाचे मनन, चिंतन, निदिध्यासन फारच उद्भोदक असते. कारण ते नित्यनूतन असते. सत्य आपणाला मिळाले असे शोधकाला कधीच वाटत नाही. तो पाऊल कायमचे कोठेच रोवीत नाही, तो आणखी पुढे पुढेच जात असतो. त्याचा शोधच चालू असतो. तो कधीही शिकवू लागत नाही. ''मला सत्य मिळाले, मला प्रकाश मिळाला, कोडे सारे उलगडले. या, लोकहो या, माझा संदेश ऐका'' असे बाहू उभारून अ‍ॅमिल पुकारीत नाही. तो स्वत:शी किंवा दुस-याशी असे कधी म्हणत नाही. जो खरोखर सत्याच्या शोधांत असतो, त्याला गटेप्रमाणे अधिक प्रकाश, अधिक प्रकाश असेच म्हणावेसे वाटते. सत्याचे स्वरूप अधिकाधिक समजावे म्हणून तो शक्य ते सर्व अविरत करीत असतो. स्वत:च्या नेणतेपणाची त्याला सदैव जाणीव असते. अ‍ॅमिल हा अशाच प्रकारचा आहे. ह्याच मार्गातील तो यात्रेकरून आहे. ख्रिस्ताची खरी शिकवण काय, ख-या ख्रिस्तधर्मीयाने खरोखर कसे वागले पाहिजे, याचेच तो सर्वदा चिंतन करीत असतो. आपल्याजवळ जे आहे तेच सा-या ख्रिस्तीधर्माचे स्वरूप, ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणेच आपण जीवनकंठीत आहोत, ही अ‍ॅमिलला जाणीव नाही. अ‍ॅमिलच्या रोजनिशीत थोर व उदात्त अशी ख्रिश्चन भावना सर्वत्र भरलेली आहे. परंतु अ‍ॅमिलला त्याची जाणीव नाही. त्याच्या या नेणतेपणामुळे, त्याच्या अहंकारशून्यतेमुळे त्याच्या विचारांचा व त्याच्या भावनांचा वाचकावर अधिकच परिणाम घडतो. ही निरहंकारता व नम्रता हृदयाला जाऊन भिडतात. अ‍ॅमिल जणू स्वत:च्या हृदयाजवळच बोलत आहे. तेथे आडपडदा नाही. आपले म्हणणे कोणी ऐकत आहे ह्याची कल्पना तेथे नाही. ज्या गोष्टीची त्याला खात्री नाही, त्याच्याबद्दल नसती प्रौढी त्याने कोठेही मिरविली नाही. जे समजत ना, ते समजत नाही म्हणून त्याने लिहिले आहे. ज्याच्याबद्दल संशय आहे, तेथे तो त्याने प्रकट केला आहे. जे स्वत:ला पटत नाही, पटलेले नाही, ते स्वत:ला पटले आहे असे दाखविण्याच्या भानगडीत तो पडत नाही. स्वत:च्या वेदना, मानसिक संताप, स्वत:च्या आशा-निराशा सारे हृदय, सारे जीवन येथे उघडे आहे. जीवनाचा ग्रंथ स्वच्छ उघडलेला आहे. जीवनातील अंधार व प्रकाश, भले व बुरे सारे येथे मांडलेले आहे.

अ‍ॅमिलच्या हृदयगाभा-यांत, त्याच्या जीवनाच्या खोल अंतरंगांत त्याच्या न कळत आपण शिरतो. थोर अंतरंग, जिव्हाळयाने, उत्कट तळमळीने तडफडणारे ते अंतरंग! त्या अंतरंगांत आपण शिरतो व तेथील पावनता व गंभीरता अनुभवितो. जी अंत:सृष्टि बाह्यदृष्टीला बंद असते त्या अंत:सृष्टीतील मांगल्य, त्या आतील गाभा-यातील महादेव त्याचे आपणास दर्शन होऊन आपणही जणू पुणीत व कृतार्थ होतो.

अ‍ॅमिलच्या पेक्षाही उत्तम भाषेत मांडलेले धार्मिक विचार दुस-या ग्रंथांतून असतील. परंतु इतके हृदयपरीक्षण, इतके आत्मपृथ:करण, स्वत:च्या जीवनाचा इतका परिचय, स्वत:चे इतके आविष्करण अन्य ग्रंथांत दिसून येणार नाही. मरणापूर्वी कांही थोडे दिवस हे प्रस्तुतचे दुखणे आपणास गुदमरवील, मारील ही पूर्ण जाणीव असल्यामुळे त्याने पुढीलप्रमाणे लिहिले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel