हया प्रश्नाचें उत्तर देण्यासाठी सौंदर्यशास्त्रावरचे जे प्रमुख ग्रंथ आहेत, त्यांत सौंदर्य शब्दाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत, त्या येथें उध्दृत करणे आवश्यक आहे. हया ज्या व्याख्या मी उतरुन देईन, त्या वाचतांना वाचकाने कंटाळूं नये हे उतारे तर त्याने वाचावेच, परंतु जर सौंदर्यमीमांसेवरचे कांही विद्वन्मान्य व थोर म्हणून मानले जाणारे ग्रंथ तो वाचील तर अधिक बरें होईल. जर्मन भाषेंतील प्रचंड व अवाढव्य ग्रंथकार दूरच राहिले; परंतु जर्मन भाषेंतील कॉलिकचा ग्रंथ, इंग्रजीमधील नाईटचा ग्रंथ, फ्रेंच भाषेंतील लेव्हेकचा ग्रंथ. या तिहींतील एखादें तरी पुस्तक त्यानें वाचून काढावें. हे ग्रंथ चांगल्या प्रकारचे आहेत. सौंदर्यशास्त्रविषयक जीं नाना मतें आहेत व जे नाना पंथ आहेत, ज्या नाना गुंतागुंती, घोटाळे व भानगडी आहेत, तें सारें साग्र व साद्यत समजून घ्यावयास सौंदर्यशास्त्रावरचे विद्वान् ग्रंथकार स्वत: आपण अभ्यासिले पाहिजेत. कारण हया महत्त्वाच्या गोष्टींत दुस-याच्या सांगण्यावर विसंबणे बरें नव्हे.

सौंदर्यशास्त्रावर शास्लर हयानें प्रचंड ग्रंथ लिहिला आहे. तो विस्तारपूर्वक लिहिलेला आहे. हा ग्रंथाच्या प्रस्तावनेंत शास्लर लिहितो, तत्त्वज्ञानाच्या कोणत्याहि प्रांतांत, विचाराच्या कोणत्याहि क्षेत्रांत सौंदर्यशास्त्रांत जितका गोंधळ आहे, तितका क्वचितच असेल. सौंदर्यशास्त्रांत विचाराच्या नाना पध्दति, नाना प्रक्रिया, नाना मतें, नाना दृष्टि, नाना विवेचनें, नाना भाष्यें ! एकमेकांचा एकमेकांशी मेळ नाही; इतकेंच नव्हे तर स्वत:च्या विचारांचा स्वत:शीं मेळ नाहीं; परस्पर विरोधी विचार एकाच ग्रंथांत ग्रंथकारानें प्रकट केलेले दिसून येतील ! एका बाजूला मोठमोठे अगडबंब शब्द-अर्थशून्य रीतीनें वापरलेले आढळतील. ना तेथें खोल विचार ना खोल दृष्टि. सारा उथळ कारभार. परंतु दुस-या बाजूला उत्कृष्ट विवेचनशैली, खोल गाढी बुध्दि, विषयाचें सांगोपांग विस्तृत व विपुल असे पर्यालोचन-हेंहि सारें दिसून येतें. येथें पदोपदी तार्किकाची व तत्त्वज्ञान्याची सूक्ष्म परिभाषा वापरलेली दिसून येते. अत्यंत साधे विचारहि हे लेखक अशा रीतीनें मांडतात की ते दुर्बोध होऊन जातात. सौंदर्यशास्त्राच्या मंदिरांत शिरण्यासाठी म्हणून साध्या विचारांना कठिण व गहन भाषेंत नटवून मांडतात ! हया सूक्ष्म तार्किकी पध्दतीमुळें ते साधे सुबोध विचार मरुन जातात, अद्दश्य होतात. एकीकडे विचारशून्यता व केवळ शब्दांचे रिते पोकळ शिंपले, दुसरीकडे विचारच विचार इतके कीं ते समजत नाहींत ! या दोन प्रकारांच्यामध्यें एक तिसराहि प्रकार आहे. हे तिस-या प्रकारचे लोक कधी शब्दवेल्हाळ असतात तर कधीं पांडित्याचें प्रदर्शन करितात. या तिन्ही पध्दतीतील दोष ज्या विवेचनशैलींत नाहीत, जी विवेचनशैली सुबोध व स्पष्ट असून विषयप्रतिपादनहि उत्कृष्ट करिते, जणुं विषय वाचकासमोर अंतर्बाहय मूर्तिमंत उभा करिते, ज्या विवेचनशैलींतील कोठेंच आढळून येत नाहीं-आणि या सौंदर्यशास्त्रांत तर अशी विवेचनशैली भाग्यानेंच दृष्टीस पडते. शास्लरचें जें हें म्हणणें, त्याची सत्यता पटावयास त्याचेंच पुस्तक वाचलें म्हणजे झालें !

फ्रेंच लेखक व्हेरन् हा आपल्या उत्कृष्ट पुस्तकाच्या प्रस्तावनेंत लिहितो:- सौंदर्यशास्त्रांत तत्त्ववेते आपापल्या इच्छेनुरुप खेळ करुन राहिले आहेत. हया शास्त्राचा विचार करितांना जणुं ते स्वप्नसृष्टीतच वावरत असतात ! त्यांना प्रत्यक्षाचा त्यामुळें विसर पडतो. प्लेटोपासून तों आजपर्यंत झालेल्या सर्व सौंदर्यमीमांसकांनी कलेचा नुसता खेळखंडोबा मांडला आहे. कलादेवीच्या झिंज्या ओढून आपापला अर्थ तिच्याकडून वदवीत आहेत. हया सर्वांनी गोंधळ केला आहे, भुलभुलावणी केली आहे. भरमसाट कल्पना, दुर्बोध विचार, सर्वांचें एक कडबोळें करुन त्यांनी दिलें आहे. हया सर्वांच्या विचारांचे पर्यवसान ध्येयभूत अभिजात सौंदर्याच्या कल्पनेंत” झाले आहे. प्रत्यक्ष वस्तुजातीचें अक्षय, अमर व अमूर्त असें जें रुप तें चिरंतन सौंदर्य होय-असें या सर्व विचारांचें नवनीत निघालें आहे.

सौंदर्यशास्त्रावरील प्रमुख ग्रंथांतून ज्या सौंदर्याच्या व्याख्या आहेत, त्या पुढच्या प्रकरणांत  देण्यांत येणार आहेत. त्या वाचण्याचे श्रम जर वाचक घेतील, तर सौंदर्य शास्त्रांतील घोटाळयाबद्दल जें वर वर्णन आलें आहे, तें किती यथार्थ आहे तें दिसून येईल.

सॅक्रिटिस, प्लेटो, ऍरिस्टाटल यांच्यापासून तों प्लेंटिनसपर्यंतचे जे प्राचीन तत्ववेत्ते, त्यांनी केलेल्या सौंदर्याच्या व्याख्या मी देणार नाहीं. कारण सद्विहीन सौंदर्याची कल्पना प्राचीनांस नव्हती. त्यांच्या सौंदर्यविषयक कल्पनेंत सत् कल्पनेचा अवश्य अंतर्भाव होत असे. आजच्या आपल्या काळांतील कलेचा पाया, कलेचा प्राण, कलेचें ध्येय-म्हणून जें सौंदर्य समजलें जातें-त्यांच्यात सत्चा अंतर्भाव असेल या नसेलहि. सत् हें सुंदराचें आवश्यक अंग असे अर्वाचीन मानीत नाहींत. आपली आजची जी सौदर्याची कल्पना आहे, तिचें विवेचन करितांना, पुरातन ऋषीनी व तत्ववेत्त्यांनी ज्या व्याख्या केल्या, त्यांचा उल्लेख अर्वाचीन सौंदर्यशास्त्रविषयक ग्रंथांत करण्यांत येतो. परंतु असे करतांना पूर्वजांच्या मनांत जो अर्थ नव्हता, तो अर्थ त्यांच्या शब्दांत आपण पाहात असतों. आपण दुसरे अर्थ त्यांच्यावर लादीत असतों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel