आर्यांची सप्तसिंधूवर स्वारी

२९. आजकालच्या सिंध आणि पंजाब प्रांताला वैदिक काळीं सप्तसिंधु म्हणत असत असें दिसतें. ऋ० १।३२।१२, , ऋ० १।३५।८, ऋ० २।१२।१२, इत्यादि ठिकाणीं ‘ सप्तसिंधून् ’ असा प्रयोग आढळतो. ऋ० ८।२४।२७ येथें ‘ सप्तसिन्धुषु ’ असाहि प्रयोग सांपडतो. अर्थात् ऋग्वेदकाळीं पंजाब व सिंध देशाला सप्तसिंधु नांव होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. आवेस्ता ग्रंथांत ह्याच प्रदेशाला हप्तहिन्दु म्हटलें आहे. ऋग्वेदांत चवथ्या मंडलाच्या सतरा, अठरा व एकोणीसाव्या सूक्तांत अनुक्रमें १,७ व ८ या ऋचांतून सिन्धून् असाच प्रयोग आढळतो. यावरून सप्तसिंधु याच्या ऐवजीं सिंधु म्हणण्याचा प्रघात पडला असावा. त्याचें प्राचीन पर्शियन रूपान्तर हिंदु; व यावरूनच सध्या प्रचलित असलेले हिंदु आणि हिंदुस्थान शब्द बनले आहेत.

३०. एलाममधील आर्यांची एक शाखा मितन्नि देशांत गेली व तेथें त्यांनी एक बलाढ्य साम्राज्य स्थापन केलें. याचा दाखला वर निर्दिष्ट केलेल्या बोघइकोईच्या शिलालेखांत सांपडतो. दक्षिणेला तर केशींचें (Kassite) बलाढ्य राष्ट्र असल्यामुळें त्यांच्यांशीं ऐल (Elamite) आर्यांना मैत्रीनें वागणें भाग पडलें असावें. पर्शियन आर्यांशीं त्यांच्या बर्‍याच झटापटी झाल्या. पण त्यांत फारसें यश न आल्यामुळें त्यांचा मोर्चा पूर्वेकडे वळला असल्यास नवल नाहीं. ते सिंध प्रांतांत कोणत्या मार्गानें आले हें नक्की सांगतां येत नाहीं. तथापि शक, हूण इत्यादिकांच्या स्वार्‍या जशा खैबर घाटांतून झाल्या तशा आर्यांच्याहि त्याच मार्गानें झाल्या असल्या पाहिजेत, या अनुमानाला कुठेंच आधार सांपडत नाहीं. वर निर्दिष्ट केलेल्या एकतिसाव्या जातकांत इन्द्राची जी कथा आहे, तिजवरून आर्य पर्शियन आखाताच्या किनार्‍या किनार्‍यानें सिंध देशांत आले असावे असें अनुमान करतां येतें;  आणि ऋग्वेदांत जी समुद्राचीं वर्णनें सांपडतात त्यांवरून या अनुमानाला बळकटी येते.

३१. या सप्तसिंधूच्या प्रदेशावर वृत्राचें प्रभुत्व होतें. याला अहि असेंहि म्हणत. ‘ वृत्रं जघन्वाँ असृजद्वि सिंधून् ’ ऋ० ४।१९।८ या ठिकाणीं त्याला वृत्र म्हटलें आहे, तर ‘ योहत्वाहिमरिणात् सप्तसिंधून् ’ ऋ० २।१२।३, येथें त्याला अहि म्हटलें आहे. तो ज्या लोकांचा पुढारी किंवा राजा होता त्या लोकांना दास किंवा दस्यु म्हणत असत. अर्थात् वृत्रालाहि अनेक ठिकाणीं दास किंवा दस्यु हीं विशेषणें लावण्यांत आलीं आहेत. ‘ विश्वा अपो अजयहासपत्निः ’ ऋ० ५।३०।५, ‘ दासपत्निरहिगोपाः ’ ऋ० १।३२।११, इत्यादि वाक्यांवरून सप्तसिंधूवर दासांचें स्वामित्व होतें हें स्पष्ट होतें. दास म्हणजे क्रूर व जंगली लोक अशी आजकालची समजूत आहे. पण दास शब्दाचा तसा मूळचा अर्थ दिसत नाहीं. दास म्हणजे दाता ( ज्याला इंग्रजींत ‘नोबल’ म्हणतात ) असा अर्थ असला पाहिजे.

३२. महाभारतात वृत्रगीता नांवाचें एक प्रकरण आहे. त्यात भीष्म वृत्राची फार स्तुति करतो. आणि ती ऐकून धर्मराज उद्‍गारतो--

अहो धर्मिष्ठता तात वृत्रस्यामिततेजसः ।
यस्य विज्ञानमतुलं विष्णौ भक्तिश्च तादृशी ।।१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ कुंभकोण, शान्ति प. अ. २८७ ; औंध, अ. २८१, श्लोक १.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( हे पितामह ! अमिततेज वृत्राची धर्मिष्ठता काय सांगावी ? त्याचें तें अतुल विज्ञान ! आणि त्याची ती विष्णूवर भक्ति ! )
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel