८२. परिक्षित् राजाच्या वेळेला यज्ञयागांची प्रथा यमुनेच्या तिरावर येऊन धडकली. ह्या राजाचें वर्णन अथर्व वेदांत सांपडतें तें असें--

राज्ञो विश्वजनीनस्य यो देवो मर्त्यां अति ।
वैश्वानरस्य सुष्टुतिमा सिनोता परिक्षितः ।।७।।
परिच्छिन्नः क्षेममकरोत्तम आसनमाचरन् ।

कुलायन्कृण्वन्कौरव्यः पतिर्वदति जायया ।।८।।
कतरत्ते आहराणि दधि मन्थां परिश्रुतम् ।

जायाः पतिं विपृच्छति राष्ट्रे राज्ञः परिक्षितः ।।९।।
अभीवस्वः प्रजिहीते यवः पक्वः पथो बिलम् ।

जनः स भद्रमेघति राष्ट्रे राज्ञः परिक्षितः ।।१०।। --अथर्व० काण्ड २०, सू० १२७

“ सगळ्या मर्त्य लोकांत श्रेष्ठ अशा सार्वभौम वैश्वानंतर परिक्षित् राजाची उत्तम स्तुति मन लावून ऐका (७). हा कौरव राजा गादीवर आला तेव्हां अंधकाराला बंधन घालून लोकांचीं घरें यानें सुरक्षित केलीं, असें बायकोला नवरा सांगतो (८). परिक्षित् राजाच्या राष्ट्रांत बायको नवर्‍याला विचारते, तुझ्यासाठीं दहीं आणूं कीं लोणी आणूं ? (९). परिक्षित् राजाच्या राज्यांत भरपूर पिकलेला जवस रस्त्याच्या बाजूला पडलेला असतो. (अशा रीतीनें) परिक्षितच्या राज्यांत लोकांच्या सुखाची अभिवृद्धि होत आहे (१०).”

८३. हें भाषांतर जेमतेम आहे. कां कीं, शंकर पांडुरंग पंडित यांच्या अथर्व वेदाच्या संस्करणांत या श्लोकांवर भाष्य नाहीं. हेमचन्द्र रायचौधरी यांनी या श्लोकांचें भाषांतर केलें आहे; १ परन्तु तें निर्दोष वाटत नाहीं. मूळ श्लोकांत ‘ परिच्छिन्नः ’ याच्या बद्दल ‘ परिक्षिन्नः ’ असा पाठ असता तर बरें झालें असतें. अभीवस्वः याचा अर्थ समजत नाहीं.    ‘क्षेममकरोत्तमः ’ याचा अर्थ अत्यन्त सुरक्षित करता झाला असाहि असणें संभवनीय आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ Political History of Ancient India, p. 7.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८४. ह्या अर्थ लावण्याच्या प्रयत्‍नांत विशेष खोल जाण्याचें कारण नाहीं. परिक्षित् राजाचें राज्य अत्यन्त समृद्ध होतें एवढा निष्कर्ष यांतून निघतो; व तेवढाच आम्हाला पाहिजे. अशा सुसम्पन्न राष्ट्रांत घोर आंगिरसानें कृष्णाला शिकवलेली तप, दान, ऋजुभाव, अहिंसा व सत्य, या गुणांनी मण्डित साधी संस्कृति टिकाव कशी धरणार ? अशा संपन्न राजाला भपकेदार यज्ञयागांची संस्कृति प्रिय झाली, व यज्ञयागांत प्रवीण असलेल्या ब्राम्हणांना आणून त्यानें यज्ञयागाचें स्तोम माजवलें, तर त्यांत विशेष कोणता ?

८५. सुत्तनिपातांत ब्राम्हणधम्मिक नांवाचें एक सुत्त आहे. त्याचा सारांश याठिकाणीं देणें अप्रस्तुत होणार नाहीं. “ एकदां भगवान् बुद्ध श्रावस्तींत रहात होता. त्या वेळीं कोसल देशांतील कांहीं वयोवृद्ध ब्राम्हण बुद्धाजवळ आले, आणि कुशल प्रश्नादिक विचारल्यावर त्यांनी भगवन्ताला प्रश्न केला कीं, आजकालचे ब्राम्हण प्राचीन ब्राम्हणधर्माला अनुसरत आहेत काय ? त्यावर भगवंतानें नकारार्थी उत्तर दिलें. तेव्हां त्यांनी प्राचीन ब्राम्हणधर्म सांगण्याची भगवंताला विनंति केली. भगवान् म्हणाला--

८६. “ प्राचीन ऋषि संयमशील व तपस्वी असत. चैनीचे पदार्थ सोडून ते आत्मचिंतन करीत. त्या ब्राम्हणांजवळ पशु व धनधान्य नसे. स्वाध्याय हेंच त्यांचें धनधान्य असे, व ब्रम्हरूपी ठेव्याचें ते पालन करीत... ते ब्राम्हण एकपत्‍नीव्रती असत. ते बायकोला विकत घेत नसत. खरें प्रेम असलेल्या स्त्रीशींच ते लग्न करीत. ते ऋतुकालाभिगामी असत...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel