५२. तेव्हां केवळ आर्थिक स्वातंत्र्यानें स्त्रीस्वातंत्र्याचा प्रश्न सुटेल असें नाहीं. त्यासाठीं स्त्रियांना व पुरुषांना सुशिक्षण मिळालें पाहिजे. स्त्रियांना आपल्या मातृपदाची योग्यता समजली पाहिजे; व स्त्रिया ह्या उपभोग्य वस्तु नसून त्या भावी पिढीच्या माता, अतएव पूज्य आहेत अशी पुरुषांमध्यें श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. बोल्शेव्हिकांनी पहिली - स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याची - पायरी दृढ केली आहे; व दुसरी शिक्षणाची पायरी त्या मजबूत पायावर उभारण्याच्या बेतांत ते आहेत. दरम्यान स्त्री-पुरुषांकडून कांहीं नैतिक दोष घडून आले, तर ते क्षम्य आहेत. टवाळी करून बोल्शेव्हिकांच्या प्रयत्‍नांचा तिटकारा करणें अक्षम्य अपराध आहे. स्त्रीपरिग्रहापासून मानवजातीला सोडवण्याचा जर कोणी खराखुरा प्रयत्‍न केला असेल, तर तो मार्क्सानुयायी बोल्शेव्हिकांनीच होय; आणि यासाठीं आम्ही त्यांचें मनःपूर्वक अभिनंदन करतों.

५३. बुद्धकाळीं स्त्रियांच्या खालोखाल दुसरा परिग्रह म्हटला म्हणजे दासदासींचा समजला जात असे. बाबिलोनिया, इजिप्त, ग्रीस इत्यादि सर्व प्राचीन राष्ट्रांतून दासदासींची संस्था अस्तित्वांत होतीच. किंबहुना या दासांच्या संस्थेवरच त्या देशांतील सर्व संस्कृति अवलंबून असे. आमच्या इकडे या वर्गांतील लोक म्हटले म्हणजे शूद्र होत. वैदिक काळीं दासांप्रमाणेंच त्यांचाहि क्रयविक्रय होत असे. हळू हळू त्यांचें परिवर्तन निकृष्ठ जातींत होत गेलें. कारण त्यांची संख्या इतकी वाढत गेली कीं, वरिष्ठ जातींच्या लोकांना त्यांना दास म्हणून आपल्या पदरीं ठेवणें अशक्य झालें. हाच प्रकार युरोपांत घडला. दासांची संख्या वाढत गेल्यावर त्यांची गणना कुळांत करणें भाग पडलें. त्या कुळांना जमीनीबरोबरच विकतां येत असे. हा प्रघात रशियांत १८६१ पर्यंत चालू होता.

५४. उत्तर अमेरिकेंतील इंग्लिश वसाहतींची वाढ होऊं लागली, तेव्हां या दासांच्या संस्थेचें जोमानें पुनरुज्जीवन झालें. दहा बारा इंग्रजी कंपन्यांनी दासांचा फायदेशीर व्यापार सुरू केला. या कंपन्या हत्यारबंद लोकांच्या मदतीनें आफ्रिकेंतील धडधाकट स्त्रीपुरुषांना व तरुण मुलांमुलींना पकडून जहाजांतून अमेरिकेला नेत, आणि तेथील मोठमोठ्या बाजारांत त्यांची उघडपणें विक्रि करीत. हा अत्यंत क्रूरपणाचा व्यापार पुष्कळ वर्षें चालला होता; आणि अमेरिकेंतील जमीनदारांना ह्याबद्दल कांहींच वाटत नसे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा पाया घालणारे जॉर्ज वाशिंग्टन यांजपाशीं देखील शेंकडों दासदासी होत्या.

५५. अमेरिकेंतून ह्या दास्याचा पाया खणून काढण्याचें श्रेय अ‍ॅब्राहम् लिंकनला मिळालें. त्याचें कारण दास्यामुळें गोर्‍या लोकांवरच कठिण प्रसंग येण्याचा संभव दिसूं लागला, आणि दास्याविरुद्ध असलेल्या उत्तरेकडील व पश्चिमेकडील संस्थानांतील सर्व गोर्‍या लोकांचें नेतृत्व अकस्मात् लिंकनकडे आलें. उत्तरेकडील गोर्‍या लोकांचीं शेतें म्हटलीं म्हणजे लहान लहान असत, व तीं देखील सुपीक नव्हतीं. अर्थात् त्यांना दक्षिणेकडील दासांच्या मालकांनी चालवलेल्या अजस्त्र शेतीशीं स्पर्धा करतां येणें शक्य नव्हतें. दासांचे मालक आपलें धान्य स्वस्त दरानें विकूं शकत, व त्यामुळें उत्तरेकडील शेतकर्‍याच्या धान्याला बाजारांत किंमत अगदीं थोडी येत असे. यामुळें दक्षिणेकडील जमीनदार व उत्तरेकडील शेतकरी यांच्यामध्यें वैमनस्य वाढत जाणें साहजिक होतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel