७३. जसा राजेरजवाड्यांचा, जमीनदारांचा व इतर धनिकांचा संपत्तिपरिग्रह, तसाच किंवा त्याहूनहि जास्त सामान्य लोकांचा सांप्रदायिकतापरिग्रह आमच्या देशाला जाचक होत आहे. सांप्रदायिकता अफीण आहे, हें जें समाजवाद्यांचें म्हणणें, त्याटी आम्हास चांगलीच प्रतीति येत आहे. परंतु सांप्रदायिकतेचें व्यसन कमी करण्याकरतां राष्ट्रीयतेचें नवें व्यसन लावून घेणें योग्य नाहीं. सांप्रदायिकता ही जर अफीण, तर राष्ट्रीयता ही दारू आहे, आणि तिचे दुष्परिणाम पाश्चात्य देशांत व जपानांत कसे घडून येत आहेत, हें आम्हीं पहातच आहोंत. तेव्हां धनिकांना संपत्तिपरिग्रहापासून, सामान्य जनतेला सांप्रदायिकतापरिग्रहापासून व अनुकरणशाली शिक्षित वर्गाला राष्ट्रीयतापरिग्रहापासून सोडविणें हें आमच्या पुढार्‍यांचें प्रमुख कर्तव्य आहे. निदान ह्या सर्व परिग्रहांतून ते स्वतः तरी मुक्त असले पाहिजेत. स्वतःच परिग्रहांत रुतले गेले असतां त्यांतून ते इतरांचा उद्धार करतील, हें संभवत नाहीं. सत्याग्रह सिद्धीस जाण्यास ह्या परिग्रहांचें व त्यापासून मुक्त होण्याच्या साधनांचें ज्ञान आणि तदनुरूप आचरण अत्यावश्यक आहे.

प्रज्ञा आणि अहिंसा

७४. पशुपक्षादिकांमध्यें एक प्रकारचें ज्ञान असतें. पण त्याला प्रज्ञा म्हणतां येत नाहीं. पूर्वानुभवानें ज्या ज्ञानाचा विकास होतो त्याला प्रज्ञा म्हणतात. ती फक्त मनुष्यजातींतच आढळते. हत्ती वगैरे पशु पांच हजार वर्षांपूर्वी कळप करून रहात असत, तसे ते आजलाहि रहातात. निरनिराळ्या जातीचे पक्षी जशीं आपलीं घरटीं पांड हजार वर्षांपूर्वीं बांधीत, तशीं तीं आजलाहि बांधतात. म्हणजे ह्या पशुपक्ष्यांच्या ज्ञानाची त्यांच्या पूर्वानुभवानें अभिवृद्धी होत नाहीं. पण माणसाचें असें नाहीं. त्याला आपल्या पूर्वानुभवाचा अत्यन्त उपयोग होतो. माणसाजवळ आपल्या संरक्षणासाठीं शिंगें, नखें इत्यादिक साधनें नाहींत. तरी केवळ ह्या प्रज्ञेच्या बळावर माणूस निरनिराळीं शस्त्रें पैदा करून आपलें संरक्षण करण्यास समर्थ होतो. प्रज्ञेचा विकास होण्यास जशी पूर्वानुभवाची, तशी सामाजिक घटनेचीहि आवश्यकता आहे. एकट्याच मनुष्याच्या अनुभवानें ज्ञानाचा विकास होऊं शकत नाहीं. त्याच्या अनुभवाचा उपयोग समकालीन किंवा त्याच्या पश्चात् येणारे लोक करतात, व त्याच्या योगें मनुष्यसमाजाच्या प्रज्ञेचा सतत विकास होतो.

७५. परंतु प्रज्ञेच्या मानानें जर अहिंसेचा विकास झाला नाहीं, तर तिजपासून हवा तितका फायदा होत नसतो. समजा, एका टोळीला नवीन शस्त्रांचा शोध लागला, व ते त्याच्या योगें शिकार वगैरे करून आपला निर्वाह करूं लागले, पण त्यांच्या अहिंसेचा अर्थात दयेचा त्या मानानें विकास झाला नाहीं, तर ते जें वर्तन पशूंशीं, तेंच इतर टोळ्यांशीं करतात. म्हणजे इतर दुर्बळ टोळ्या हातीं लागल्या, तर त्यांना ते मारून टाकतात. आणि कांहीं टोळ्यांतील लोक तर आपल्या शत्रूंचें मांस देखील खातात !  तात्पर्य, प्रज्ञा मनुष्यसमाजाच्या उन्नतीला कारणीभूत अतएव तारक होते खरी, पण दयेच्या जोडीनें ती चालूं लागली नाहीं, तर मारकहि होते.

७६. हा प्रकार आधुनिक मनुष्यसमाजांतहि दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियामध्यें आणि अमेरिकेमध्यें गोर्‍या लोकांनी जाऊन तेथील मूळ रहिवाशांचा जवळ जवळ निःपात करून टाकला आहे. आफ्रिकेंतील निग्रोंचा त्यांनी संहार केला नाहीं, तरी त्यांच्यावर फार जुलुम केले आहेत. त्यांनी लाखों निग्रोंना पकडून अमेरिकेंत नेऊन विकल्याचा उल्लेख आम्ही वर केलाच आहे.१   हिन्दुस्थानांत त्यांना इतका कहर करतां आला नाहीं, तरी सम्पत्तिशोषणाच्या रूपानें त्यांनी येथेंहि पुष्कळ अत्याचार केले आहेत. आणि हें सगळें कां ? तर आपल्या प्रज्ञेच्या योगानें ते पुढें सरसावले, पण त्यांची दया आपल्या देशापुरतीच राहिली. या दोन्ही गुणांमध्यें जें समत्व पाहिजे होतें, तें उत्पन्न करतां न आल्यामुळें त्यांच्याकडून हे अत्याचार घडले, व सध्या घडत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वि० ५।५४
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel