करुणा – सखि, पहा पहा!  रजोगुणाची कन्या श्रद्धा आली. प्रफुल्लनीलोत्पलाप्रमाणें तिचे डोळे आहेत. माणसांच्या हाडांची केलेली तिच्या गळ्यांतील माळा किती सुन्दर दिसते!  स्थूल कटीनें आणि स्तनभारानें मंदगामिनी झालेली ही पूर्णेन्दुमुखी विलासिनी शोभत आहे!

श्रद्धा – (जवळ येऊन) ही मी आहें. मालक, आपली काय आज्ञा?

कापालिक - प्रिये, या दुरभिमानी भिक्षूला पहिल्यानें पंकड पाहूं.

२४४. (श्रद्धा भिक्षूला आलिंगन देते. तिला आलिंगन देऊन भिक्षु रोमांचित होतो व आपणाशींच म्हणतो.)
भिक्षु – अहाहा!  या कापालिनीचा स्पर्श किती तरी सुखकारक आहे !  मी किती तरी रांडांना आलिंगन दिलें असेल. परंतु शंभरदां बुद्धांची शपथ घेऊन सांगतों कीं, असा आनन्द मला कधींच मिळाला नाहीं !  खरोखरच कापालिकांचें चरित्र मोठें पुण्यप्रद आहे, व हा सोमसिद्धान्त वर्णनीय आहे!  हा धर्म आश्चर्यकारक आहे!  हे महाभागा, मी सर्वथैव बुद्धधर्म सोडला. आतां मी पारमेश्वर सिद्धांतांत प्रवेश करतों. म्हणून तूं माझा आचार्य, व मी तुझा शिष्य. मला पारमेश्वरी दीक्षा दे.

क्षपणक - रे भिक्षु, तूं कापालिनीच्या स्पर्शानें दूषित झाला आहेस. तेव्हां येथून दूर हो.

भिक्षु - हा पाप्या! कापालिनीच्या आलिंगनमहोत्सवाला तूं वंचित झाला आहेस!

कापालिक – प्रिये, क्षपणकाला पकड. ( कापालिनी क्षपणकाला मिठी मारते.)

क्षपणक – ( रोमांचित होऊन) अहो अरिहंत ! अहो अरिहंत !  काय हें कापालिनीचें स्पर्श सुख!  सुन्दरी, दे, दे, मला पुन्हा हें आलिंगन दे!.... अहो कापालिकांचें दर्शन तेवढें सुखाचें आणि मोक्षाचें साधन होय!  भो कापालिक, आतां मी तुझा दास झालों आहें. मलाहि महाभैरवाच्या अनुशासनाची दीक्षा दे. कापालिक - तर मग बसा.

२४५. (दोघेहि बसतात. आणि कापालिक पात्र हातांत घेऊन ध्यानस्थ बसतो.)

श्रद्धा - भगवन्, पात्र दारूनें भरलें. ( कापालिक त्यांतली थोडी दारू पितो. आणि तें पात्र भिक्षूला आणि क्षपणकाला देतो.)

कापालिक - हें पवित्र अमृत संसाराचें औषध आहे; त्याचें पान करा. तें पशु आणि पाश यांच्या उच्छेदाचें कारण, असें भैरवानें सांगितलें आहे. ( ते दोघे विचारांत पडतात.)

क्षपणक - आमच्या अरिहंतांच्या धर्मांत सुरापान नाहीं.

भिक्षु - कापालिकाच्या उष्ट्याची दारू मी कशी प्यावी?

कापालिक – ( विचार करून एका बाजूला) श्रद्धे, कसला विचार करतेस?  यांचें अद्यापि तूं पशुत्व दूर करीत नाहींस काय?  त्यामुळें हे माझ्या उष्ट्याच्या दारूला अपवित्र समजतात. तेव्हां ही दारू तोंडाला लावून पवित्र कर व यांना दे. तैर्थिकांचें म्हणणें आहेच कीं, ‘स्त्रीमुखं तु सदा शुचि.’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel