भगवद्‍गीता

१५०. कौरवांचीं व पांडवांची सैन्यें समोरासमोर येऊन भिडलीं. तेव्हां अर्जुनाला आपल्याच भाऊबंदांना कसें मारावें असा विचार पडला, व तो खिन्न होऊन बसला. त्या वेळीं कृष्णानें त्याला अनेक प्रकारें उपदेश करून युद्धाला प्रवृत्त केलें. हा या गीतेचा संदर्भ. आतां येथें असा प्रश्न येतो कीं, जर ह्या ग्रंथकाराला कांहीं विशिष्ट तत्त्वज्ञान सांगावयाचें होतें, तर त्यानें तें अशा प्रसंगीं कां घुसडून दिलें ? खरोखर पाहिलें असतां कोणतें एक विशिष्ट तत्त्वज्ञान सांगण्याचा ग्रंथकाराचा उद्देश नाहीं, असें गीतेच्या निरीक्षणावरून दिसून येईल. अर्जुनाला लढाई नको आहे. त्याला अनेक युक्तिवादांनी लढाईला प्रवृत्त करावें, हाच काय तो या ग्रंथाचा उद्देश. तथापि त्यांत अनेक तत्त्वदृष्टींची अशी कालवाकालव केली आहे कीं, त्यामुळें विद्वान् म्हणवणार्‍या माणसांनाहि भ्रम उत्पन्न होतो.

१५१. उदाहरणार्थ दुसरा अध्याय घ्या. “हा आत्मा जन्मत नाहीं व मरत नाहीं. हा जन्मला होता किंवा पुढें जन्मेल असें नाहीं. हा अज, नित्य, शाश्वत व पुरातन असा आहे. शरीराची हत्या झाली तरी ह्याची हत्या होत नाही.” (२०). याप्रमाणें आत्म्याचें अजरामरत्व सिद्ध करून भगवान म्हणतात, “आतां हा आत्मा नेहमीं जन्मतो व  नेहमी मरतो, असें तूं मानीत असलास तरीहि, हे महाबाहो, त्याबद्दल शोक करणें तुला योग्य नाहीं. कारण जो जन्माला आला त्याला मृत्यु निश्चित आहे; आणि जो मेला त्याला जन्म निश्चित आहे. म्हणून ह्या अपरिहार्य गोष्टीचा शोक करणें तुला योग्य नाहीं. हीं भूतें जन्मापूर्वीं अव्यक्त स्थितींत असतात; नंतर व्यक्त होतात, व मरणानंतर पुन्हा अव्यक्त होतात. तेव्हा त्यांविषयीं शोक कां करावा ?” ( २६-२८). म्हणजे भगवंताचें म्हणणें हें कीं, आत्मा अविनाशी मानला किंवा विनाशी मानला, तरी लढाई करणें योग्य आहे. ही नुसती वकिली झाली. आत्मा नित्य असला किंवा अनित्य असला तरी लढाई न करणें कां योग्य होऊ नये?

१५२. त्याला भगवान् उत्तर देतात, “स्वधर्माच्याहि दृष्टीनें कचरणें तुला योग्य नाहीं. कां कीं, क्षत्रियाच्या धर्माला अनुकूल असें जें युद्ध त्याच्याहून अधिक श्रेयस्कर दुसरें कांहीं क्षत्रियासाठीं नाहीं. हे पार्था! दैवगत्या उघडलेलें हें स्वर्गाचें द्वारच आहे. अशा तर्‍हेचें युद्ध भाग्यवान् क्षत्रियांना लाभत असतें. असें हें स्वधर्मानुकूल युद्ध जर तूं करणार नाहींस, तर स्वधर्म आणि कीर्ति गमावून पापांत पडशील. सर्व लोक तुझी निरंतर अपकीर्ति गातील; व संभाविताला अपकीर्ति मरणापेक्षांहि जास्त आहे.” (३१-३४). येथें भगवान् तत्त्वज्ञान सोडून व्यवहारांत आले. क्षत्रियाचा स्वधर्म म्हणजे लढाई करणें; तो धर्म सोडून तूं पळालास तर तुझी लोकांत अपकीर्ति होईल; आणि ती मरणापेक्षांहि वाईट. याच्यावरून स्पष्ट होत आहे कीं, या गीतेचा उद्देश अर्जुनाला कोणत्या ना कोणत्या रूपानें लढाईला प्रवृत्त करण्याचा आहे.

१५३. असें असतां ह्याच अध्यायांत जी ब्राह्मी स्थिती सांगितली तिचा आणि या अध्यायाचा अर्थाअर्थीं कांही संबंध दिसत नाहीं. भगवान् म्हणतात, “हे पार्था, जेव्हां कोणी आपल्या मनांतील कामवासना सोडून देतो आणि आपल्याच ठायीं संतुष्ट होऊन रहातो, तेव्हां त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. ज्याचें मन दु:खांत उद्विग्न होत नाहीं, सुखांत ज्याला आसक्ति नाहीं, काम, भय आणि क्रोध हे ज्याचे नष्ट झाले, त्याला स्थितप्रज्ञ मुनि म्हणतात. (५५-५६)... जो पुरुष विषयांचें चिंतन करतो, त्यांमध्यें त्याची आसक्ति जडते; आसक्तीपासून कामवासना उत्पन्न होते; कामवासनेपासून क्रोध उद्‍भवतो; क्रोधापासून संमोह, संमोहापासून स्मृतिविभ्रम, स्मृतिविभ्रमापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून तो समूळ नाश पावतो. (६२-६३)... सर्व कामवासना सोडून जो मनुष्य निरिच्छपणें वागतो, आणि ज्याला ममत्व व अहंकार रहात नाहीं, त्याला शांति मिळते. हे पार्था, ब्राह्मी स्थिती ती हीच. ही प्राप्त झाली असतां मनुष्य मोहांत पडत नाहीं. अन्तकाळीं देखील ही स्थिती प्राप्त झाली, तरी तो ब्रह्मनिर्वाण पावतो.” (७१-७२).
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel