२७८. बुद्धानें पंचेचाळीस वर्षेंपर्यंत बहुजनहितासाठीं उपदेश केला, हें आमच्या तुकोबाला किंवा कबीराला समजावें कसें? पुराणांच्या गहन अरण्यापलिकडे त्यांची दृष्टि कशी पोंचणार? तर मग ह्या साधुसंतांच्या वचनांत भूतदयेचे, सर्व लोकांना समतेनें वागवण्याचे संतसंगतीच्या गुणवर्णनाचे बौद्ध वाङ्मयांत सांपडणारे जे उद्‍गार सांपडतात, ते आले कोठून? याला उत्तर हेंच कीं,  सामान्य जनतेंतून बुद्धोपदेशाचें बीज समूळ नष्ट झालें नव्हतें; कोणत्याना कोणत्या रूपानें तें अस्तित्वांत होतें; आणि त्याचीच वाढ अनेक रीतींनी या साधुसंतांनी केली. मात्र त्यांना आपला उपदेश राम आणि कृष्ण या दोन अवतारांच्या आधारें करावा लागला. त्यामुळें त्यांच्या उपदेशांत व दैवतांत मेळ राहिला नाहीं.

२७९. सिरजनहार न ब्याही सीता जल पाषाण नहिं बंधा ।
वे रघुनाथ एकके सुमिरे जो सुमिरै सो अंधा ।।

ह्यांत रामानें सीतेशीं लग्न केलें, सेतु बांधला इत्यादि सर्व गोष्टी खोट्या आहेत असें कबीर म्हणतो. तथापि रामायण कायमच राहिलें; व तुलसीदासानें हिन्दी अनुवाद करून त्याचा आणखीहि प्रसार केला. महाराष्ट्र संतमंडळानें विठोबाला जरी एकच रखमाई बायको ठेवली, तरी भागवत कायम राहिलेंच; आणि राधा व इतर गोपी तशाच राहून गेल्या. तात्पर्य काय कीं, कोणत्याहि संताच्या अंगीं पुराणाचें समूळ उच्चाटन करण्याचें सामर्थ्य नव्हतें. त्यांनी दुधाची तहान कशी बशी ताकावर भागवून घेतली म्हणावयाची!


२८०  या संतमंडळाचा काळ म्हटला म्हणजे मानवी संकटांचा होता. मुसलमान राजांना हिंदुस्थानाविषयीं मुळींच आदर नव्हता. कारण हिंदु लोक म्हटले म्हणजे काफिर, हरामखोर, त्यांच्यावर दया ती काय करावयाची? तेव्हां त्यांच्या कारकीर्दींत जाळपोळ, लुटालूट आणि बायकांपोरांसकट सर्वांची कत्तल, या गोष्टी सर्वसाधारण होत्या; आणि त्यामुळें वारंवार देशांत दुष्काळ पडत असत. मुसलमानांच्या संसर्गानें हा रोग रजपुतांनाहि जडला. मुसलमानांचे हल्ले आले असतां आजूबाजूचीं गांवें जाळून ते जंगलाचा किंवा डोंगराचा आश्रय धरीत असत, व तेथून मुसलमानांवर हल्ले करीत. मराठ्यांच्या कारकीर्दींत तर या रोगाची सांथ फारच फैलावली; हिंदुस्थानामध्यें लोकांच्या आपत्तीला पारावर नाहींसा झाला. तुकाराम स्वत: अशा एका दुष्काळांत सांपडला. त्यामुळें त्याची थोरली बायको व मुलगा मरण पावला. त्याच्या साधुत्वाला कारण हाच दुष्काळ झाला हें सुप्रसिद्ध आहे.

२८१. अशा समयीं या साधुसंतांचा उपदेश लोकांच्या अल्पस्वल्प शांतीला कारणीभूत झाला असला पाहिजे. ‘आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ।।’  लूटफाट करीत आहेत, गांवें जाळीत आहेत, अशा प्रसंगीं करावें काय? तर सादर रहावें; देवावर भार घालून पोरांबाळांना घेऊन कुठें तरी दडून बसावें. दुष्काळच आला तर जेथें अन्न मिळेल त्या प्रदेशांत जाऊन रहावें. देवावर भार घातल्याशिवाय गरीब जनता दुसरें काय करूं शकली असती ? अर्थात् हाच उपदेश कायतो त्या काळांत योग्य होता. काबाड कष्ट करणार्‍या गरीब बायका शेजार्‍यांना त्रास होऊं नये म्हणून आपल्या मुलांना बेताची अफूची गोळी देऊन काम करायला जातात. मग ती पोरें सारा दिवस त्या गुंगीत चुपचाप पडून रहातात; त्यांना आईच्या दुधाची आठवण होत नाहीं. त्याप्रमाणें त्या काळीं साधुसंतांच्या ह्या उपदेशानें हिंदी जनता चुपचाप सगळीं बंडाळीचीं दु:खें सहन करण्यास समर्थ झाली असावी.

२८२. पुराणें म्हणजे लढायांनी व रक्तपातांनी ओथंबलेलीं. त्यांतील कृष्णासारख्या मोठ्या दैवताला सोळा सहस्त्र बायका. त्याच्या कांहीं भक्तांनी तर त्याच्या बायकांना बाजूला ठेवून राधेसारख्या परस्त्रीलाच पुढें आणलें!  अशीं हीं पुराणें जोरावत चाललीं असतां मुसलमानांच्या स्वार्‍या या देशावर येऊन थडकल्या. जणूं काय पुराणें ही त्या स्वार्‍यांची पूर्वचिन्हेंच होतीं! मुसलमानांनी पुराणांत लिहिलेल्या गोष्टी शक्य तितक्या अमलांत आणून दाखविल्या. लढाया, रक्तपात, जनानखाने इत्यादिक गोष्टी मूर्तिमंत दिसूं लागल्या. या संकटांत शेंकडों वर्षें हिंदी जनता सांपडली असतांहि तिच्या अंगचे कांही सुसंस्कार अद्यापि नष्ट झाले नाहींत. चीनशिवाय इतर देशांशी तुलना केली असतां सौम्यपणांत हिंदी जनतेचा नंबर पहिला येईल. कृष्णाला जरी हजारों बायका होत्या, तरी अद्यापि हिंदुस्थानांत एकपत्‍नीव्रताची किंमत जास्त आहे. मद्यपानविरतीबद्दल तर आम्ही प्रसिद्धच आहोंत. तेव्हां पार्श्वानें आणि बुद्धानें पेरलेलें सत्कर्माचें बीज आमच्यांतून अद्यापिहि नष्ट झालें नाहीं असें म्हणावें लागतें. मुसलमानांच्या कारकीर्दींत त्या बीजाची अल्पस्वल्प जोपासना करण्याचें श्रेय बहुतांशीं रामानंदी व वारकरी पंथांना देणें योग्य आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel