अकबराचा प्रयत्‍न

२८३. रामानंदी व वारकरी पंथांनी सौजन्य आणि बंधुभाव यांच्या प्रचारासाठीं पुष्कळ प्रयत्‍न केला खरा, तरी आमच्यांतील संप्रदाय व जातिभेद कमी झाले नाहींत. त्यांना आळा घालण्यासाठीं अकबर बादशाहानें थोडासा प्रयत्‍न केला. आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धांत (इ.स.१५८० नंतर) त्यानें एक दीन-इ-इलाही (ईश्वरीय संप्रदाय) नांवाचा पंथ स्थापन केला. ईश्वराच्या अस्तित्वाचें साक्षात् चिन्ह म्हणून सूर्योपासना करावी, परंतु कोणत्याहि रीतीनें सांप्रदायिकता राहूं देऊं नये, असें या नवीन पंथाचें धोरण होतें. अकबराच्या दरबारांतील हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या अधिकार्‍यांशिवाय इतर लोकांचें या पंथाला पाठबळ मिळालें नाहीं. कारण उघडच आहे. ह्या पंथात पूजाअर्चेचा भाग नसल्यामुळें ब्राह्मणांची वरणी लागणें शक्य नव्हतें, व कुराणाला महत्त्व दिलें गेलें नसल्यामुळें मौलवी-मौलानांनाहि त्यापासून फायदा नव्हता.

२८४. ह्याच काळीं ब्राह्मणांचे पूर्वसंस्कार अल्लोपनिषदाच्या रूपानें पुढें आले. ह्या उपनिषदाचा कर्ता कोण व त्याला संस्कृत भाषा कितपत अवगत होती, हें सांगतां येत नाहीं. तथापि त्याच्या ह्या उपनिषदाचें ऐतिहासिक महत्त्व बरेंच असल्याकारणानें तें समग्र येथें देत आहों.

अथाऽल्लोपनिषदं व्याख्यास्याम: ।
अस्माल्लां इल्ले मित्रावरुणा दिव्यानि धत्ते ।।
इल्लल्लेवरुणो राजा पुनर्द्ददु: ।
ह्या मित्रो इल्लां इल्लल्लेति ।।
इल्लाल्लां वरुणो मित्रस्तेजस्काम: ।।१।।
होतारमिन्द्रो होतारमिन्द्रो महासुरिन्द्रा: ।
अल्लो ज्येष्ठं श्रेष्ठं परमं पूर्णं ब्रह्माणं अल्लाम् ।।२।।
अल्लो रसूलमहामदरकबरस्य अल्लो अल्लाम् ।।३।।
आदल्लाबूकमेककम् । अल्लाबूकंनिखातकम् ।।४।।
अल्लो यज्ञेन हुतहुत्व: । अल्ला सूर्यचन्द्रसर्वनक्षत्रा: ।।५।।
अल्ला ऋषीणां सर्वदिव्याँ इन्द्राय पूर्वं माया परममन्तरिक्षा: ।।६।।
अल्ल: पृथिव्या अन्तरिक्षं विश्वरूपम् ।।७।।
इल्लाँ कबर इल्लाँ कबर इल्लाँ इल्लल्लेति इल्लल्ला: ।।८।।
ओम् अल्ला इल्लल्ला अनादिस्वरूपाय अथर्वणीशाखां
हुं हीं जनान् पशून् सिद्धान् जलचरान् अदृष्टं कुरु कुरु फट् ।।९।।
असुरसंहारिणीं हुं हीं अल्लो रसूलमहमदरकबरस्य अल्लो अल्लाम इल्लल्लेति इल्लल्ल: ।।१०।।
इत्यल्लोपनिषत् समाप्ता ।। १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ सत्यार्थप्रकाशांतून घेतलें. यांत हिंदी विश्वकोषांत दिलेल्या अल्लोपनिषदांतील कांहीं पाठ घेतले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२८५. हें उपनिषद् अथर्व वेदाच्या उपनिषदांपैकी आहे असें म्हणतात. ह्यांत बरेचसे अरबी शब्द मिसळले असल्यामुळें त्याचा अर्थ काय हें बरोबर सांगतां येत नाहीं. हा मजकूर जसा थोडा आहे, तसा त्याचा जीवनकालहि थोडाच होता असें वाटतें. अकबराच्या काळीं किंवा त्यानंतर ह्या उपनिषदावर भाष्य करावें असें कोणत्याहि पंडिताच्या मनांत आलें नाहीं. म्हणजे हें उपनिषद् उत्पन्न झाल्याबरोबरच थोडक्याच काळांत विलयाला गेलें असावें. तरी त्याचें शरीर अद्यापिहि अस्तित्वांत आहे, व त्यावरून ब्राह्मणी संस्कारांची दिशा चांगली ओळखतां येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel