२३०. गोष्ट ककुसंधाच्या वेळची म्हणून सांगितली आहे. पण तसा प्रकार गोतम बुद्धानंतरच घडला असला पाहिजे. कधीं ब्राह्मण भिक्षूंना शिव्या देत, तर कधीं भिक्षूंचा आदर सत्कार करीत. तेव्हां अशा प्रसंगीं निंदेनें घाबरून न जातां किंवा स्तुतीनें वाहून न जातां स्थिर मार्गावर रहाण्याची युक्ति या कथेंत दर्शविली आहे.

२३१. “एकदां बुद्ध भगवान् राजगृहाहून नालंदा गांवाला मोठ्या भिक्षुसंघासह जात होता. त्याच्या मागोमाग सुप्रिय परिव्राजक व त्याचा शिष्य ब्रह्मदत्त हे दोघे होते. सुप्रिय अनेक रीतीनें बुद्धाची, धर्माची व संघाची निंदा करीत होता. पण त्याचा शिष्य ब्रह्मदत्त अनेक प्रकारें बुद्धाची, धर्माची व संघाची स्तुति करीत होता. हें पाहून भिक्षूंना मोठें आश्चर्य वाटलें, व ही गोष्ट त्यांनी बुद्धाला सांगितली. तेव्हां भगवान् म्हणाला ‘भिक्षुहो’ माझी, धर्माची किंवा भिक्षुसंघाची कोणी निंदा केली, तर तुम्ही त्याबद्ल वाईट वाटूं देतां कामां नये. जर त्यामुळे तुमच्या मनावर आघात झाला, तर तो तुम्हालाच अंतरायकारक होईल. जर माझी, धर्माची किंवा भिक्षुसंघाची इतरांनी स्तुति केली, तर तुम्ही वाहून जातां कामां नये. तुम्ही वाहून गेलांत, तर त्यामुळे तुम्हालाच अंतराय होईल.”

२३२. हा बुद्धाचा उपदेश भिक्षूंच्या स्मरणांतून पार नष्ट झाला असावा. निंदेला किंवा स्तुतीला गंभीरपणें तोंड देऊन सामान्य जनतेच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी पतकरला असता, तर त्यांना ब्राह्मणांचें आणि शैव संन्याशांचें भय बाळगण्याचें मुळींच कारण नव्हतें. पण तसें कांहीं न करतां त्यांनी पुराणांच्या हल्ल्यापासून आपला बचाव करण्यासाठीं जणूं काय महापंकांतच उडी टाकली! एकामागून एकत तंत्रें रचून ते आपल्या संप्रदायाचें रक्षण करण्यास पाहूं लागले. पण दिवसा बुद्धाची पूजा करावयाची आणि रात्रीं वाममार्गाचा अंगीकार करून नग्न स्त्रीची पूजा करावयाची, याचा मेळ बसावा कसा? त्याच्याहिपेक्षां शैव संन्याशांनी उघडपणें केलेली लिंगपूजा काय वाईट होती? ब्राह्मणांना तोंड देण्यासाठीं त्यांनी ह्याच काळीं मञ्जुश्रीमूलकल्पासारखीं पुराणें रचण्यास सुरुवात केली. पण त्यांतहि तीव्रतर हिंसेचें आणि बीभत्सादिक रसांचें प्रदर्शन न करतां आल्या कारणानें ब्राह्मणी पुराणांसमोर हीं पुराणें फिक्कीं पडलीं व टिकाव धरून राहिलीं नाहींत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel