शिवाजी आणि गणपति-उत्सव

३५. जेथें संस्कृत भाषेचा फारसा प्रसार नव्हता अशा प्रांतांत आर्यसमाजाचा विशेष प्रसार झाला. पण दक्षिणेकडील प्रांतांत त्याचा प्रसार होणें शक्य नव्हतें. देशाभिमान पाहिजे आहे खरा; परंतु तो वेदाच्याच पायावर उभारला पाहिजे, हें दक्षिणेकडील सुशिक्षित लोकांना पसंत नव्हतें. कोणत्याहि लोकप्रिय दैवताला आणि ऐतिहासिक व्यक्तीला पुढें करून देशाभिमान जागृत करतां येणें शक्य आहे, हें प्रथमत: लो. टिळकांनी सिद्ध करून दाखविलें. शिवाजी-उत्सव व गणपति-उत्सव हीं दोन साधनें त्यांनी ह्या कामीं उपयोगांत आणलीं. शिवाजी महाराष्ट्रीयांचे राज्य स्थापन करणारा, आणि गणपति पेशव्यांचें दैवत असल्यामुळें महाराष्ट्रांत बराच प्रिय झालेला. तेव्हां या दोघांनाहि पुढें आणून हिंदूंचा राष्ट्राभिमान जागृत करण्याची युक्ति लोकमान्यांनी काढली; व तिला ब्राह्मसमाज किंवा आर्यसमाज यांच्याहिपेक्षां जास्त यश आलें.

३६. या यशाचें श्रेय थोडेंबहुत इंग्रजी अधिकार्‍यांना देणें योग्य आहे. शिवाजी-उत्सवाला आरंभापासूनच मदत केली असती, तर तो तेव्हांच थंडावला असता;  व गणपतीच्या मेळ्यांची जशी हे अधिकारी आजला उपेक्षा करतात, तशी त्यांनी आरंभीं केली असती, तर ते मेळे तेव्हांच निष्फळ ठरले असते. पण इंग्रज अधिकारी सत्तावन सालच्या बंडापासून फार संशयखोर झाल्यामुळें त्यांना ‘रज्जुसर्पाकारभास’ होत असतो; व जोंपर्यंत दोरी ही दोरी आहे असें वाटलें नाहीं तोंपर्यंत तिला ते बडवीत सुटतात. तसा प्रकार या दोन उत्सवांच्या बाबतींतहि झाला.

३७. कांहीं काळ गेल्यावर अधिकार्‍यांना आपली चूक दिसून आली. त्यांनी आपण होऊन शिवाजीचा पुतळा उभारण्यास  व शिवाजी मिलीटरी स्कूल स्थापन करण्यास मदत केली. त्याचा इंग्रजांना चांगलाच फायदा मिळतो आहे. गणपतीच्या उत्सवांत पांच पंधरा दिवस नाचत बागडत राहिल्यानें सामान्य जनतेचें लक्ष्य आपल्या भुकेच्या पीडेपासून आणि सध्याच्या राजकारणापासून निवृत्त होतें, हा अनुभवहि इंग्रजांना आला आहे. अर्थात् ह्या उत्सवालाहि त्यांचा मुळींच विरोध राहिला नाहीं.

३८. सामाजिक किंवा राजकीय सुधारणा करण्यांत धार्मिक गोष्टींचें मिश्रण केल्यानें फायद्यापेक्षां हानिच जास्त होते. बंगाल्यांत व दुसर्‍या प्रांतांत जातीजातींत मिश्रविवाह घडून येण्याला आणि पंक्तिभेद मोडण्याला ब्राह्मसमाजाची मुळींच आवश्यकता राहिली नाहीं; असें असतांहि ब्राह्मसमाज चालूच आहे. पंजाबांत सामाजिक आणि राजकीय सुधारणेसाठीं आर्यसमाजाची जरूरी आतां मुळींच भासत नाहीं; तरी आर्यसमाज चालूच आहे. महाराष्ट्रांत गणपति-उत्सवाचा व स्वदेशाभिमानाचा कांहींच संबंध राहिला नाहीं; तरी गणपति-उत्सव चालूच आहे, आणि त्यापायीं दरवर्षी गरीब महाराष्ट्राचे लाखो रुपये खर्चीं पडत आहेत. एका मुंबईत शहरांत या उत्सवाप्रीत्यर्थ महाराष्ट्रीय दरवर्षीं जवळ जवळ तीन लाख रुपये खर्च करतात, असें एक गुजराथी तरुण म्हणाला. सहकारी पतपेढ्या काढून त्यांत हे पैसे सांठविण्यांत आले असते, तर पठाणांपासून व इतर सावकारांपासून मुंबई शहरांतील गांजलेले महाराष्ट्रीय मजूर कधींच मुक्त झाले असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel